अर्थ मंत्रालय
राष्ट्रीय सीमाशुल्क, अप्रत्यक्ष कर आणि नार्कोटिक्स (एनएएसआयएन) प्रशिक्षण अकादमीची उभारणी 2024 पर्यंत पूर्ण होईल- निर्मला सीतारामन
ही संस्था जागतिक मानकांच्या अनुरूप असेल
सप्टेंबर 2023 पासून भारतीय महसूल सेवेतील प्रशिक्षणाधीन अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरु होणार
Posted On:
05 MAR 2022 10:11PM by PIB Mumbai
जागतिक दर्जाच्या मानकांशी अनुरूप, राष्ट्रीय सीमाशुल्क, अप्रत्यक्ष कर आणि अंमली पदार्थ विरोधी नार्कोटिक्स (एनएएसआयएन) प्रशिक्षण अकादमीची उभारणी 2024 पर्यंत पूर्ण होईल, असे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. अकादमीसाठी पहिल्या टप्प्यात 729 कोटी रुपये खर्च केले जाणार असून त्यासाठीच्या आवश्यक निधीचे वितरण यापूर्वीच करण्यात आले आहे, असे केंद्रीय मंत्री म्हणाल्या.
आंध्रप्रदेशमधील अनंतपूर जिल्ह्यातील गोरंटला मंडळातील पलासमुद्रम गावात राष्ट्रीय सीमाशुल्क, अप्रत्यक्ष कर आणि अंमली पदार्थ विरोधी विभाग (एनएएसआयएन) प्रशिक्षण अकादमीच्या कामांचा प्रारंभ करताना आयोजित भूमिपूजन कार्यक्रमात सीतारामन यांनी सहभाग घेतला.
आंध्र प्रदेश राज्याच्या विभाजनाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनएएसआयएन अकादमी स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते,याचे स्मरण केंद्रीय वित्तमंत्र्यानी यावेळी बोलताना करून दिले.
एप्रिल 2015 मध्ये तत्कालीन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी एनएएसआयएन अकादमीच्या स्थापनेच्या फलकाचे अनावरण केल्याची आठवणही त्यांनी करून दिली
पलासमुद्रम येथील एनएएसआयएन अकादमी सप्टेंबर 2023 पासून भारतीय महसूल सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देईल, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी अकादमीसाठी जमीन देणाऱ्या दोन्ही गावातील शेतकऱ्यांचे विशेष आभार मानले.निधीची कमतरता न भासता अकादमीचे बांधकाम विनाअडथळा होईल हे सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलली जातील असे सांगत अकादमीचे काम पूर्ण झाल्यावर हिंदूपुरम आणि पलासमुद्रम भागाचा आणखी विकास होईल अशी अशा केंद्रीय वित्तमंत्र्यांनी व्यक्त केली.
***
Jaydevi PS/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1803324)
Visitor Counter : 180