रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

तंत्रज्ञानाचा कुशलतेने वापर करत सामाजिक भान, सामाजिक जबाबदारी आणि सामाजिक जागृतीसह सामाजिक उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन


नितीन गडकरी यांच्या हस्ते मुंबई येथे सीएसआर जर्नल उत्कृष्टता पुरस्कार प्रदान

Posted On: 20 MAR 2022 3:51PM by PIB Mumbai

 

समाजातील वंचित घटकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी आणि सामाजिक उद्यमशीलता अत्यंत महत्वाची आहे, असा मुद्दा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अधोरेखित केला आहे. सामाजिक उद्यमशीलततेला प्रोत्साहन देतांना, सामाजिक भान, सामाजिक जबाबदारी आणि सामाजिक जनजागृती करण्याची गरज आहे, तसेच हे करतांना तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर कारायला हवा, असेही त्यांनी सांगितले.

सामाजिक क्षेत्रांत तंत्रज्ञानाचा कुशल वापर करत, लोकांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी मदत केली जावी. राजकारणाची भूमिका विशद करतांना ते म्हणाले सामाजिक आर्थिक परिवर्तनासाठी, राजकारणाचा उपयोग व्हायला हवा. आज,  20 मार्च 2022 रोजी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण केंद्रात झालेल्या सीएसआर जर्नल उत्कृष्टता पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी- म्हणजेच सीएसआर क्षेत्रात उल्लेखनीय, अभिनव आणि उत्तम कामगिरी केल्याबद्दल, 2021 चे उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आले. मानवतेच्या कल्याणासाठी विशेष उपक्रम राबवणाऱ्या व्यक्ति आणि संस्थांना सात श्रेणीत हे पुरस्कार देण्यात आले. कृषी आणि ग्रामविकास, कोविड-19 दरम्यान केलेले मदतकार्य, शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण, पर्यावरण, आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता, क्रीडा तसेच महिला सक्षमीकरण आणि बालकल्याण अशा क्षेत्रांत हे पुरस्कार प्रदान केले गेले.

राज्यपाल, भगत सिंह कोश्यारी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.

उपास्थितांना संबोधित करताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले, की नागरिकांच्या सामाजिक जबाबदाऱ्या हा देखील महत्वाचा मुद्दा आहे आणि तो कॉर्पोरेट सामाजिक जबाबदरीसोबत जोडला गेला पाहिजे. ते म्हणाले की प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देणे ही देखील आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी बनायला हवी. जर आपण प्रादेशिक भाषा अन्य बोलीभाषेत कामकाज केले तर त्याचा लोकांना अधिक फायदा होईल, कोश्यारी म्हणाले. भारत सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत प्रत्येक घरात शौचालय बांधण्यात सहकार क्षेत्राच्या भूमिकेची राज्यपालांनी प्रशंसा केली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी समाजातील वंचित घटकांमध्ये महत्त्वपूर्ण सामाजिक-आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यास मदत करत आहे. आपण असे काम केले पाहिजे की ज्यांना एकदा आपली मदत मिळाल्यानंतर त्यांना भविष्यात आयुष्यभर कोणत्याही मदतीची आवश्यकता पडणार नाही.

देशात 115 आकांक्षी जिल्हे आहेत, जे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत. ते म्हणाले की या जिल्ह्यांतील लोकांच्या कल्याणासाठी, उत्थानासाठी जे लोक आणि ज्या संस्था काम करत आहेत त्यांना कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी क्षेत्राने विशेष प्रोत्साहन दिले पाहिजे, असे नितीन गडकरी यांनी उपस्थितांना सांगितले.

ज्ञानाचा उपयोग करून कचऱ्याचे संपत्तीत रूपांतर करण्याचे महत्त्व गडकरी यांनी अधोरेखित केले.  नवनिर्माण, उद्योजकता, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन कौशल्य अशा यशस्वी पद्धतींना आपण ज्ञान असे म्हणतो. ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करणे भविष्यासाठी आवश्यक आहे. कचऱ्याचे संपत्तीमध्ये रूपांतर करणे, हे योग्य तंत्रज्ञान आणि नेतृत्वाच्या सुयोग्य दृष्टीवर अवलंबून आहे.

सुमारे 8 वर्षांपूर्वी गडकरी यांनी नागपूरच्या महापौरांना सांडपाणी विकणार असल्याचे सांगितले होते याची आठवण करुन दिली. आज या माध्यमातून 50 लाख रुपयांचे उत्पन्न जिल्हयाला मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली.  राज्यातील वीज प्रकल्पांना शुद्ध केलेले सांडपाणी विकून वर्षाला 315 कोटी रुपये मिळत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

गडकरी यांनी सांगितले की, सरकारने 10% रबराचा कचरा आणि टाकाऊ प्लास्टिक रस्ते निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या बिटुमेनसाठी बंधनकारक केले आहे. ते म्हणाले की, महिला बचत गटांना हा प्लॅस्टिकचा कचरा आणि बिटुमेन रस्त्यावर वापरण्याच्या कामात जोडले जात आहे, ज्यामुळे कचऱ्यापासून संपत्तीची ‌ निर्मिती करणे शक्य होईल.

गडकरी यांनी आणखी एक उदाहरण दिले, की तिरुपती येथून केसांची खरेदी केली जात आहे, ज्याचा वापर करून अमिनो ॲसिड आधारित सूक्ष्म अन्नद्रव्ये तयार केली गेली जात आहेत, जी पिकांसाठी अतिशय लाभदायक ठरत आहेत. "अशा अनेक संधी आहेत जिथे तंत्रज्ञानाचा वापर समाजाच्या फायद्यासाठी केला जाऊ शकतो," असे गडकरी म्हणाले. आर्थिक व्यवहार्यता आणण्यासाठी आणि लोकांची सेवा करण्यासाठी तंत्रज्ञान, नावीन्य, संशोधन आणि अनुभव यांचा वापर करून CSR निधी वापरणे आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला.

याप्रसंगी, सामाजिक परिवर्तन नेतृत्व पुरस्कार राज्याचे माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान करण्यात आला. ते या कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेट प्रशासक दिलीप वेंगसरकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सयाजी शिंदे यांना जबाबदार चित्रपट अभिनेता आणि पर्यावरणसंवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आला. ऍडफॅक्टरचे व्यवस्थापकीय संचालक मदन बहल यांना जनसंपर्क क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रकाश आमटे आणि श्रीमती मंदाकिनी आमटे आणि स्त्री मुक्ती संघटनेच्या ज्योती म्हापसेकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. मारीवाला हेल्थ इनिशिएटिव्हचे संचालक राज मारीवाला यांना युथ आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मालविका अय्यर यांना इन्स्पायरिंग यंग चेंजमेकर अवॉर्ड आणि तन्मय भट यांना इन्फ्लुएंसिंग यूथ आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

पुरस्कार सोहळा पाहण्यासाठी इथे क्लिक करा

***

S.Thakur/R.Aghor/S.Patgaonkar/P.Ko

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1807421) Visitor Counter : 396


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil