माहिती आणि प्रसारण मंत्रालय

17 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) 29 मे ते 4 जून 2022 या कालावधीत होणार


15 फेब्रुवारी 2022 पासून प्रवेशिका स्विकारल्या जाणार

Posted On: 13 FEB 2022 1:38PM by PIB Mumbai

 

भारतातील आणि परदेशातील चित्रपट निर्माते आणि चित्रपटसृष्टी ज्याची अत्यंत आतुरतेने प्रतीक्षा करत असतात असा माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेला 17वा, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF-2022) 29 मे ते 4 जून, 2022 या कालावधीत फिल्म्स डिव्हिजन विभागाच्या मुंबई येथील संकुलात आयोजित केला जाणार आहे. 15 फेब्रुवारी 2022 ते 15 मार्च 2022 पर्यंत ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया स्वीकारल्या जातील आणि चित्रपट निर्माते विविध स्पर्धा श्रेणींमध्ये आपले चित्रपट प्रविष्ट करण्यासाठी www.miff.in  किंवा https://filmfreeway.com/MumbaiInternationalFilmFestival-MIFF  या संकेतस्थळावर लॉग इन करू शकतील.

1 सप्टेंबर 2019 आणि 31 डिसेंबर 2021 दरम्यान पूर्ण झालेले चित्रपट मिफ्फ महोत्सवामध्ये (MIFF-2022) प्रवेशासाठी पात्र आहेत. महोत्सवातील सर्वोत्कृष्ट माहितीपटाला सुवर्णशंख आणि 10 लाख रुपये रोख पारितोषिक दिले जाईल. विविध श्रेणींमध्ये विजेत्या चित्रपटांना रोख रक्कम, रौप्य शंख, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्रे दिली जातील. भारत "आझादी का अमृत महोत्सव" साजरा करत असल्यामुळे, यंदाच्या महोत्सवात India@75 या संकल्पनेवर आधारीत सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी विशेष पुरस्काराची घोषणा केली आहे.  या महोत्सवामध्ये भारतातील नाॅन फीचर फिल्म क्षेत्रातील एका दिग्गज व्यक्तिमत्वाचा रोख रु. 10 लाख, स्मरणचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन प्रतिष्ठित व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सन्मान केला जाईल.

दक्षिण आशियातील सर्वात जुना आणि नाॅन फीचर फिल्म असलेल्या चित्रपटांसाठीचा सर्वात मोठा महोत्सव, मिफ्फ  माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट विभागतर्फे आयोजित केला जात असतो आणि त्यात महाराष्ट्र सरकार सहभागी होते. हा चित्रपट महोत्सव जगभरातील निर्मात्यांसाठी एक पर्वणीच असते. स्पर्धा आणि बिगर-स्पर्धा विभागांव्यतिरिक्त, कार्यशाळा, तज्ञांचे मार्गदर्शन, खुला मंच आणि बीटूबी (B2B) सत्रांसारखी परस्परसंवादी सत्रे ही महोत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

2020 मध्ये आयोजित, 16 व्या द्वैवार्षिक मिफ्फ महोत्सवाला अतिशय उत्साहात प्रतिसाद मिळाला होता, ज्यातून भारत आणि जगातील विविधरंगी समृध्द माहितीपट संस्कृती प्रदर्शित झाली  होती. 16 व्या मिफ्फला (M8FF) भारत आणि परदेशातून विक्रमी 871 प्रवेशिका आल्या होत्या आणि भारत आणि जगाच्या इतर भागातून अनेक प्रमुख माहितीपट, ॲनिमेशन आणि लघुपट निर्मात्यांनी त्याला हजेरी लावली होती. ग्रँड ज्युरीमध्ये फ्रान्स, जपान, सिंगापूर, कॅनडा, बल्गेरिया आणि भारतातील प्रसिद्ध चित्रपटसृष्टीतील व्यक्तिमत्त्वांचा त्यात  समावेश होता.

अधिक माहितीसाठी महोत्सव संचालनालयाशी +91-22-23522252 / 23533275 आणि miffindia[at]gmail[dot]com  वर संपर्क साधता येईल.

***

S.Tupe/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1798037) Visitor Counter : 476