युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 12 जानेवारी ला 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार
राष्ट्रीय युवक महोत्सवातील उपक्रमांचे महाराष्ट्रातील 5 लाखांहून अधिक युवकांना लाभाचे उद्दिष्ट
Posted On:
11 JAN 2022 7:39PM by PIB Mumbai
मुंबई, 11 जानेवारी 2022
महान समाज सुधारक आणि तत्वज्ञ स्वामी विवेकानंद यांचे आदर्श आणि विचार यांच्या सन्मानार्थ दर वर्षी त्यांच्या जयंतीदिनी म्हणजे 12 जानेवारीला साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय युवक दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 12 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून, पुदुचेरी येथे साजऱ्या होत असलेल्या 25 व्या राष्ट्रीय युवक महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. कोविड-19 महामारीची परिस्थिती लक्षात घेऊन हा महोत्सव आभासी पद्धतीने साजरा होणार आहे. महोत्सवाच्या उद्घाटनानंतर राष्ट्र उभारणीच्या कार्यासाठी युवा वर्गामध्ये चैतन्य आणणे, त्यांच्यात स्फुल्लिंग चेतविणे, त्यांना एकत्र आणणे आणि युवा शक्तीला चालना देणे तसेच आपल्या देशातील लोकसंख्येच्या या मोठ्या भागाची खरी क्षमता उजेडात आणणे या उद्देशाने राष्ट्रीय युवा शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
12 जानेवारी ते 19 जानेवारी, 2022 या आठवड्यात साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय युवक सप्ताहानिमित्त, महाराष्ट्र आणि गोव्याच्या नेहरू युवा केंद्र संघटनने रक्तदान शिबिरे, वादविवाद चर्चा आणि चर्चासत्रांसह अनेक उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यापैकी काही महत्त्वाचे कार्यक्रम खालीलप्रमाणे आहेत:
- 12 जानेवारी (राष्ट्रीय युवक दिन) – विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन
- 13 जानेवारी (सांस्कृतिक दिन) – सामुदायिक गायन कठपुतळ्यांचे खेळ, इत्यादी.
- 14 जानेवारी (सहभाग दिन) – युवकांसाठी संबंधित विषयांवर निबंध, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धा
- 15 जानेवारी (समाज सेवा दिन) - गावांमध्ये युथ क्लब सदस्य आणि स्वयंसेवकांचे सामाजिक कार्यक्रम तसेच स्वच्छता मोहिमा
- 16 जानेवारी (शारीरिक तंदुरुस्ती दिन) – क्रीडा स्पर्धा, साहसी खेळांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम
- 17 जानेवारी (युवकांसाठी शांततेचा संदेश दिन ) – व्याख्याने, पथनाट्ये
- 18 जानेवारी (कौशल्य विकास दिन ) – उत्पादने आणि फोटो प्रदर्शने
- 19 जानेवारी (जाणीव जागृती दिन ) – महत्त्वाच्या व्यक्तींद्वारे युवकांना संदेश देणारी भाषणे, चित्रपटांचे खेळ आणि पारितोषिक वितरण समारंभ
सर्व मिळून, सुमारे 250 सांस्कृतिक उपक्रम आणि चित्रकला स्पर्धा, 58 रक्तदान शिबिरे, 800 हून अधिक निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा आणि 165 ऑनलाईन योग वर्ग सत्रे आणि इतर कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
कोविड-19 संसर्गाचा प्रसार टाळण्याच्या उद्देशाने, यापैकी बहुतेक उपक्रम आभासी पद्धतीने आयोजित होतील. तसेच रक्तदान शिबिरांसारख्या प्रत्यक्ष सहभागाच्या कार्यक्रमांमध्ये उच्च प्रतीची खबरदारी बाळगली जाईल. हा कार्यक्रम राज्यांतील 5 लाख युवकांना विविध प्रकारे लाभदायक ठरणार आहे.
या कार्यक्रमांशिवाय, महान द्रष्टे स्वामी विवेकानंद यांना आदरांजली म्हणून, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या फिल्म्स डिव्हिजन ‘द लाईफ अँन्ड मेसेजेस ऑफ स्वामी विवेकानंद’ आणि ‘यु आर द दोन क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी’ हे दोन माहितीपट देखील सादर कर णार आहे. या माहितीपटांमध्ये विवेकानंदांचे प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक आयुष्य तसेच त्यांची शिकवण यांच्यावर भर देण्यात आला आहे. हे माहितीपट चित्रपट विभागाच्या youtube.com/filmsdivision या यूट्यूब वाहिनीवर पाहता येतील. अधिक तपशीलासाठी येथे क्लिक करा.
पत्रसूचना कार्यालयाचा मुंबई विभाग तसेच नेहरू युवा संघटन यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘युवावर्ग आणि राष्ट्र-उभारणी: स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीची समर्पकता’ या विषयावर आज 11 जानेवारी 2022 रोजी एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले. स्वामी विवेकानंद यांचे महान विचार आणि तेजस्वी आयुष्य यांच्याविषयी जाणीव निर्माण करणे आणि प्रेरणा जागृत करणे हा या वेबिनारच्या आयोजनाचा उद्देश होता. अधिक तपशीलासाठी येथे क्लिक करा.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1789193)
Visitor Counter : 301