आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारतातील 40% पेक्षा जास्त लोकसंख्येच्या शरीरात क्षयरोगाच्या जीवाणूचा संसर्ग असतो मात्र केवळ 10% लोकांनाच क्षयरोग होतो: मुख्य वैद्यकीय अधिकारी, राष्ट्रीय क्षयरोग संस्था


आपल्या देशात वंध्यत्वाचे सर्वात मोठे कारण आहे क्षयरोग: डॉ. सोमशेखर एन

‘क्षयरोग अत्यंत संसर्गज्ञ आहे; जर वेळेत उपचार केले नाहीत, तर मृत्यूचाही धोका संभवतो’

जगातील एकूण रुग्णांच्या एक चतुर्थांश रुग्ण भारतात : राष्ट्रीय क्षयरोग संस्था

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त पत्रसूचना कार्यालयाच्या पश्चिम विभागाच्या वतीने वेबिनारचे आयोजन

Posted On: 22 MAR 2022 2:43PM by PIB Mumbai

मुंबई, 22 मार्च 2022

‘क्षयरोग निर्मूलनासाठी गुंतवणूक करा, आयुष्य वाचवा’ या यंदाच्या जागतिक क्षयरोग दिन 2022 च्या संकल्पनेवर आधारित एक वेबिनारचे आयोजन  पत्र सूचना कार्यालयाने केले होते. दरवर्षी जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च रोजी आयोजित केला जातो. याचा उद्देश या रोगाबद्दल जनजागृती करणे हा आहे. डॉ. सोमशेखर. एन, संचालक राष्ट्रीय क्षयरोग संस्था, बेंगळूरू आणि एनआयटी, बेंगळूरूचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, डॉ रविचंद्र सी यांनी तज्ञ वक्ते म्हणून यात भाग घेतला आणि क्षयरोगाबद्दल अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

चर्चेतील महत्वाचे मुद्दे:

क्षयरोग हा मायकोबॅक्टेरीयम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो जो, बहुतांशवेळा फुफ्फुसांवर परिणाम करतो. संक्रमित व्यक्तीच्या खोकल्याच्या थेंबांतून हा रोग सहज पसरू शकतो, ज्यामुळे हा आजार अतिशय संसर्गजन्य बनतो. वेळेत उपचार न झाल्यास क्षयरोग जीवघेणाही  ठरू शकतो.

जगात क्षयरोग होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात दिसून येतात, ज्यापैकी 26% पेक्षा जास्त रुग्ण भारतात आढळून येतात. जगातील एकूण रुग्णांच्या एक चतुर्थांश रुग्ण भारतात आढळून येतात, ज्यात बहुऔषधे प्रतिरोध क्षयरोग तसेच एचआयव्ही क्षयरोग देखील आहेत.

क्षयरोग संक्रमण आणि क्षयरोग:

“जगातील एक तृतीयांश लोकांमध्ये क्षयरोगाचे संक्रमण असते - याचा अर्थ असा नाही, की ते सगळे क्षयरोगी आहेत. भारताच्या 40% पेक्षा जास्त लोकांच्या शरीरात क्षयरोगाचे जीवाणू असतात, पण त्यांना क्षयरोगाचे संक्रमण झालेले नसू शकते. यापैकी केवळ 10% व्यक्तींना क्षयरोग होणाची शक्यता असते,” डॉ रविचंद्र सी.

खालावलेली रोगप्रतिकार शक्ती हे क्षयरोग होण्याचे एक सर्वसामान्य कारण समजले जाते, ज्यामुळे क्षयरोग संक्रमण  हे क्षयरोगात परिवर्तीत होते. एचआयव्ही, तणाव, मधुमेह, फुफ्फुसांचा आजार असलेले लोक, मद्यपान करणारे लोक, धुम्रपान करणारे लोक ज्यांची एकूणच प्रकृती खालावलेली असते अशा लोकांना क्षयरोग होण्याची  अधिक शक्यता असते. या एकंदर प्रतिकारशक्तीकमी असलेल्या  टप्प्यावर या  गटातील लोकांमध्ये लक्षणे दिसू लागतात.

एचआयव्ही रुग्णांच्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण म्हणजे क्षयरोग आणि एचआयव्ही रुग्णांमध्ये सर्वात मोठे संधिसाधू संक्रमण असते ते क्षयरोग जीवाणूचे. जर एखादी व्यक्ती कोणतेही उपचार घेत नसेल तर, तिला क्षयरोग होण्याची शक्यता सर्वाधिक असते.

नखे आणि केस या व्यतिरिक्त शरीराच्या कुठल्याही अवयवावर क्षयरोगाचा परिणाम होऊ  शकतो. शरीरात जेथे रक्त पोचते त्या सर्व भागांवर त्याचा परिणाम होतो: डॉ सोमशेखर एन

क्षयरोगाचे प्रकार आणि लक्षणे:

ढोबळमानाने क्षयरोगाचे दोन प्रकार आहेत - फुफ्फुसांचा क्षयरोग (पल्मनरी ट्युबरक्युलोसीस) - याचा परिणाम फुफ्फुसांवर होतो आणि एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलोसीस - याचा परिणाम फुफ्फुसांसोबतच इतर अवयवांवर देखील होतो.

यांची लक्षणे देखील दोन प्रकारांत विभागली जाऊ शकतात - सामान्य लक्षणे आणि अवयव विशिष्ट लक्षणे. दोन आठवड्यांपेक्षा जास्त असलेला खोकला हे सर्वात जास्त आढळून येणारे लक्षण आहे. वजन कमी होणे, भूक न लागणे, रात्री ताप येणे ही सर्व प्रकारच्या क्षयरोगाची सर्वसामान्य लक्षणे आहेत. छाती दुखणे, थकवा, झपाट्याने वजन कमी होणे, थुंकित रक्त येणे, ही एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलॉसिसच्या रुग्णांत आढळणारी इतर लक्षणे आहेत.

क्षयरोगाचे दोन गंभीर प्रकार आहेत - मिलीअरी क्षयरोग आणि क्षयरोग मेंदूज्वर

मिलीअरी क्षयरोग - याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो.

क्षयरोग मेंदूज्वर – याचा परिणाम मज्जासंस्थेवर होतो, यामुळे डोकेदुखी, ग्लानी, गुंगी अशी लक्षणे दिसतात.

लीम्फ नोड क्षयरोग (LNTB) हा सर्वात जास्त आढळून येणारा एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलोसीस आहे. यात मानेवर सूज येते आणि किशोरवयीन मुलींमध्ये हा आजार  सर्वाधिक दिसून येतो.

क्षयरोग प्ल्युरल एफ्युशन: फुफ्फुसांच्या बाहेर असणाऱ्या प्ल्युरा मध्ये जास्त द्रव जमा होऊन खोकला आणि श्वासोच्छवासाला त्रास होणे.

क्षयरोगाचे दुर्मिळ प्रकार आहेत त्वचेचा क्षयरोग, डोळ्याचा क्षयरोग. क्षयरोगाचे इतरही प्रकार आहेत ज्यांचा परिणाम हृदयाचे आवरण, आतडे आणि हाडांवर देखील होतो.

आपल्या देशात वंध्यत्वाचे सर्वात मोठे कारण आहे क्षयरोग: डॉ. सोमशेखर एन

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे महासंचालक मनीष देसाई यांनी, वेबिनारची सुरुवात करतांना,  आरोग्य संवादाचे महत्व आणि ते मंत्रालयाच्या इतर महत्वाच्या निर्देशांपैकी एक झाले आहे, याविषयी विवेचन केले. “कोविड-19 महामारी आल्यापासून आरोग्य संवादाला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे आणि आरोग्य संवादाला मोठी चालना मिळाली आहे,” ते म्हणाले. आरोग्य संवादाचा भाग म्हणून सरकार जनतेने घ्यावयाच्या खबरदारीविषयी नियमितपणे कोविडवर माध्यमांना माहिती देत आहे. त्याशिवाय, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे विविध विभाग वेबिनार आणि कार्यशाळा देखील आयोजित करत असतात. विषयातील तज्ञांशी झालेल्या अशा चर्चांमुळे विषय समजून घेणे आणि त्यानुसार जनतेशी संवाद कसा करायचा हे ठरवणे यात माध्यमांना मोठी मदत झाली आहे, असे महासंचालक म्हणाले.

क्षयरोगाचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी, जनसंवाद आणि व्यक्तींमधील संवाद यासाठी भारत सरकारने अवलंबलेल्या विविध संवाद प्रक्रियांविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. “अमिताभ बच्चन यांना क्षयरोग विरोधी मोहिमेत सहभागी करून घेतल्याने हे आव्हान अतिशय प्रभावीपणे पेलले गेले,”  असे मनीष देसाई म्हणाले. “ सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेमुळे या सारख्या अनेक रोगांशी सामना करण्यात मोलाची मदत झाली आहे,” ते म्हणाले.

अतिसंसर्गजन्य रोगांच्या नियंत्रणाचे महत्व यावर बोलताना ते म्हणले, भारताच्या सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचा उद्देश, देशाला 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त करणे, हा आहे. “भारताने संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास उद्दिष्टांवर स्वाक्षरी केली आहे. वर्ष 2030 पर्यंत जगाला क्षयरोग मुक्त करणे हे याचे उद्दिष्ट आहे.”

“क्षयरोग निर्मूलनासाठी आपण सर्वंकष दृष्टिकोण अंगिकारला तरच ही उद्दिष्टे गाठणे शक्य होईल.” या रोगाशी लढण्यात आणि त्याच्याशी जोडल्या गेलेल्या  ‘कलंक’ या धारणेशी लढण्यासाठी, ‘संवादावर भर’ या रणनीतीचे महत्व त्यांनी अधोरेखित केले. या वेबिनारचे सूत्रसंचालन गोव्याच्या पत्रसूचना कार्यालयाचे उपसंचालक, विनोद कुमार यांनी केले. यावेळी तज्ञांनी प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे देखील दिली.

वेबिनार बघण्यासाठी येथे क्लिक करा here.

 

 

JPS/RA/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1808124) Visitor Counter : 4520


Read this release in: English , Kannada