सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
बनावट खादी उत्पादनांची निर्मिती आणि विक्री यांचा परिणाम
Posted On:
21 MAR 2022 7:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मार्च 2022
काही अनधिकृत विक्री केंद्रातून खादीच्या नावावर बनावट किंवा खादी नसलेली उत्पादने विकली जात असल्याच्या प्रकारांची खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने गंभीर दखल घेतली असून कडक कारवाईसाठी अशा प्रकारच्या घटनांकडे आयोग लक्ष ठेवून आहे. जानेवारी 2022 पर्यंत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने खादीच्या नावावर इतर उत्पादनांची विक्री करणाऱ्या विक्री केंद्रांना या संदर्भात 2172 नोटीस पाठवल्या होत्या. साधारण 500 केंद्रांनी अजाणतेपणाने खादी ट्रेडमार्कचा वापर केल्याबद्दल माफी मागितली आणि अशी उत्पादने त्यांच्या उत्पादनांच्या यादीतून तसेच संकेतस्थळावरून हटवली. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने बाजारपेठेतील बनावट खादी उत्पादनांची निर्मिती आणि विक्री यांच्या परिणामांबद्दल कोणताही अभ्यास अद्याप हाती घेतलेला नाही.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने आत्तापर्यंत वेगवेगळ्या संस्थांवर आपल्या व्यापारी मुद्रेच्या उल्लंघनाबाबत 9 खटले दाखल केले आहेत आणि बहुसंख्य दाव्यांमध्ये या उल्लंघनाविरोधात अंतरिम आदेश मिळवला आहे.
खादी या व्यापारी मुद्रेच्या गैरवापराबद्दल केलेल्या दाव्यांची माहिती खालील प्रमाणे :
1 खादी इसेन्शियल्स, दिल्ली
2 आय वेअर खादी, उत्तर प्रदेश
3. खादी डिझाईन कौन्सिल ऑफ इंडिया, उत्तर प्रदेश
4 जे बी एम आर इंटरप्राईजेस व खादी प्राकृतिक पेन्ट, उत्तर प्रदेश
5.गिरधर खादी, हरियाणा
6.खादी बाय हेरिटेज, दिल्ली
या संस्थांवर दिल्ली उच्च न्यायालयात खटला भरला आहे.
1. फॅब इंडिया, मुंबई महाराष्ट्र
2. इंडिया खादी फॅशन, महाराष्ट्र
3. खादी स्टोअर, पहनावा, महाराष्ट्र आणि राजस्थान
या संस्थांवर मुंबई उच्च न्यायालयात खटला भरला आहे.
बनावट खादी उत्पादनांची निर्मिती आणि विक्री यांच्या विरोधात खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने पुढील पावले उचलली आहेत.
1. वस्त्र आणि वस्त्र उत्पादने यांच्याशी संबंधित वर्ग 24 आणि 25 यांच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक उत्पादनांसाठी खादी या शब्दाच्या वापरासाठी व्यापार-मुद्रा नोंदणी प्राप्त केली आहे.
2. अप्रत्यक्ष वापरकर्त्याकडून होणाऱ्या व्यापार मुद्रेच्या उल्लंघनाची दखल घेऊन त्याची प्रत्यक्ष कारवाई म्हणून अनधिकृत वापरकर्त्यांना कायदेशीर नोटीस पाठवणे या कामासाठी खादी आणि ग्रामोद्योग विकास आयोगाने सात व्यापार-मुद्रा सल्लागारांची नेमणूक केली आहे.
3. खादी ग्रामोद्योग आयोग आपल्या ई-कॉमर्स मंच आणि समाज माध्यमांवरुन बनावट खादी उत्पादनांच्या ऑनलाईन विक्री संदर्भातील सर्व लिंक्स सातत्याने हटवते. आत्तापर्यंत ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, युट्यूब आदी माध्यमांवरून खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने 2487 लिंक्स हटवल्या आहेत.
4. अप्रत्यक्ष वापरकर्त्यांकडून खादी या शब्दाच्या व्यापार मुद्रेच्या नोंदणीसाठी केलेल्या अर्जासंदर्भात खादी आणि ग्रामोद्योग आयोग विरोध नोंदवतो. अशा नोंदणीला आत्तापर्यंत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने 162 वेळा हरकत घेतली आहे.
5. अप्रत्यक्ष वापरकर्त्याने आधीच नोंदणीकृत केलेल्या व्यापारी मुद्रेत खादी हा शब्द असेल तर खादी आणि ग्रामोद्योग आयोग हा व्यापारी मुद्रेशी संबंधित अधिकारी संस्थांकडून स्पष्टीकरण मागवतो. आत्तापर्यंत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने स्पष्टीकरणांसाठी 43 अर्ज केले आहेत.
सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री भानु प्रताप सिंग बर्मा यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
S.Patil/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1807853)