संरक्षण मंत्रालय
तामिळनाडू हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह- या माजी प्रशिक्षणार्थीला राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची आदरांजली
Posted On:
18 DEC 2021 3:11PM by PIB Mumbai
पुणे, 18 डिसेंबर 2021
तामिळनाडूत 08 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या एमआय -17 हेलिकॉप्टर अपघातातील एकमेव बचावलेले आणि ज्यांचे 15 डिसेंबर 2021 रोजी निधन झाले ते ग्रुप कॅप्टन वरुण सिंह,एससी यांच्या स्मरणार्थ 18 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील स्मरण कुटीमध्ये (हट ऑफ रिमेंबरन्स) पुष्पचक्र अर्पण समारंभ आयोजित करण्यात आला होता.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट अतिविशिष्ट सेवा पदक , वायुसेना पदकप्राप्त एअर मार्शल संजीव कपूर यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या वतीने एका समारंभात या शूर सेनानीला आदरांजली अर्पण केली. दिवंगत वरुण सिंह यांच्या अंत्यदर्शनासाठी प्रबोधिनीचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.ग्रुप कॅप्टन वरुण सिंह , एससी हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 104 व्या तुकडीतील माजी प्रशिक्षणार्थी होते. त्यांना 2004 मध्ये लढाऊ विमानांचे वैमानिक म्हणून नियुक्त करण्यात आले आणि त्यांनी मुख्यतः त्यांच्या कारकीर्दीत जग्वार आणि तेजस या लढाऊ विमानांचे उड्डाण केले. ते प्रायोगिक चाचणी वैमानिक देखील होते आणि सध्या संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयामध्ये संचालक (डायरेक्टिंग स्टाफ) म्हणून तैनात होते.
आज त्यांचे नाव पवित्र स्मरण कुटीमध्ये संपूर्ण लष्करी सन्मानासह सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे, त्यांचे बलिदान राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. दु:खाच्या याप्रसंगी संपूर्ण राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या शोकाकुल कुटूंबियांप्रति शोकसंवेदना व्यक्त केल्या.
R.Aghor/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1782989)