सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 निमित्त महिलांसाठी विशेष उद्योजकता प्रोत्साहन मोहीम – “समर्थ” चा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला प्रारंभ

Posted On: 07 MAR 2022 7:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 मार्च 2022

 

आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 निमित्त, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री, नारायण राणे आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री, भानू प्रताप सिंग वर्मा यांनी आज नवी दिल्ली येथे महिलांसाठी विशेष उद्योजकता प्रोत्साहन मोहीम - "समर्थ" चा प्रारंभ केला. यावेळी सचिव (एमएसएमई), सहाय्यक सचिव आणि विकास आयुक्त (एमएसएमई), अध्यक्ष (खादी आणि ग्रामोद्योग आयोग), मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि महिला उद्योजक उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात महिलांचे अभिनंदन करताना, नारायण राणे म्हणाले की एमएसएमई क्षेत्र महिलांसाठी भरपूर संधी उपलब्ध करून देते आणि एमएसएमई मंत्रालय आपल्या योजना आणि उपक्रमांद्वारे मंत्रालयाद्वारे राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये महिलांसाठी अनेक अतिरिक्त फायदे देऊन महिलांमध्ये उद्योजकता संस्कृती विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. राणे यांनी महिलांसाठी विशेष उद्योजकता प्रोत्साहन मोहिम - "समर्थ" ची घोषणा केली. जी महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी देऊन आत्मनिर्भर आणि स्वयंरोजगाराच्या संधी प्रदान करण्यासाठी मंत्रालयाद्वारे राबविण्यात येत आहे.

एमएसएमई मंत्रालयाने एमएसएमई क्षेत्रात महिलांच्या अधिक सहभागाची कल्पना केली आहे आणि त्यामुळे उद्योजकतेला चालना देण्यासाठी कठोर परिश्रम घेतले जातील असे भानू प्रताप म्हणाले. आज स्त्रिया जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात  अतुलनीय कामगिरी करत आहेत आणि भविष्याबाबत  त्या आशावादी आहेत. सरकारच्या वाढत्या सहाय्यक उपक्रमांमुळे, आम्ही एकत्रितपणे भारताच्या भविष्यात एका नवीन युगाची सुरुवात करू शकतो.

मंत्रालयाच्या समर्थ उपक्रमांतर्गत, इच्छुक आणि विद्यमान महिला उद्योजकांना खालील फायदे उपलब्ध होतील:

  • मंत्रालयाच्या कौशल्य विकास योजनांतर्गत आयोजित मोफत कौशल्य विकास कार्यक्रमात 20% जागा महिलांसाठी दिल्या जातील. 7500 हून अधिक महिलांना याचा लाभ होणार आहे.
  • मंत्रालयाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विपणन सहाय्य योजनांअंतर्गत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांना पाठवण्यात येणाऱ्या  एमएसएमई व्यवसाय प्रतिनिधींपैकी 20% महिलांच्या मालकीच्या एमएसएमईंना समर्पित केले जातील.
  • राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाच्या व्यावसायिक योजनांच्या वार्षिक प्रक्रिया शुल्कावर 20% सूट
  • उद्यम नोंदणी अंतर्गत महिलांच्या मालकीच्या एमएसएमई च्या नोंदणीसाठी विशेष मोहीम

या उपक्रमाद्वारे, एमएसएमई मंत्रालय महिलांना कौशल्य विकास आणि बाजार विकास सहाय्य देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. ग्रामीण आणि निम शहरी भागातील 7500 पेक्षा जास्त महिला उमेदवारांना आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये प्रशिक्षित केले जाईल. याशिवाय हजारो महिलांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये त्यांची उत्पादने मांडत विपणनाच्या संधी मिळणार आहेत.

तसेच, सार्वजनिक खरेदीमध्ये महिला उद्योजकांचा सहभाग वाढवण्यासाठी, 2022-23 या वर्षात राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाच्या खालील व्यावसायिक योजनांच्या वार्षिक प्रक्रिया शुल्कावर 20% ची विशेष सवलत देखील दिली जाईल:

  • सिंगल पॉइंट नोंदणी योजना
  • कच्चा माल सहाय्य आणि बिल डीस्काउंटिंग
  • निविदा विपणन
  • B2B पोर्टल msmemart.com

आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यासाठी, एमएसएमई मंत्रालयाने राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ आणि इंडिया SME फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने “महिला उद्योजकांचे सक्षमीकरण” ही एक आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली या परिषदेचे आयोजन विद्यमान आणि महत्त्वाकांक्षी भारतीय महिला उद्योजकांना जगभरातील विविध भागांतील सर्वात यशस्वी महिला उद्योजकांचे अनुभव आणि उद्योजकीय प्रवास तसेच आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांसोबत उद्योजकतेतील सर्वोत्तम पद्धती आणि नवोन्मेषावर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आले आहे. मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचे सर्वसमावेशक सादरीकरणही मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले.

 
* * *

N.Chitale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1803691) Visitor Counter : 448


Read this release in: English , Urdu , Hindi