ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
अखिल भारतीय घाऊक किंमतीनुसार उडीद डाळीच्या दरात 4.99 टक्के लक्षणीय घट झाल्याची नोंद
केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे डाळींच्या दरामध्ये कमालीची घसरण
सुरळीत आणि निर्वेध आयात सुनिश्चित करण्यासाठी केंद्राकडून 15 मे, 2021 पासून ‘मुक्त श्रेणी’ अंतर्गत तूर, उडीद आणि मूग आयात करण्यासाठी परवानगी
Posted On:
25 FEB 2022 9:05PM by PIB Mumbai
केंद्र सरकारने देशांतर्गत अन्नपदार्थांची उपलब्धता पुरेशी असावी आणि किंमती स्थिर रहाव्यात, यासाठी विविध उपाययोजना सक्रिय केल्या आहेत. या उपाययोजनांमुळे तूरडाळीच्या दरामध्ये कमालीची घसरण झाली आहे.
ग्राहक व्यवहार विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार दि. 25 फेब्रुवारी, 2022 रोजी नोंदविण्यात आलेल्या दरानुसार उडीद डाळीचा घाऊक दर 9410.58 प्रतिक्विंटल असा होता. तर याच डाळीचा दर एक वर्षापूर्वी म्हणजे दि. 25 फेब्रुवारी, 2021 रोजी 9904.39 प्रतिक्विंटल होता. म्हणजेच उडीद डाळीच्या दरामध्ये 4.99 टक्के घट नोंदवली गेली आहे.
त्याचप्रमाणे उडीद डाळीचा सरासरी घाऊक दर दि. 24.02.2022 रोजी 9444.06 प्रतिक्विंटल असा होता. तर हा दर दि. 24.0202021 रोजी 9896.95 प्रतिक्विंटल होता. या दरामध्ये 4.58 टक्के घसरण झाली आहे.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी अत्यावश्यक अन्न पदार्थांच्या किंमतीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राने मे -2021 मध्येच अधिसूचना जारी केली होती. यानुसार अत्यावश्यक वस्तू कायदा, 1955 अन्वये गिरण्या, आयातदार, आणि व्यापारी यांनी आपल्याकडे असलेल्या डाळींच्या साठ्याची माहिती जाहीर करणे सुनिश्चित केले होते. मूग वगळता सर्व डाळींसाठी साठा मर्यादा लागू करण्याविषयी दि. 02.07.2021 रोजी अधिसूचित करण्यात आले होते. त्यानंतर या दि. 19.07.2021रोजी या आदेशात दुरूस्ती करून त्याची मर्यादा दि. 31.10.2021 पर्यंत वाढविण्यात आली होती. त्यानुसार तूर, उडीद, मसूर, हरभरा (चणाडाळ) या चारही डाळींच्या साठ्यांविषयी मर्यादा लागू करून सुधारित आदेश जारी करण्यात आला.
डाळींची उपलब्धता सुधारावी आणि डाळींच्या किंमती स्थिर रहाव्यात, यासाठी सुरळीत आणि निर्वेध आयात सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने, सरकारने दि. 15 मे, 2021 पासून दि. 31 ऑक्टोबर, 2021 पर्यंत ‘मुक्त श्रेणी’ अंतर्गत तूर, उडीद आणि मूग आयात करण्यासाठी परवानगी दिली आहे. तूर आणि उडीद डाळीच्या आयातीसाठीची मोफत व्यवस्था आता 31 मार्च 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या धोरणात्मक उपाय योजनांमुळे तसेच या संपूर्ण व्यवस्थेच्या अंमलबजावणीवर संबंधित विभाग अतिशय काटेकोरपणे लक्ष देत आहेत. योग्य आयात धोरणामुळे तूर, उडीद आणि मूग डाळींच्या आयातीमध्ये या काळामध्ये तुलनेने लक्षणीय वाढ झाली आहे.
***
R.Aghor/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1801210)
Visitor Counter : 192