परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने आयोजित क्रीडा सांस्कृतिक महोत्सव सप्ताहाचा सांगता सोहळा आणि पारितोषिक वितरण कार्यक्रम मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत संपन्न


देशात येणाऱ्या पाहुण्यांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी परराष्ट्र व्यवहार विभागातील कर्मचार्यांनी मिशन मोडवर काम करावे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आवाहन

Posted On: 28 FEB 2022 12:35PM by PIB Mumbai

मुंबई दि फेब्रुवारी 28,2022

परराष्ट्र व्यवहार  मंत्रालय हा देशाचा  अतिशय महत्वाचा विभाग असून विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या  चांगल्या कार्यामुळे देशाची प्रतिमा तयार होते असे सांगत  नागरिक तसेच देशात येणाऱ्या पाहुण्यांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी विभागातील कर्मचार्यांनी मिशन मोडवर काम करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त परराष्ट्र मंत्रालयाच्या मुंबईतील विभागीय पारपत्र कार्यालय, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद, प्रवासी संरक्षक विभाग तसेच परराष्ट्र मंत्रालयाच्या विभागीय शाखा सचिवालयातर्फे क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाची  सांगता सोहळा  आणि बक्षीस वितरण  कार्यक्रम राज्यपालांच्या उपस्थितीत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई  इथे रविवारी संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एक कविसंमेलन ही  आयोजित करण्यात आले होते. राज्यपालांच्या हस्ते   विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली  तसेच विदेश भवनाच्या कर्मचाऱ्यांचाही त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार यावेळी   करण्यात आला

 यावेळी   राज्यसभेचे सदस्य विनय सहस्रबुद्धे , मुंबईचे पालकमंत्री असलम  शेख , भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, फिटनेस तज्ञ  डॉ.  मिकी मेहता या मान्यवरांसह क्षेत्रीय पारपत्र अधिकारी डॉ राजेश गवांडे, प्रवासी संरक्षक अधिकारी राहुल बऱ्हाट, भारतीय संस्कृती संबंध परिषदेच्या विभागीय संचालिका रेणू प्रिथियानी व परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी, कर्मचारी तसेच  सामान्य जनता उत्साहाने सहभागी झाले होते.

करोनाच्या कठीण काळात या परराष्ट्र मंत्रालयाने अतिशय कुशलतेने काम केले आणि आताही युक्रेन येथे उद्भवलेल्या परिस्थितीत भारतीय लोकांना सुरक्षित  परत  आणण्यासाठी चांगले काम करीत आहे अशा  शब्दात राज्यपालानी  विभागाच्या कामाचा गौरव केला.

देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे मुंबई येथे अनेक राष्ट्रप्रमुख, विदेशातील प्रांतीय मुख्यमंत्री, संसद सदस्य, राजदूत आणि उद्योजक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे मुंबईतील परराष्ट्र मंत्रालय विभाग दिल्लीपेक्षाही अधिक सक्रिय असतो , असे सांगत  या मंत्रालयातील लोक किती तत्परतेने आणि लोकाभिमुखतेने काम करतात यावर देशाच्या परराष्ट्र नीतीचे यश अवलंबून असते असे राज्यपाल  म्हणाले.

दिवंगत सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्री असताना सामान्य नागरिकांना त्वरित प्रतिसाद देणारी प्रणाली विकसित केली होती असे सांगून या प्रणालीच्याही पुढे जाऊन परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी आणि  कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सौजन्यपूर्ण सेवा दिली तर तो विभाग आदर्श विभाग म्हणून प्रस्थापित होईल असे राज्यपालांनी सांगितले.

विदेश भवन हे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे एकात्मिक कार्यालय असून प्रादेशिक पारपत्र कार्यालय , शाखा सचिवालय,  भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद आणि  प्रवासी संरक्षक कार्यालय(प्रोटेक्टरेट ऑफ इमिग्रण्टस ) ही  चार कार्यालये  त्याअंतर्गत समाविष्ट  आहेत .

***

JPS/SK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1801769) Visitor Counter : 181


Read this release in: English