नौवहन मंत्रालय
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव केंद्रस्थानी ठेवून जेएनपीटी येथे 73वा प्रजासत्ताक दिन साजरा
Posted On:
26 JAN 2022 7:56PM by PIB Mumbai
मुंबई, 26 जानेवारी 2022
भारतातील प्रमुख कंटेनर बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने (जेएनपीटी ) भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला आणि देश स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात असल्यामुळे आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असल्यामुळे आजचा दिवस आणखी खास होता. जेएनपीटी प्रशासन भवन येथे झालेल्या या सोहळ्यात जेएनपीटी परिवार सहभागी झाला होता. जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी मानवंदना दिली. त्यानंतर जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ आणि इतर उच्च अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर राष्ट्रगीत गायन झाले.
याप्रसंगी जेएनपीटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संबोधित करताना जेएनपीटीचे अध्यक्ष म्हणाले, “आपण 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना, जेएनपीटी विविध क्षेत्रातील आपल्या लोकांच्या गौरवशाली इतिहासाचा, संस्कृतीचा आणि कामगिरीचा गौरव करण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत अनेक कार्यक्रम आयोजित करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सागरी क्षेत्राचा देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाचा वाटा आहे. भारताच्या नील अर्थव्यवस्थेला आकार देण्यात जेएनपीटीने मोठी भूमिका बजावली आहे. आजच्या दिवशी, सागरी व्यापाराला सक्षमपणे मदत करण्यात सर्व कर्मचारी, व्यापारातले भागीदार आणि हित धारकांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांचे आभार मानतो ."
कार्यक्रमाचा समारोप करताना संजय सेठी यांनी जेएनपीटीचे सर्व कर्मचारी, कामगार विश्वस्त आणि हित धारकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालय आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या सुधारित प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करत हा दिवस साजरा करण्यात आला.
सध्या जेएनपीटी पाच कंटेनर टर्मिनलचे संचालन करते : जवाहरलाल नेहरू पोर्ट कंटेनर टर्मिनल (जेएनपीसीटी), न्हावा शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी), गेटवे टर्मिनल्स इंडिया प्रा. लिमिटेड (GTIPL), न्हावा शेवा इंटरनॅशनल गेटवे टर्मिनल (NSIGT) आणि नव्याने सुरू झालेले भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेड (BMCTPL). बंदरात सामान्य मालवाहतूक करण्यासाठी शॅलो वॉटर बर्थ आणि दुसरा लिक्विड कार्गो टर्मिनल आहे ज्याचे व्यवस्थापन बीपीसीएल -आयओसीएल समूह करतो आणि नव्याने बांधलेला किनारपट्टीवरील बर्थ देखील आहे.
* * *
M.Chopade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1792847)
Visitor Counter : 207