माहिती आणि प्रसारण मंत्रालय
युवक आणि राष्ट्र उभारणीत स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीची समर्पकता विषद करणाऱ्या वेबिनारचे आयोजन
स्वामी विवेकानंदांचे विचार ही वैश्विक सत्ये आहेत आणि ती आपल्याला प्रत्येक वेळी आणि प्रत्येक युगात उपयुक्त ठरतील – यजुवेन्द्र महाजन
‘तुम्ही स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीतील अगदी लहान भाग जरी आचरणात आणला तरी तुमचे जीवन सफल होईल :अमरावती येथील भारतीय मास कम्युनिकेशन संस्थेचे संचालक
“स्वामी विवेकानंदांनी इतिहास आणि गुरु यांच्या भूमिकेवर भर दिला, स्वामीजी आजही आपल्यात आहेत.” : आनंद दुबे
Posted On:
11 JAN 2022 4:38PM by PIB Mumbai
मुंबई, 11 जानेवारी 2022
"सामर्थ्य म्हणजेच जीवन आहे आणि दुर्बलता म्हणजे मृत्यू आहे, चारित्र्याचे सामर्थ्य वापरून आपला युवावर्ग भविष्यात आपल्या देशामध्ये प्रगती घडवून आणेल,"असे विवेकानंद म्हणत असत. देशातील युवकांच्या सामर्थ्यावर त्यांना प्रचंड विश्वास होता. विवेकानंदांच्या विचारधारेचा प्रसार करण्यासाठी आज 11 जानेवारी 2022 रोजी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे पत्र सूचना कार्यालय, मुंबई यांनी नेहरू युवा केंद्र संघटनेसह संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘युवावर्ग आणि राष्ट्र-उभारणी: स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीची समर्पकता’ या विषयावरील वेबिनारमधे हे विचार मांडण्यात आले.
विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा करण्यात येतो, त्याचसोबत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय युवा उत्सवाचा भाग म्हणून या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 12 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून, पुदुचेरी येथे साजऱ्या होत असलेल्या राष्ट्रीय युवक महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत.
स्वामीजींनी दिलेली विश्व बंधुत्वाची हाक आणि भारताला भूतकाळातील वैभव मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांनी मला सर्वात जास्त मोहित केले असे उद्गार जळगावच्या दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांनी या प्रसंगी काढले. समाजात सकारात्मक बदल घडवून आणणारे आयुष्य जगण्यासाठी त्यांनी संपूर्ण मानवतेला केलेल्या, “जर तुम्ही माणूस म्हणून जन्माला आला असाल तर तुमचे नाव स्मरणात राहील असे काही कार्य करून नंतरच हे जग सोडून जा, नाहीतर तुमच्यात आणि इतर निर्जीव गोष्टींमध्ये काय फरक आहे” या आवाहनाची देखील महाजन यांनी यावेळी उपस्थितांना आठवण करून दिली.
भारतीय स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झालेल्या, महात्मा गांधीजींसारख्या अनेक महान नेत्यांवर स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव होता असे आनंद जनसेवा संथेचे अध्यक्ष आनंद दुबे यांनी सांगितले. स्वातंत्र्य चळवळीतील प्रत्येक नेता महापुरुष होता पण तरीही त्यांनी विवेकानंदांच्या उदात्त दूरदृष्टी आणि विचारांचे आदर्श ठेवले असे ते म्हणाले. दुबे यांनी याप्रसंगी, प्रत्त्येकाच्या आयुष्यात गुरु असण्याचे महत्त्व अधोरेखित करत, रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर कसा अमित ठसा उमटविला याचे वर्णन केले. आपल्या एकूण लोकसंख्येच्या 65% इतक्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या युवकांनी चारित्र्य बांधणीचे कार्य केले तर भारत जागतिक नेता म्हणून स्थापित होण्याचा दिवस दूर नाही अशी आशा दुबे यांनी व्यक्त केली.
स्वामी विवेकानंदांनी अशा भारत मातेचे स्वप्न पाहिले जी सर्व शक्तीने आपल्या वैभव आणि सामर्थ्याबद्दल जागृत आहे आणि सर्व जगाला मार्गदर्शनपर शिकवण आणि संरक्षण देत आहे असे उद्गार अमरावती येथील भारतीय मास कम्युनिकेशन संस्थेचे संचालक प्राध्यापक अनिल कुमार सौमित्र यांनी काढले. केवळ माहिती गोळा करण्याऐवजी ज्ञानार्जन करण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. ते म्हणाले, “आपण खऱ्या अर्थाने जाणकार समाज असण्याऐवजी माहितीने परिपूर्ण समाज बनत आहोत. दिवसेंदिवस यंत्रांनी आपले दैनंदिन जीवन नियंत्रित करण्यास सुरुवात केली आहे. परंतु हळूहळू आपण स्वामी विवेकानंद यांच्या संकल्पनेनुसार ज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यातील संतुलनाकडे वाटचाल करत आहोत. स्वामी विवेकानंदांचा असा विश्वास होता की पाश्चात्य आणि पूर्वेकडील जगाच्या विचारांमध्ये समतोल असायला हवा आणि त्यासाठी जगाच्या दोन्ही भागांनी एकमेकांच्या विचारसरणीला आपापल्या विचारधारेत आत्मसात केले पाहिजे”.
अतिरिक्त महासंचालक, स्मिता वत्स शर्मा यांनी महामारीच्या काळात देश कठीण परिस्थितीतून जात असताना देशातील तरुणांनी दिलेल्या योगदानाबद्दल माहिती सांगितली,त्या म्हणाल्या," "गेल्या दोन वर्षात कोविड-19 च्या महामारीच्या रोगाच्या विरूद्ध करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपायांमध्ये तसेच मागील वर्षभरात देशात राबविण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत या देशातील तरुणांचे मोठे योगदान आहे," असे त्यांनी कौतुक केले. समाजातील नवोदित महिला उद्योजिका म्हणजे आपल्या देशाच्या ‘कन्या’ समाजातील जवळपास सर्वच क्षेत्रात विजय मिळवत आहेत, याविषयीही त्यांनी सांगितले.
विवेकानंदांच्या तेजोमयी आणि दैवी सामर्थ्याने राष्ट्र उभारणीसाठी कसे योगदान दिले आणि प्रत्येकाने स्वतःच्या जीवनातील प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवले पाहिजे याबाबत ते कसे आग्रही होते याबाबत नेहरू युवा केंद्राचे महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठीचे संचालक प्रकाश मनुरे यांनी माहिती दिली. जर तुम्हांला भारताविषयी जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचले पाहिजे, स्वामीजी हे एक दैवी व्यक्तिमत्त्व होते आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी होते असेही त्यांनी सांगितले.
या वेबिनारच्या अखेरीस प्रश्नोत्तरांचे सत्र झाले. अमरावतीच्या आयआयएमसीतील विद्यार्थ्यांनी वक्तव्यांना प्रश्न विचारले.
माहीती प्रसारण मंत्रालयाच्या फिल्म्स डिव्हिजनने निर्माण केलेली विवेकानंदांच्या जीवनावर आधारीत चित्रफीतही यावेळी दाखविण्यात आली.
ही वेबिनार येथे पाहता येईल :
* * *
M.Chopade/S.Chitnis/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1789123)
Visitor Counter : 641