श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऑक्टोबर 2021 साठी कर्मचारी भविष्यनिर्वाह संघटनेचा वेतनपट प्रसिद्ध


12.73 लाख सदस्यांची निव्वळ भर

Posted On: 20 DEC 2021 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 डिसेंबर 2021

 

EPFO अर्थात कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने 20 डिसेंबर 2021 रोजी तात्कालिक वेतनपट प्रसिद्ध केला. ऑक्टोबर 2021 मध्ये EPFO मध्ये 12.73 लाख सदस्यांची निव्वळ भर पडल्याचे त्यात दिसून आले आहे. गेल्यावर्षीच्या याच काळाशी तुलना केल्यास ऑक्टोबरमध्ये वेतनपटात सुमारे 10.22% इतकी निव्वळ भर पडली आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये सदस्यसंख्येत 11.55 लाख इतकी निव्वळ भर पडली होती.

निव्वळ भर पडलेल्या 12.73 लाख सदस्यांपैकी 7.57 लाख सदस्य, EPF आणि MP म्हणजे कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी आणि संकीर्ण तरतुदींचा कायदा, 1952 या अन्तर्गत प्रथमच नोंदले गेले आहेत. अंदाजे 5.16 लाख सदस्य बाहेर पडून EPFO मध्ये परतले आहेत.

वेतनपटाच्या आकडेवारीची वयानुसार तुलना करता 22-25 वर्षे वयोगटाने सर्वाधिक निव्वळ नोंदणी केली असून ऑक्टोबर 2021 मध्ये 3.37 लाखांची भर घातली आहे. 18-21 वर्षे वयोगटानेही अंदाजे 2.50 लाख नोंदण्यांची लक्षणीय भर घातली आहे. 18-25 च्या वयोगटांनी या ऑक्टोबरमध्ये एकूण अंदाजे 46.12%  सदस्यांची निव्वळ भर घातली आहे. या वयोगटांचे सदस्य सामान्यपणे नव्याने रोजगार मिळवू लागलेले असतात आणि व्यक्तिगत कमाईच्या दृष्टीने महत्त्वाच्या टप्प्यावर असतात.

वेतनपटाच्या आकडेवारीची राज्यनिहाय तुलना करता, महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमधील आस्थापना आघाडीवर असून त्यांनी ऑक्टोबरमध्ये अंदाजे 7.72 लाख सदस्यांची भर घातली आहे. एकूण निव्वळ भर बघता, हे प्रमाण 60.64 % इतके आहे.

लिंगनिहाय विश्लेषण केले असता असे आढळते की, ऑक्टोबरमध्ये महिलांच्या नोंदणीची संख्या 2.69 लाख इतकी होती. एकूण निव्वळ भर बघता, महिला नोंदणीचा वाटा सुमारे 21.14% होता..

उद्योगनिहाय विश्लेषण केले असता असे दिसते की, 'तज्ज्ञ सेवा' श्रेणी (मनुष्यबळ संस्था, सुरक्षाव्यवस्था पुरविणाऱ्या खासगी संस्था, लहान कंत्राटदार इ.) चा वाटा 40.73% इतका आहे. याखेरीज कागद उद्योग, भातगिरण्या, अशा आस्थापनांमध्ये वेतनपटात निव्वळ भर पडण्याचा कल वाढत चालल्याचे दिसून येते.    

कर्मचाऱ्यांच्या अहवालांच्या माहितीत सातत्याने बदल होत असल्याने, वेतनपटाची ही आकडेवारी तात्कालिक स्वरूपाची आहे. दर महिन्याला आधीची माहिती  बदलते. ऑक्टोबर-2017 पासूनच्या वेतनपटांची माहिती EPFO मे-2018 पासून देत आहे..

सदस्यांना भविष्यनिर्वाह निधी,  निवृत्तीनंतर निवृत्तिवेतनाचे लाभ EPFO मिळवून देते. तसेच सदस्याचा अकाली मृत्यू झाल्यास त्याच्या / तिच्या कुटुंबाला कौटुंबिक निवृत्तिवेतनाचा आणि विम्याचा लाभ EPFO मुळे मिळतो. 'EPF  आणि MP कायदा, 1952' अंतर्गत काम करणारी, संघटित / निम-संघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरविणारी EPFO ही देशातील प्रमुख संस्था आहे.

* * *

S.Kakade/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1783599) Visitor Counter : 227


Read this release in: English , Urdu , Hindi