निती आयोग

‘भारतात परिवर्तन घडवणाऱ्या महिला’ या नीती आयोगाच्‍या पाचव्या वर्षीच्या पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्‍ये महाराष्ट्रातील 11 प्रेरणादायी महिलांचा समावेश


देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त 75 महिलांचा गौरव

Posted On: 23 MAR 2022 8:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 मार्च 2022 

 

भारताला ‘सशक्त आणि समर्थ’ बनवण्याच्या कार्यात, देशातील महिला सातत्याने महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. या विविध क्षेत्रातील महिलांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत, त्यांचा गौरव करण्यासाठी, नीती आयोगाने, भारतात परिवर्तन घडवणाऱ्या महिलांसाठी विशेष पुरस्कार सुरु केले. 

यंदा, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, देशभरात सुरु असलेल्या कार्यक्रमांचे औचित्य साधत, या पुरस्कारासाठी देखील 75 कर्तृत्ववांण महिलांची निवड करण्यात आली. या 75 महिलांपैकी 11 पुरस्कार विजेत्या महाराष्ट्रातील आहेत.

पुरस्कार विजेत्यांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

 

1) दीपा चौरे, नागपूर, क्रांतिज्योती महिला बचत गट

क्रांतिज्योती महिला बचत गटाने देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दीपा चौरे यांच्या प्रयत्नांना प्रचंड यश मिळाले आहे.  त्यांनी 'सशक्त आणि समर्थ' भारतासाठी महत्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या बचत गटाद्वारे, सध्या नागपूर जिल्ह्यातल्या 350-500 महिलांना रोजगार, उत्पादन निर्मिती, विपणन, विक्री, वित्तपुरवठा आणि प्रशिक्षण सेवांच्या माध्यमातून सुविधा दिल्या जात आहेत.

 

2) डॉ अपर्णा हेगडे, मुंबई, अरमान

डॉ. अपर्णा हेगडे या अरमान या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक आहेत, ही संस्था एमहेल्थ (mHealth) या अभिनव तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, भारतातील19 राज्यांमध्ये माता आणि बालमृत्यू  तसेच बालकांमधील आजार कमी करण्यासाठी इतर कमी करण्यासाठी विविध स्तरातील, किफायतशीर, स्त्री-पुरुष किंवा इतर कुठलाही भेदभाव न करता, वेगळ्या धाटणीच्या सेवा देते.  

त्यांच्या एकात्मिक आणि सर्वंकष दृष्टिकोनामुळे, देशातील अनेक भागात,  गरोदर महिला आणि पाच वर्षांखालील मुलांना ही संस्था आरोग्य सेवा पुरवत आहे. तसेच आजाराचे लवकर निदान, योग्य रुग्णालयात उपचारांसाठी  पाठवणे, जोखीम असलेल्या आजारांवर उपचार अशा सर्व, कामात त्या आरोग्य कर्मचारी आणि यंत्रणांना देखील मदत करतात. आतापर्यंत ही संस्था, 27 दशलक्ष  महिला आणि बालकांपर्यंत पोहोचली आहे. तसेच त्यांनी, 2,29,000 आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षितही केले आहे. येत्या पांच वर्षात देशभरात संस्थेचा विस्तार करण्याचा त्यांचा मानस आहे.

 

3) सायली मराठे, आद्या ओरिजिनल्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे 

आद्या हा प्रीमियम, हाताने तयार केलेल्या चांदीच्या दागिन्यांचा ब्रॅंड आहे. विशेष म्हणजे, हे दागिने इतिहास, निसर्ग आणि अमूर्त सौंदर्यावरुन तयार केलेले असतात. सायली मराठे, आद्याच्या संस्थापक असून चांदीचे प्रमाणित दागिने तयार करण्यासाठी त्या कारागिरांची मदत घेतात. त्यांचे दागिने जगभर उपलब्ध असतात. आयआयएम बेंगळुरुमध्ये या संकल्पनेचा जन्म झाला असून हा कॉर्नल विद्यापीठाच्या समूहाचा हा महाराष्ट्रातला पहिलाच कार्यक्रम आहे. अतिशय उत्तम संशोधन करुन, ते शुद्ध चांदीचे,दर्जेदार दागिने तयार करतात.

 

4) सुलज्जा फिरोदिया मोटवानी, पुणे, कायनेटिक एनर्जी अँड पॉवर सोल्यूशन्स

सुलज्जा यांनी पाच वर्षांपूर्वी, ई-मोबिलिटी व्हेंचर सुरु केले. ते अशा काळात, जेव्हा, ईव्ही तंत्रज्ञानावर कोणाचाच विश्वास नव्हता. त्यांच्या नेतृत्वाखाली, कायनेटिक ग्रीन ने 100 टक्के स्थानिक स्वरूप घेतले. त्यांनी  अत्यंत आधुनिक मात्र, सर्वसामान्यांना परवडण्यजोग्या तीनचाकी ऑटो रिक्षा आणि दुचाकी गाड्या तयार केल्या आहेत. त्यांची ई-ऑटोरिक्षा केवळ, एक लाख रुपये किमतीची आहे, ग्राहकांना कोणतेही अनुदान न घेता, ही रिक्षा विकत घेता येईल, असा विचार त्यामागे आहे. त्यांच्या कंपनीने आतापर्यंत 50,000 इलेक्ट्रिक वाहने तयार केली असून, अनेकांना रोजगार दिला आहे.

 

5) मेहा लाहिरी, मुंबई, रेसिटी नेटवर्क प्रा. लि.

मेहा लाहिरीचा रेसिटी मधील उद्योजकतेचा प्रवास भारतातील 12 हून अधिक शहरांमध्ये हा केवळ  चक्राकार अर्थव्यवस्थेमधील उपाययोजनांद्वारे प्लास्टिक कचऱ्याची आव्हाने सोडवण्यापुरता मर्यादित नसून एक निरोगी कार्यबळ निर्माण करण्याच्या दिशेने लिंगभेद न करता लवचिक संस्कृतीची जोपासना करणारा आहे. रेसिटी औपचारिक आणि अनौपचारिक कचरा कामगारांच्या व्यावसायिकीकरणासाठी अथक प्रयत्न करत आहे. या संस्थेने स्थापनेपासूनच, आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिबिरांच्या मदतीने 69% पेक्षा जास्त महिला कचरा कामगारांच्या आयुष्यात बदल घडवला आहे.

 

6) कीर्ती पुनिया, मुंबई, ओखाई

कीर्तीने ओखाईची स्थापना केली, ज्यात संपूर्ण भारतातील ग्रामीण कारागिरांनी हस्तकलेच्या माध्यमातून तयार केलेले कपडे आणि नित्योपयोगी उत्पादने मांडण्यात आली. थेट ग्राहकांना किरकोळ विक्री करण्यासाठी ओखाई ही भारतातील सर्वात मोठी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणारी वस्त्रप्रावरणे आणि नित्योपयोगी उत्पादनांची बाजारपेठ बनली आहे. तिच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली तिने संस्थेतील कारागिरांची संख्या 350 वरून 27,000 वर नेली आहे, केवळ 6 वर्षात 10 पट महसूल मिळवला आहे.

 

7) शाहीन मिस्त्री, मुंबई, टीच फॉर इंडिया आणि आकांक्षा फाउंडेशन

शाहीनने 2008 मध्ये भारतातील शैक्षणिक असमानता संपवण्यासाठी कटिबद्ध नेत्यांची चळवळ उभारून संपूर्ण भारतातील सर्व मुलांना उत्कृष्ट शिक्षण देण्याच्या धाडसी दृष्टीने टीच फॉर इंडियाची स्थापना केली. आज, टीच फॉर इंडिया आठ शहरांमधील 900 हून अधिक फेलो आणि 250 कर्मचारी सदस्यांच्या थेट कार्याद्वारे 32,000 मुलांना घडवते आणि संस्थेने 9,100 पेक्षा जास्त माजी विद्यार्थी घडवले आहेत.

 

8) प्रेमा गोपालन, पुणे, स्वयं शिक्षण प्रयोग

प्रेमा गोपालन यांनी महाराष्ट्र, केरळ, बिहार आणि ओदिशा राज्यांमध्ये तळागाळातील महिलांचा समूह आणि समुदायांना सक्षम करण्यासाठी स्वयं शिक्षण प्रयोगची स्थापना केली. त्यांच्या कार्याने 300,000 हून अधिक ग्रामीण महिलांना उद्योजक आणि चेंज मेकर म्हणून सक्षम केले आहे.

 

9) चेतना गाला सिन्हा, मुंबई, माणदेशी महिला सहकारी बँक

चेतना या माणदेशी महिला सहकारी बँकेशी संबंधित सामाजिक कार्यकर्त्या आहेत. भारतातील ग्रामीण महिला सूक्ष्म-उद्योजकांसाठी युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाच्या भागीदारीत पहिला महिला निवृत्तीवेतन निधी स्थापन करण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.

बँकेने आठवडी बाजारात ग्रामीण महिलांसाठी पहिले कॅश क्रेडिट उत्पादन देखील सुरू केले आहे.

 

10) त्रिशला सुराणा, मुंबई, कलर मी मॅड प्रा. लि.

त्रिशला, युवर फूट डॉक्टरच्या व्यवस्थापकीय संचालिका यांनी सपाट पाय आणि पायाशी संबंधित इतर वेदनांमुळे त्रस्त लोकसंख्येसाठी चलनवलन आणि वेदनामुक्त जीवनाचा खरोखर महत्त्वाचा मुद्दा हाताळला आहे. हे एक स्टार्ट-अप आहे जे तुमच्या पायांची काळजी घेते आणि नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि मानवी स्पर्श वापरून पायांची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित करते. याने हजारो ग्राहकांना वेदना कमी करणारी पादत्राणे आणि इनसोल्स वितरीत करून, पृष्ठभाग आणि त्यांच्या पायाच्या स्थितीनुसार लाभ दिला आहे.

 

11) शांती राघवन, मुंबई, इनेबल इंडिया 

इनेबल इंडिया (EI) ही ना-नफा ना तोटा तत्त्वावरील संस्था शांती राघवन यांनी सुरू केली. ते गेल्या 2 दशकांपासून प्रत्यक्ष काम करत आहेत आणि हजारो दिव्यांगांना (पीडब्ल्यूडी) लाभ देत आहेत. त्यांचा दृष्टिकोन म्हणजे एक असे जग आहे जिथे दिव्यांग व्यक्ती करदाते, सक्रिय नागरिक आणि राष्ट्रउभारणी करणारे असतात. अर्थव्यवस्थेवर आणि समाजावर सकारात्मक प्रभाव टाकून लाखो दिव्यांगांना सन्माननीय जीवन मिळावे यासाठी इनेबल इंडिया एक शाश्वत उपजीविका परिसंस्था तयार करण्याच्या मोहिमेवर आहे.

* * *

S.Patil/R.Aghor/V.Joshi/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1808914) Visitor Counter : 321


Read this release in: English , Hindi