संरक्षण मंत्रालय
महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या तुकडीने या वर्षीच्या प्रजासत्ताक दिन शिबिरात ‘पंतप्रधान ध्वज (पीएम बॅनर)’ मिळविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केला तुकडीचा सन्मान
महाराष्ट्र संचालनालयाने सात वर्षांनंतर जिंकला सर्वोत्तम संचालनालयाचा चषक
Posted On:
02 FEB 2022 3:27PM by PIB Mumbai
मुंबई, 2 फेब्रुवारी 2022
राष्ट्रीय छात्र सेनेच्या महाराष्ट्र संचालनालयाच्या 57 जवानांच्या तुकडीने नुकताच समारोप झालेल्या यावर्षीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये पंतप्रधान सन्मान प्राप्त केला आहे. अनेक चषके आणि पदके जिंकण्यासोबतच एकंदर कामगिरीत ही तुकडी सर्वोत्तम ठरली आहे. महाराष्ट्र संचालनालयाने सात वर्षांच्या अंतरानंतर पुन्हा एकदा सर्वोत्तम संचालनालयाचा चषक जिंकला आहे.
या वर्षीच्या म्हणजे 2022 च्या प्रजासत्ताक सोहळ्यात सहभागी झालेल्या 57 जवानांच्या तुकडीमधील 17 जवानांनी अखिल भारतीय राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रतिनिधित्व करत राजपथावरील संचलनात भाग घेतला तर पंतप्रधानांच्या सन्मानार्थ झालेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय छात्र सेनेच्या गार्ड ऑफ ऑनर रॅली मध्ये 7 जवान सहभागी झाले होते.
राज्यात 1 फेब्रुवारी 2022 रोजी झालेल्या सन्मान समारंभात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिन 2021-22 च्या संचलन शिबिरादरम्यान अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या सर्वोत्कृष्ट जवानांचा आणि पारितोषिक विजेत्यांचा पारितोषिके देऊन सन्मान केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार्यक्रमाचे यजमानपद भूषविले आणि छात्र सेनेच्या जवानांशी संवाद साधला.
पंतप्रधानांच्या रॅलीदरम्यान सिनियर अंडर ऑफिसर गीतेश दिनगर यांना गार्ड कमांडर म्हणून प्रतिष्ठित पंतप्रधान ध्वजाला सलाम करण्याचा सन्मान मिळाला. कॅडेट वॉरंट ऑफिसर पृथ्वी पाटील यांची हवाई विभागाच्या वरिष्ठ विभागाकडून अखिल भारतीय सर्वोत्कृष्ट कॅडेट म्हणून निवड झाली. महाराष्ट्रातील 5 कॅडेटना देखील राष्ट्रीय छात्र सेनेच्या महासंचालक प्रशंसा पत्रे देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी राज्यमंत्री सुनील केदार, यशोमती ठाकूर आणि अदिती तटकरे, राष्ट्रीय छात्र सेनेच्या महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय.पी.खंडुरी, संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी, ग्रुप कमांडर्स, अधिकारी आणि इतर कर्मचारीवर्ग देखील उपस्थित होता.
S.Thakur/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1794695)
Visitor Counter : 315