वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात ऐतिहासिक सर्वसमावेशक वित्तीय भागीदारी करारावर (सीईपीए) स्वाक्षऱ्या; येत्या पाच वर्षात उभय देशतील व्यापार 100 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट
भारत आणि युएई नैसर्गिक भागीदार असून अनेक क्षेत्रांत परस्परांना पूरक आहेत- केंद्रीय मंत्री पीयूष गोयल
भारत- युएई सीईपीए अंतर्गत भारतीय औषधी उत्पादनांना स्वयं-मंजूरी, उत्पादनाच्या मूळनिर्मितीविषयी कठोर कायदे आणि आयात वाढीबाबत सुरक्षिततेसाठी यंत्रणेसह अनेक गोष्टींचा पहिल्यांदाच समावेश
सीईपीए मुळे, वस्त्रोद्योग, आभूषणे-रत्ने, चर्मोद्योग, पादत्राणे, औषधनिर्माण, कृषी उत्पादने, वैद्यकीय उपकरणे, प्लास्टीक, क्रीडाविषक वस्तू आणि वाहनउद्योग यांसारख्या श्रममूलक क्षेत्रांत 10 लाखांपेक्षा अधिक रोजगारांची निर्मिती
हा करार, दोन्ही देशांच्या एकत्रित इतिहासाच्या पानावरील अविस्मरणीय असा नवा अध्याय ठरणार; युएईचे अर्थमंत्री तौक अल मारी यांचे प्रतिपादन
Posted On:
18 FEB 2022 11:52PM by PIB Mumbai
भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात, आज ऐतिहासिक सर्वसमावेशक वित्तीय भागीदारी करारावर (CEPA) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारान्वये, दोन्ही देशातील व्यापार येत्या पाच वर्षात 100 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अबू धाबीचे युवराज, शेख मोहम्मद बिन ज़ायेद अल नहान यांच्यात झालेल्या आभासी शिखर परिषदेदरम्यान या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
या करारानंतर, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि युएई चे अर्थमंत्री अब्दुल्ला तौक अल मारी यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. अमिरातीच्या परदेशी व्यापार मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ थानी अल झेयूदी देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी पीयूष गोयल म्हणाले, की भारत स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, अमृत महोत्सव साजरा करत आहे. तर युएई आपला पन्नासावा स्थापना दिवस साजरा करत आहे. त्यामुळे, दोन्ही देशांमधील संबंध, पूर्वीपेक्षा आणखी अधिक ऊंचीवर घेऊन जाण्याची ही अगदी योग्य वेळ आहे. भारत आणि युएई दे दोन्ही देश एकमेकांचे नैसर्गिक भागीदार असून, दोन्ही देशांत स्पर्धेचे वातावरण नाही, उलट परस्परांना पूरक ठरतील अशा अनेक बाबी आहेत, असे त्यांनी नमूद केले. दोन्ही देशांचा नियमांवर आधारित योग्य व्यापारावर पूर्ण विश्वास असून, एकमेकांना प्रतिसाद देण्याच्या तत्वावर हे संबंध आधारलेले आहेत. दोन्ही देशातील आदान-प्रदान अधिक सखोल झाल्याचा लाभ दोघांनानी व्हावा, असा दोन्ही देशांचा निश्चय असल्याचेही गोयल म्हणाले.
हा करार म्हणजे तात्पुरता किंवा अंतरिम करार नसून, दोन्ही देशांमधील वित्तीय भागीदारीविषयक सर्वसमावेशक वित्तीय असा करार आहे, इतिहासात पहिल्यांदाच, इतक्या कमी कालावधीत ह्या कारारातील तरतुदी निश्चित करण्यात आल्या आहेत, यावरही गोयल यांनी भर दिला. या करारात मुक्त व्यापारापासून ते डिजिटल अर्थव्यवस्थेपर्यंत तसेच, सरकारी खरेदीपासून ते इतर अनेक मुत्सद्दी आणि राजनैतिक अशा अत्यंत व्यापक आणि परस्पर हिताच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. केवळ 88 दिवसांत,एक अत्यंत संतुलित, सुयोग्य आणि समान अशा तरतुदी असलेल्या या कराराला अंतिम स्वरुप देण्यात, दोन्ही देशांच्या चमूने घेतलेली मेहनत, त्यांचे समर्पण आणि कटिबद्धतेचे त्यांनी कौतूक केले. दोन्ही देशांच्या संघांनी बंधुभाव आणि मैत्रीच्या भावनेतून, एकमेकांच्या संवेदनशील भूमिका समजून घेत हे काम पूर्ण केले, असेही गोयल म्हणाले.
सीईपीए मुळे, श्रम-मूलक अशी अनेक क्षेत्रे, जसे की वस्त्रोद्योग, आभूषणे-रत्ने, चर्मोद्योग, पादत्राणे, औषधनिर्माण, कृषी उत्पादने, वैद्यकीय उपकरणे, प्लास्टीक, क्रीडाविषक वस्तू आणि वाहनउद्योग, अभियांत्रिकी वस्तू इत्यादी क्षेत्रांत 10 लाख रोजगार निर्माण होतील, यावर त्यांनी भर दिला. तसेच, या सर्व क्षेत्रांना या कराराचा मोठा लाभ मिळेल, युवक-युवतीसाठी मोठे रोजगार निर्माण होतील, असेही त्यांनी सांगितले.
गोयल म्हणले, CEPA करारात अनेक गोष्टी प्रथमच करण्यात आल्या आहेत. जर अमेरिका, युरोपीय महासंघ, इंग्लंड आणि जपान यासारख्या प्रगत देशांत मंजुरी मिळाली असेल तर युएईने भारतीय औषधांना स्वयं मंजुरी आणि बाजारात नोंदणी देणे मान्य केले आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री म्हणाले की, या करारात कायमस्वरूपी सुरक्षा यंत्रणा आहे ज्याद्वारे अचानक आयात वाढल्यास उत्पादनाच्या मूळ निर्मिती विषयी कठोर नियम लागू करून, CEPA मार्गे इतर देशांतून होणारी उत्पादनांची आयात रोखता येईल.
या वेळी बोलताना युएईचे अर्थमंत्री तक अल मार्री म्हणाले, हा करार म्हणजे दोन देशांतील सामायिक इतिहासातील एक अविस्मरणीय नवा अध्याय आहे. ते म्हणाले, भारत - युएई CEPA हा भारत आणि युएईच्या संबंधातील मैलाचा दगड आहे आणि जे अनेक दशकांच्या मेहनतीचे फळ आणे आणि यात दोन्ही देशांच्या नागरिकांसाठी प्रगती आणि समृद्धीचे नवे युग आणण्याची आकांक्षा दिसून येते.
दोन्ही देशांचे सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध अधोरेखित करत ते म्हणाले, की महामारी नंतर युएईने सर्वप्रथम भारताशी भागीदारी केली आहे. या वेळी बोलताना परराष्ट्र व्यापार राज्य मंत्री थानी अल झेयुदी यांनी लवकरात लवकर CEPA च्या कलमांवर वर मतैक्य घडून आल्याबद्दल त्यांनी दोन्ही देशांची प्रशंसा केली. ते म्हणाले की, जर आपले गुंतवणूकदार, उद्योजक आणि व्यापारी विशेष उद्दिष्ट ठरवून एकत्र आले तर अमर्याद उपलब्धी होऊ शकते.
या वेळी दोन्ही देशांदरम्यान इतर अनेक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या, यात भारतातील अपेडा आणि युएईतील डीपी वर्ल्ड आणि अल दाहरा यांच्यात अन्न सुरक्षा मार्गिका पुढाकार यासाठी झालेला सामंजस्य करार तसेच गिफ्ट सिटी (IFSCA) आणि अबू धाबी जागतिक बाजारपेठ (ADGM) यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचा समावेश आहे.
***
S.Thakur/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1799526)
Visitor Counter : 338