पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (86वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

Posted On: 27 FEB 2022 11:34AM by PIB Mumbai

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. मन की बात मध्ये पुन्हा आपले स्वागत आहे. आज मन की बातची सुरूवात आम्ही भारताच्या यशस्वीतेच्या उल्लेखानं करणार आहोत. या महिन्याच्या सुरूवातीला, भारत इटलीतून आपला एक बहुमूल्य असा वारसा आणण्यात यशस्वी झाला आहे. हा वारसा आहे अवलोकितेश्वर पद्मपाणिची हजार वर्षांहूनही प्राचीन अशी मूर्ति. ही मूर्ति काही वर्षांपूर्वी, बिहारच्या गयाजी मधील देवीचे स्थान कुंडलपूर मंदिरातनं चोरीस गेली होती. परंतु भरपूर प्रयत्न करून अखेर भारताला ही मूर्ति परत मिळाली आहे. अशीच काही वर्षांपूर्वी तमिळनाडूच्या वेल्लूरहून भगवान अंजनेय्यर, हनुमानाची मूर्ति चोरीस गेली होती. हनुमानाची ही मूर्तिसुद्धा 600 ते 700 वर्ष प्राचिन होती. या महिन्याच्या सुरूवातीला, ऑस्ट्रेलियातून आम्हाला ही मूर्ति प्राप्त झाली असून आमच्या मोहिमेला ती मिळाली आहे. 

मित्रांनो, हजारो वर्षांच्या आमच्या इतिहासात, देशाच्या कानाकोपऱ्यात एकाहून एक सुरेख मूर्ति बनवल्या गेल्या, त्यात श्रद्धा होती, शक्ति होती, कौशल्यही होते आणि वैविध्यपूर्णतेने भरलेल्या होत्या. आमच्या प्रत्येक मूर्तिमध्ये तत्कालिन काळाचा प्रभाव दिसून येतो. या भारताच्या मूर्ति मूर्तिकलेचे दुर्मिळ उदाहरण तर होतेच, परंतु आमची श्रद्धा तिच्याशी जोडलेली होती. परंतु इतिहासात कित्येक मूर्ति चोरी होऊन देशाबाहेर जात राहिल्या. कधी या देशात तर कधी त्या देशात या मूर्ति विकल्या जात राहिल्या आणि त्यांच्यासाठी तर त्या फक्त कलाकृति होत्या. त्यांना त्यांच्या इतिहासाशी काही देणेघेणे नव्हते न श्रद्धेचे काही महत्व होते. या मूर्ति परत आणणे हे भारतमातेच्या प्रति आमचे कर्तव्य आहे. या मूर्तिंमध्ये भारताचा आत्मा, श्रद्धेचा अंश आहे. या मूर्तिंचे एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्वही आहे. ही जबाबदारी समजून भारताने आपले प्रयत्न वाढवले. आणि यामुळे चोरी करण्याची प्रवृत्ती जी होती, त्यांच्यामध्ये एक प्रकारची दहशत निर्माण झाली. ज्या देशांमध्ये या मूर्ति चोरी करून नेल्या गेल्या, त्यांनाही असे वाटू लागले की, भारताशी संबंधांमध्ये सौम्य शक्तिचा जो राजनैतिक प्रवाह असतो, त्याचे महत्वही खूप असू शकते. कारण या मूर्तिंशी भारताच्या भावना जोडल्या आहेत, भारताची श्रद्धा जोडलेली आहे आणि एक प्रकारे लोकांचे परस्परांमधील संबंधांमध्ये मोठी शक्ति निर्माण करतात. आपण काही दिवसांपूर्वीच पाहिले असेल, काशीहून चोरीला गेलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ति सुद्धा परत आणली गेली होती. हे भारताप्रति बदलत चाललेल्या जागतिक दृष्टिकोनाचे उदाहरण आहे. 2013 पर्यंत जवळपास 13 मूर्ति भारतात आणल्या गेल्या होत्या. परंतु, गेल्या सात वर्षांत 200 हून जास्त अत्यंत मौल्यवान मूर्तिंना भारताने यशस्वीपणे मायदेशी परत आणले आहे. अमेरिका, ब्रिटन, हॉलंड, फ्रान्स, कॅनडा, जर्मनी, सिंगापूर अशा कितीतरी देशांनी भारताच्या या भावना समजून घेऊन मूर्ति परत आणण्यात आमची मदत केली आहे. मी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जेव्हा अमेरिकेत गेलो होतो, तेव्हा मला अनेक प्राचीन अशी कित्येक मूर्ति आणि सांस्कृतिक महत्व असलेल्या अनेक वस्तु मिळाल्या. जेव्हा देशाचा मौल्यवान वारसा परत मिळतो, तेव्हा साहजिकच इतिहासावर श्रद्धा असलेले, पुराणवस्तु संग्रहावर श्रद्धा ठेवणारे, आस्था आणि संस्कृतिशी जोडलेले लोक आणि एक भारतीय या नात्याने आम्हाला सर्वांना आनंद होणे स्वाभाविक आहे. 

मित्रांनो, भारतीय संस्कृति आणि आपल्या वारशाची चर्चा मी करतो तेव्हा आज आपल्याला मन की बातमध्ये दोन व्यक्तिंशी तुमची ओळख करून देऊ इच्छितो. आजकालच्या दिवसात फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर टांझानियाचे दोन भाऊबहिण किली पॉल आणि त्यांची बहिण नीमा चर्चेत आहेत. आणि मला पक्का विश्वास आहे की, आपणही त्यांच्याबाबत जरूर ऐकलं असेल. त्यांच्यामध्ये भारतीय संगीताबाबत एक वेडच आहे, तीव्र आवड हे आणि याच कारणाने ते दोघेही अत्यंत लोकप्रिय आहेत. लिप सिंकच्या त्यांच्या पद्धतीवरून हे लक्षात येते की यासाठी ते किती प्रचंड प्रमाणात कष्ट घेतात. नुकतेच, आमच्या प्रजासत्ताक दिनी, आमचं राष्ट्रगीत जन गण मन गाताना त्यांचा व्हिडिओ भरपूर प्रमाणात पाहिला गेला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी लतादीदींचं गीत गाऊन त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली होती. मी या अद्भुत सर्जनशीलतेसाठी या दोघाही भाऊ बहिणींना किली आणि निमा यांची खूप प्रशंसा करतो. काही दिवसांपूर्वी, टांझानियामध्ये भारतीय वकिलातीत त्यांना सन्मानितही करण्यात आलं आहे. भारतीय संगीताचीच ही  जादू आहे की, सर्वांना तिची भुरळ पडते. मला आठवते, काही वर्षांपूर्वी जगात दीडशेहून अधिक देशांतल्या गायक आणि संगीतकारांनी आपापल्या देशांत, आपापल्या वेषभूषेमध्ये पूज्य बापूंना अत्यंत प्रिय असलेलं भजन वैष्णव जन गाण्याचा यशस्वी प्रयोग केला होता. 

आज जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, तेव्हा देशभक्तिपर गीतांच्या संदर्भात असे प्रयोग केले जाऊ शकतात. जेथे परदेशी नागरिकांना, त्यांच्या प्रसिद्ध गायकांना, भारतीय देशभक्तिपर गीतं गाण्यासाठी आमंत्रित केलं जावं. इतकंच नव्हे तर, टांझानियामधील किली आणि निमा भारताच्या गीतांना या प्रकारे लिप सिंक करू शकतात तर काय माझ्या देशात, आमच्या अनेक भाषांमधील अनेक प्रकारची गीतं आहेत, आम्ही गुजराती मुलं तमिळ गीतांवर तसं करू शकत नाही का, केरळची मुलं आसामी गीतांवर तसं करू शकतात, कन्नड मुलं  जम्मू-कश्मिरच्या गीतांवर लिप सिंक करू शकतात. असं एक वातावरण आपण बनवू शकतो, ज्यात एक भारत-श्रेष्ठ भारतचा अनुभव आम्ही घेऊ शकतो. इतकंच नव्हे तर, आम्ही स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव एक वेगळ्या पद्धतीनं अवश्य साजरा करू शकतो. मी देशातील नवतरूणांना आवाहन करतो की, या, भारतीय भाषांमधील जी लोकप्रिय गीतं आहेत, त्यावर आपण आपल्या पद्धतीनं व्हिडिओ बनवा, खूप लोकप्रिय होऊन जाल आपण. आणि देशातल्या वैविध्याची ओळख नव्या पिढीला होईल. 

माझ्या प्रिय देशवासियांनो, आताच काही दिवसांपूर्वी आपण मातृभाषा दिन साजरा केला. जे विद्वान आहेत, ते मातृभाषा शब्द कुठून आला, त्याची उत्पत्ती कशी झाली, यावर खूपशी पांडित्यपूर्वक माहिती देऊ शकतील. मी तर मातृभाषेबद्दल इतकंच म्हणेन की, जसे आपलं जीवन आपली आई घडवत असते, तसंच आपली मातृभाषा आपलं  जीवन घडवत असते. आई आणि मातृभाषा, दोन्ही मिळून जीवनाचा पाया मजबूत करतात, चिरस्थायी करतात. जसं आपण आपल्या आईला सोडू शकत नाही, तसंच आपल्या मातृभाषेलाही सोडू शकत नाही. मला खूप वर्षांपूर्वीची एक गोष्ट आजही लक्षात आहे. जेव्हा मला अमेरिकेला जाणं भाग पडलं तेव्हा, वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये जाण्याची संधी मिळत असे. एकदा मला तेलुगू कुटुंबात जाण्याची संधी मिळाली आणि मला एक आनंददायक दृष्य दिसलं. त्यांनी मला सांगितलं की, आम्ही कुटुंबासाठी एक नियम तयार केला आहे. कितीही काम असो, परंतु आम्ही शहराच्या बाहेर जर आम्ही नसू तर कुटुंबातील सर्व सदस्य रात्रीचं जेवण टेबलवर एकत्र बसूनच घेणार. आणि दुसरा नियम म्हणजे रात्रीच्या जेवणाच्या टेबलवर सारे सदस्य तेलुगूतच बोलतील. जी मुलं त्या कुटुंबात जन्माला आली होती, त्यांनाही हाच नियम लागू होता. आपल्या मातृभाषेप्रति त्यांचं हे प्रेम पाहून मी या कुटुंबामुळे खूपच  प्रभावित झालो. 

मित्रांनो,

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही काही लोक एक प्रकारच्या मानसिक द्वंद्वात जगत आहेत ज्यामुळे त्यांना आपली भाषा, आपला पोषाख, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी याबद्दल एक प्रकारचा संकोच वाटतो. जगात इतरत्र खरेतर असं कुठंच नाही. आमची मातृभाषा आहे, आम्ही ती गर्वानं बोलली पाहिजे. आणि आमचा भारत तर भाषांच्या बाबतीत इतका समृद्ध आहे की त्याची तुलनाच होऊ शकत नाही. आमच्या भाषांचे सर्वात मोठं सौदर्य हे आहे की, कश्मिरहून कन्याकुमारीपर्यंत, कच्छहून कोहिमापर्यंत शेकडो भाषा, हजारो बोली  भाषा या एकमेकांपेक्षा वेगळ्या असल्या तरीही एकदुसरीमध्ये रचलेल्या आणि समाविष्ट झालेल्या आहेत. भाषा अनेक आहेत पण भाव एकच आहे. कित्येक शतकांपासून आमच्या भाषा एक दुसऱ्याकडून स्वतःला अत्याधुनिक बनवत आल्या आहेत, एक दुसरीचा विकास करत आहेत. भारतातली तमिळ भाषा ही जगातली सर्वात प्राचीन भाषा आहे आणि याचा प्रत्येक भारतीयाला गर्व असला पाहिजे की जगातील इतकी मोठी परंपरा आमच्याकडे आहे. याच प्रकारे जितके प्राचीन धर्मशास्त्रं आहेत, त्यांची अभिव्यक्तिसुद्धा आमची संस्कृत भाषाच आहे. भारतीय लोक जवळपास 121 मातृभाषांमध्ये जोडले गेले आहेत, याचा आम्हाला अभिमान असला पाहिजे आणि यातील 14 भाषा तर अशा आहेत ज्या एक कोटीहून अधिक लोक दैनंदिन आयुष्यात बोलतात. म्हणजे, जितकी युरोपियन देशांची एकूण लोकसंख्या नाही, त्यापेक्षा जास्त लोक आमच्या विविध 14 भाषांशी जोडले गेले आहेत. सन 2019 मध्ये, हिंदी जी जगातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा ती भाषांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होती. याचाही प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे. भाषा ही केवळ अभिव्यक्तिचं माध्यम नाही तर भाषा, समाजाची संस्कृति आणि परंपरांना वाचवण्याचं काम करत असते. आपल्या भाषेच्या परंपरेला वाचवण्याचं काम सुरीनामचे सुरजन परोहीजी करत आहेत. या महिन्याच्या 2 तारखेला ते 84 वर्षांचे झाले आहेत. त्यांचे पूर्वजही कित्येक वर्षे पूर्वी, हजारो कामगारांच्या बरोबर, रोजीरोटीसाठी सुरीनामला गेले होते. सुरजन परोही हिंदीमध्ये खूप चांगल्या कविता करतात आणि तेथे त्यांचं नाव राष्ट्रीय कविंमध्ये घेतलं जातं. म्हणजे, आजही त्यांच्या ह्रदयात भारत असतो आणि त्यांच्या कार्याला हिंदुस्तानी मातीचा सुगंध आहे. सुरीनामच्या नागरिकांनी सुरजन परोहीजी यांच्या नावे एक संग्रहालय बनवले आहे. 2015 मध्ये त्यांना सन्मानित करण्याची संधी मला मिळाली होती, ही माझ्यासाठी अत्यंत सुखद गोष्ट आहे. 

मित्रांनो, आजच्या दिवशी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन आहे. सर्व मराठी बंधु भगिनींना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 

हा दिवस मराठी कविवर्य विष्णु वामन शिरवाडकरजी, श्रीमान कुसुमाग्रज यांना समर्पित आहे. आजच कुसुमाग्रज यांची जयंतीही आहे. कुसुमाग्रज यांनी मराठीमध्ये कविता केल्या, अनेक नाटकं लिहीली आणि मराठी साहित्याला नवी उंची दिली. 

मित्रांनो, आमच्याकडे भाषेची  आपल्याच स्वतःची वैशिष्ट्ये आहेत, मातृभाषेचे स्वतःचे विज्ञान आहे.  हे विज्ञान समजून घेऊन, राष्ट्रीय शिक्षण धोरणात स्थानिक भाषेतनं शिकण्यावर जोर दिला गेला आहे. आमचे व्यावसायिक अभ्यासक्रमही स्थानिक भाषांमधून शिकवले जावेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत काळात या प्रयत्नांना आपण सर्वांनी मिळून वेग दिला पाहिजे.  हे स्वाभिमानाचं काम आहे. माझी अशी इच्छा आहे की, आपल्यातील जे कुणी मातृभाषा बोलतात, त्यांनी तिच्या वैशिष्ट्याबद्दल काही न काही जाणून घ्यावं आणि काही न काही तरी लिहावं. 

मित्रांनो, काही दिवसांपूर्वी, माझी भेट माझे मित्र आणि केनियाचे माजी पंतप्रधान राईला ओडिंगाजी यांच्याशी झाली.  ही भेट अत्यंत मनोरंजक तर होतीच पण अतिशय भावनाप्रधानही होती. आम्ही खूप चांगले मित्र झालो आणि मनमोकळेपणी खूप साऱ्या गप्पाही मारतो. जेव्हा आम्ही चर्चा करत होतो, तेव्हा ओडिंगाजींनी आपल्या कन्येच्या बाबतीत माहिती दिली. त्यांची कन्या रोझमेरीला मेंदूचा ट्यूमर झाला आणि यासाठी त्यांना आपल्या मुलीवर शस्त्रक्रिया करावी लागली होती. परंतु त्याचा दुष्परिणाम असा झाला की, रोझमेरीच्या डोळ्यांतील दृष्टि जवळजवळ गेली आणि तिला दिसणंच बंद झालं. आता आपण कल्पना करू शकाल की, त्यांच्या कन्येचे काय हाल झाले असतील आणि एक वडिल म्हणून त्यांची मनःस्थितीचा  अंदाज आपण लावू शकतो, त्यांच्या भावना समजू शकतो. त्यांनी जगभरातील रूग्णालयांमध्ये इलाज केले, जगातील एकही असा मोठा देश राहिला नसेल जेथे त्यांनी कन्येच्या इलाजासाठी भरपूर प्रयत्न केले नसतील. जगातील मोठमोठे देश त्यांनी पिंजून काढले, परंतु यश मिळालं नाही, एक प्रकारे त्यांनी साऱ्या आशा  सोडल्या आणि संपूर्ण घरात निराशेचं वातावरण पसरलं होतं. यातच कुणीतरी त्यांना भारतातील आयुर्वेदाच्या उपचारांकरता येण्याचं सुचवलं आणि खूप काही केलं होतं, उपाय करून थकलेही होते. त्यांनी विचार केला, एक वेळेला प्रयत्न करायला काय हरकत आहे. ते भारतात आले , केरळात एका आयुर्वेदिक रूग्णालयात त्यांनी आपल्या कन्येचे उपचार सुरू केले. भरपूर काळ कन्या देशात राहिली. आयुर्वेदाच्या या उपचारांचा असा परिणाम झाला की रोझमेरीची दृष्टि बऱ्याचशा प्रमाणात परत आली आहे. आपण कल्पना करू शकता की, कसे एक नवं आयुष्य मिळालं आणि प्रकाश तर रोझमेरीच्या जीवनात आला. परंतु पूर्ण कुटुंबात एक प्रकाश परत आला आणि ओडिंगाजी इतके भावनावश  होऊन मला ही गोष्ट सांगत होते. तसंच भारताच्या आयुर्वेदातील ज्ञान, विज्ञान केनियात नेण्याची त्यांची इच्छा आहे. जशा प्रकारे वनस्पती आयुर्वेदासाठी कामाला येतात, तसं त्या वनस्पतींची शेती करून त्याचा लाभ अधिकाधिक लोकांना देण्याकरता पूर्ण प्रयत्न करतील. 

मला तर हीच खूप आनंदाची गोष्ट आहे की आमची धरती आणि आमच्या पंरंपरेनं एखाद्याच्या जीवनातील इतकं मोठं संकट दूर झालं. हे ऐकून आपल्यालाही आनंद झाला असेल. कोण भारतवासी नसेल की ज्याला याचा अभिमान नसेल? आपल्याला सर्वांना हे माहितच आहे की ओडिंगाजीच नव्हे तर जगातील लाखो लोक आयुर्वेदापासून असेच लाभ घेत आहेत. 

आपल्या भूमीवरून आणि आपल्या परंपरेच्या माध्यमातून कोणाच्या तरी आयुष्यातून एवढं मोठं दुःख दूर झालं, ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. हे ऐकून तुम्हालाही नक्कीच आनंद होईल. कुठल्या भारतीयाला याचा अभिमान वाटणार नाही? केवळ ओडिंगाजीच नाही तर जगभरातील कोट्यवधी लोक आयुर्वेदापासून लाभान्वित होत आहेत, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे.

ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स हे सुद्धा आयुर्वेदाचे मोठे चाहते आहेत. मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटतो तेव्हा ते आयुर्वेदाचा उल्लेख नक्कीच करतात. भारतातील अनेक आयुर्वेदिक संस्थांचीही त्यांना माहिती आहे.

मित्रहो, गेल्या सात वर्षांत देशभरात आयुर्वेदाच्या प्रचारावर खूप लक्ष देण्यात आले आहे. आयुष मंत्रालयाच्या स्थापनेमुळे आपली पारंपारिक औषधे आणि आरोग्य पद्धती लोकप्रिय करण्याचा आमचा संकल्प आणखी दृढ झाला आहे. गेल्या काही वर्षांत आयुर्वेदाच्या क्षेत्रात अनेक नवीन स्टार्टअप उदयाला आले आहेत, याचा मला मनापासून आनंद आहे. या महिन्याच्या सुरुवातीला आयुष स्टार्ट-अप चॅलेंज सुरू झाले. या क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्ट-अप्सना ओळखणे आणि त्यांना पाठिंबा देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, अशी विनंती मी त्यांना करतो. 

मित्रहो, लोकांनी एकत्र येऊन काही करण्याचा निश्चय केला की ते विलक्षण गोष्टी अगदी सहजपणे करतात. समाजात असे अनेक मोठे बदल घडून आले आहेत, त्यात लोकसहभाग आणि सामूहिक प्रयत्नांचा मोठा वाटा आहे. काश्मीरमधील श्रीनगरमध्ये ‘मिशन जल थल’ नावाची अशीच एक लोक चळवळ सुरू आहे. श्रीनगरमधील सरोवरे आणि तलाव स्वच्छ करून त्यांचे जुने वैभव पुन्हा मिळवून देण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे. “कुशल सार” आणि “गिल सार” वर“मिशन जल थल” उपक्रमाने लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये लोकसहभागासोबत तंत्रज्ञानाचीही मोठी मदत घेतली जाते आहे. कुठे अतिक्रमण झाले आहे, कुठे बेकायदेशीर बांधकामे झाली आहेत, याची माहिती घेण्यासाठी या भागाचे सर्वेक्षण करण्यात आले. प्लॅस्टिक कचऱ्याबरोबरच इतर कचराही स्वच्छ करण्याची मोहीम राबविण्यात आली. मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात जुन्या जलवाहिन्या आणि तलाव भरणारे 19 झरे पूर्ववत करण्यासाठीही खूप प्रयत्न करण्यात आले. या जीर्णोद्धार प्रकल्पाच्या महत्त्वाविषयी अधिकाधिक जनजागृती करण्यासाठी स्थानिक लोकांना आणि तरुणांना जलदूत बनवण्यात आले. आता येथील स्थानिक लोकही "गिल सार तलावामध्ये स्थलांतरित पक्षी आणि माशांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि ते पाहून आनंद होतो आहे. असे विलक्षण प्रयत्न करणाऱ्या श्रीनगरच्या जनतेचे मी मनापासून अभिनंदन करतो.

मित्रहो,आठ वर्षांपूर्वी देशाने हाती घेतलेल्या'स्वच्छ भारत मोहिमेची व्याप्तीही काळाच्या ओघात वाढत गेली, नवनवीन शोधांचीही भर पडत गेली. तुम्ही भारतात कुठेही गेलात तरी प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेसाठी काही ना काही प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येईल. आसाममधील कोक्राझारमध्ये सुरू असलेल्या अशाच एका प्रयत्नाबद्दल मला माहिती मिळाली आहे. मॉर्निंग वॉकर्सच्या एका गटाने या भागात'स्वच्छ आणि हरित कोक्राझार' मोहिमेअंतर्गत एक अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या सर्वांनी नवीन उड्डाणपूल परिसरातील तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याची स्वच्छता करून स्वच्छतेचा प्रेरक संदेश दिला. तसेच विशाखापट्टणममध्ये 'स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत पॉलिथिनऐवजी कापडी पिशव्यांचा प्रचार केला जात आहे. पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी येथील लोक एकल वापर प्लॅस्टिकच्या उत्पादनांविरोधात मोहीम राबवत आहेत. त्याचबरोबर हे लोक घरातील कचऱ्याचे वर्गिकरण करण्यासाठी जनजागृती करत आहेत. मुंबईच्या सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही आपल्या स्वच्छता मोहिमेला सौंदर्यीकरणाची जोड दिली आहे. त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकाच्या भिंतींवर सुंदर चित्रे काढलीआहेत. राजस्थानमधील सवाई माधोपूरमधल्या एका प्रेरणादायी उदाहरणाची माहितीही मला मिळाली आहे. तिथल्या तरुणांनी रणथंबोरमध्ये 'मिशन बीट प्लास्टिक' नावाची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत रणथंबोरच्या जंगलातून प्लास्टिक आणि पॉलिथिन हद्दपार करण्यात आले आहे.प्रत्येकाने प्रयत्न करावेत, या भावनेतून देशात लोकसहभाग मजबूत होतो आणि जेव्हा लोकसहभाग असतो, तेव्हा मोठी उद्दिष्टे नक्कीच पूर्ण होतात.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आजपासून अवघ्या काही दिवसांनी 8 मार्च रोजी जगभरात 'आंतरराष्ट्रीय महिला दिन'साजरा केला जाणार आहे. 'मन की बात' च्या माध्यमातून आम्ही महिलांच्या साहसाशी, कौशल्यांशी आणि प्रतिभेशी संबंधित अनेक उदाहरणे आपल्यासमोर आणत आहोत. आज स्किल इंडिया असो, सेल्फ हेल्प ग्रुप असो किंवा लहान-मोठे उद्योग असो, सर्व क्षेत्रात महिलांनी आघाडी घेतली आहे. जिथे पाहावे तिथे स्त्रिया जुने गैरसमज मोडीत काढत आहेत. आज आपल्या देशात संसदेपासून पंचायतीपर्यंत विविध क्षेत्रात महिला नवनवीन शिखरे गाठत आहेत. सैन्यातही आता मुली नव्या आणि मोठ्या भूमिकेत शिरून महत्वाची जबाबदारी पार पाडत आहेत आणि देशाचे रक्षण करत आहेत. अत्याधुनिक लढाऊ विमाने अगदी लिलया उडवणाऱ्या मुली आपण गेल्याच महिन्यात प्रजासत्ताक दिनी पाहिल्या आहेत. सैनिक शाळांमधील मुलींच्या प्रवेशावरील बंदीही देशाने हटवली असून, देशभरातील सैनिक शाळांमध्ये मुली प्रवेश घेत आहेत. स्टार्ट-अपच्या विश्वाकडे एक नजर टाका.गेल्या काही वर्षांमध्ये देशात हजारो नवीन स्टार्टअप सुरू झाले. यापैकी निम्म्या स्टार्टअप्समध्ये संचालकाच्या भूमिकेत महिला आहेत. अलीकडच्या काळात महिलांसाठी प्रसूती रजा वाढवण्यासारखे निर्णय घेतले गेले. मुलांना आणि मुलींना समान अधिकार देऊन लग्नाचे वय समान करण्याचा देश प्रयत्न करत आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत आहे. देशात आणखी एक मोठा बदल होत असल्याचे तुम्ही पाहत असाल. हा बदल म्हणजे आपल्या सामाजिक मोहिमांचे यश आहे. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' उपक्रमाचे यश बघा.आज देशातील लिंग गुणोत्तर सुधारले आहे. शाळेत जाणाऱ्या मुलींच्या प्रमाणातही सुधारणा झाली आहे. अशा वेळीआपल्या मुलींनी मध्येच शाळा सोडू नये, ही आपलीही जबाबदारी आहे. त्याचबरोबर ‘स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत उघड्यावर शौचास जावे लागण्यापासून देशातील महिलांची सुटका झाली आहे. तिहेरी तलाकसारख्या सामाजिक कुप्रथाही संपुष्टात येत आहेत. तिहेरी तलाकविरोधात कायदा अस्तित्वात आल्यापासून देशात तिहेरी तलाकच्या प्रकरणांमध्ये 80 टक्के घट झाली आहे. इतक्या कमी वेळात हे सर्व बदल कसे घडत आहेत? हा बदल होतो आहे कारण आता आपल्या देशातील बदलाचे आणि प्रगतीशील प्रयत्नांचे नेतृत्व महिला स्वतः करत आहेत.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, उद्या 28 फेब्रुवारी हा 'राष्ट्रीय विज्ञान दिन' आहे. हा दिवस रामन इफेक्टच्या शोधासाठी देखील साजरा केला जातो. वैज्ञानिक क्षेत्रातील आपला प्रवास समृद्ध करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे सीव्ही रमण यांच्या बरोबरीने मी अशा सर्वच शास्त्रज्ञांना आदरांजली वाहतो. मित्रहो, तंत्रज्ञानाने आपले आयुष्य अधिक सोपे आणि सुलभ करून आपल्या आयुष्यात मोलाचे स्थान प्राप्त केले आहे. कोणते तंत्रज्ञान चांगले आहे, कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर अधिक चांगला आहे, हे आपल्याला अगदी चांगले माहिती असते. पण त्या तंत्रज्ञानाला कशाचा आधार आहे, त्यामागचे शास्त्र काय आहे, हे आपल्या कुटुंबातील मुलांना समजले पाहिजे,याकडे आपले फारसे लक्ष जात नाही, हेही तितकेच खरे. या विज्ञान दिनानिमित्त मी सर्व कुटुंबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मुलांमध्ये वैज्ञानिक वृत्ती विकसित करण्यासाठी लहान प्रयत्नांपासून आवर्जून सुरूवात करावी.एखाद्याला दृष्टीदोष असेल आणि चष्मा लावल्यावर चांगले दिसू लागेल.मग अशा वेळी त्यामागे काय शास्त्र आहे, हे मुलांना सहज समजावून सांगता येईल. चष्मा लावला, आनंद झाला, इतके पुरेसे नाही. एका छोट्या कागदाचा वापर करून तुम्ही त्याला सांगू शकता. आता मुले मोबाईल फोन वापरतात, कॅल्क्युलेटर कसे काम करतो, रिमोट कंट्रोल कसे काम करते, सेन्सर्स म्हणजे काय, अशा विज्ञानाधारित गोष्टींचीही घरात चर्चा होते का? कदाचित घरातील रोजच्या वापरातील या गोष्टी आपण सहजपणे समजावून सांगू शकतो, आपण जे काही करत आहोत, त्यामागील शास्त्र काय आहे, ते सांगू शकतो. त्याचप्रमाणे, आपण मुलांना सोबत घेऊन आकाश पाहिले आहे का? रात्रीच्या वेळी ताऱ्यांबद्दल गप्पा झाल्याअसतील. आकाशात वेगवेगळी प्रकारची नक्षत्रे दिसतात, त्यांच्याबद्दल सांगा. असे करून तुम्ही मुलांमध्ये भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्राबद्दल उत्सुकता निर्माण करू शकता. आजकाल अनेक अॅप्स देखील आहेत, ज्यावरून तुम्ही तारे आणि ग्रह शोधू शकता किंवा आकाशात दिसणारा तारा ओळखू शकता, त्याबद्दल अधिक जाणून घेऊ शकता. आपल्या स्टार्ट-अप्सनी त्यांची कौशल्ये आणि वैज्ञानिक निपुणतेचा वापर राष्ट्र उभारणीशी संबंधित कामात करावा, असे मी सांगू इच्छितो. ही देशाप्रती आपली सामूहिक वैज्ञानिक जबाबदारी आहे. आभासी सत्याच्या आजच्या  जगात आपले स्टार्टअप्स खूपच छान काम करत आहेत, हे मी पाहतो आहे. आभासी वर्गांच्या आजच्या या काळात मुलांना डोळ्यासमोर ठेवून अशीच एक आभासी प्रयोगशाळाही बनवता येईल. अशा आभासी विकल्पाच्या माध्यमातून आपण मुलांना रसायनशास्त्र प्रयोगशाळेचा अनुभव घरबसल्या देऊ शकतो. शिक्षकांनी आणि पालकांनी सर्व विद्यार्थ्यांना आणि मुलांना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन द्यावे आणि त्यांच्यासोबत मिळून प्रश्नांची योग्य उत्तरे शोधावीत अशी विनंती मी करतो. कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारतीय शास्त्रज्ञांच्या भूमिकेचे आज मला कौतुक करायचे आहे. त्यांच्या कठोर परिश्रमांमुळेच भारतीय बनावटीची लस तयार करणे शक्य झाले, जी अवघ्या जगाच्या कामी आली. ही विज्ञानाने मानवाला दिलेली देणगी आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, यावेळीही आपण अनेक विषयांवर चर्चा केली. येत्या मार्च महिन्यात अनेक सण येत आहेत - महाशिवरात्र आहे आणि आता काही दिवसांनी तुम्ही सर्वजण होळीच्या तयारीला लागाल. होळी हा सण आपल्याला एकत्र आणणारा सण आहे. या सणात आप-पर, राग-लोभ, लहान-मोठे असे सर्व भेदभाव विसरून लोक एकत्र येतात. त्यामुळेच होळीच्या रंगापेक्षा होळीच्या प्रेमाचा आणि समरसतेचा रंग अधिक गहिरा असतो, असे म्हटले जाते. होळीमध्ये मिष्टान्नांबरोबरच नात्यांचाही अनोखा गोडवा वाढीला लागतो. ही नाती आपल्याला आणखी दृढ करायची आहेत. आणि केवळ आपल्या कुटुंबातील लोकांशीच नाहीत तर आपल्या विशाल कुटुंबाचा भाग असणाऱ्या सर्वांबरोबरची नाती आपल्याला दृढ करायची आहेत.  हे करण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. 'व्होकल फॉर लोकल' च्या माध्यमातून आपण आपले सण साजरे करायचे आहेत. आपण सण-उत्सवांच्या काळात स्थानिक उत्पादने खरेदी केली पाहिजेत, त्यामुळे आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या जीवनातही रंग भरले जातील, त्यांनाही चैतन्य लाभेल. ज्या उमेदीने आपला देश कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहे आणि पुढे जात आहे, त्यामुळे सण साजरे करण्याचा उत्साहही अनेक पटींनी वाढला आहे. याच उमेदीसह आपण आपले सण साजरे करायचे आहेत आणि त्याच बरोबर पुरेशी काळजीही घ्यायची आहे. मी आपणा सर्वांना येणाऱ्या सणांच्या अनेक शुभेच्छा देतो. तुमच्यागोष्टींची, पत्रांची, संदेशांची मी नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतो. खूप खूप धन्यवाद.

***

ST/SP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1801557) Visitor Counter : 503