वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रशियाला होणाऱ्या निर्यात व्यवहारांसाठीचे संरक्षण काढून घेतलेले नाही : ईसीजीसी


रशियाला निर्यात होणाऱ्या मालावर संरक्षण हवे असल्यास सेवा शाखेशी संपर्क करण्याचे ग्राहकांना आवाहन

Posted On: 28 FEB 2022 7:50PM by PIB Mumbai

मुंबई, 28 फेब्रुवारी 2022

 

रशियाला होणाऱ्या निर्यात व्यवहारांसाठीचे संरक्षण काढून घेतलेले नाही, असे स्पष्टीकरण निर्यात पतपुरवठा हमी महामंडळाने (ECGC) दिले आहे. महामंडळाने 25 फेब्रुवारी रोजी जरी केलेल्या परिपत्रकानुसार रशियाबरोबरच्या निर्यात व्यवहारांवरील संरक्षण काढून घेतल्याच्या बातम्या विविध माध्यमांमधून प्रसारित झाल्या आहेत, परंतु त्यात तथ्य नसल्याचे महामंडळाने म्हटले आहे.

निर्यात पतपुरवठा हमी महामंडळाने सध्याच्या परिस्थितीवर आधारित व अंडररायटिंग धोरणानुसार  रशियाच्या जोखीम क्रमवारीचा आढावा घेतला होता. त्यानुसार रशियाची आतापर्यंत असलेली ‘खुले संरक्षण’ श्रेणी बदलून ती 25 फेब्रुवारीपासून ‘मर्यादित संरक्षण- 1’ (RCC -1) अशी करण्यात आली आहे. या श्रेणीनुसार साधारणतः एक वर्षासाठी लागू असलेल्या मर्यादा प्रत्येक व्यवहाराच्या स्वरूपानुसार (case to case basis) स्वतंत्रपणे मंजूर केल्या जातील.

या बदलामुळे महामंडळाला  निर्यात पतपुरवठा विमा पॉलिसीने संरक्षण दिलेल्या प्रत्येक निर्यात व्यवहारातील जोखमीचे मूल्यांकन व देखरेख स्वतंत्रपणे करता येईल व जोखमीची तीव्रता कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करता येतील. या प्रक्रियेमुळे भारतातील निर्यातदारांना तसेच बँकांना देखील कल्पना येईल  की रशियातील ग्राहक व बँकांकडून मालाच्या किमतीची वसुली कधीपर्यंत व किती प्रमाणात होऊ शकेल.

रशियाला मालाची निर्यात करणाऱ्या  निर्यातदारांनी त्यांच्या  मालावर विमा संरक्षण मिळवण्यासाठी महामंडळाच्या सेवा शाखांशी संपर्क करावा असा सल्ला, महामंडळाने सर्व ग्राहकांना दिला आहे. 

निर्यात पतपुरवठा हमी महामंडळ (ECGC) सद्यपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहे व पुढील घडामोडींचे निरीक्षण करून आपल्या अंडररायटिंग धोरणात योग्य तो बदल करेल असे महामंडळाने म्हटले आहे.


* * *

R.Aghor/U.Raikar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1801889) Visitor Counter : 206


Read this release in: English , Urdu , Hindi