सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी अंदाजपत्रकामध्ये वाढ करण्यासाठी आणि आपल्या मंत्रालयाच्या प्रमुख योजनांची वित्तीय मदत कायम ठेवण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घेतली भेट

Posted On: 30 NOV 2021 8:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर 2021

 

केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्री नारायण राणे यांनी आज वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांची त्यांच्या संसद भवनातल्या कार्यालयामध्ये भेट घेतली. आपल्या खात्याच्या अंदाजपत्रकामध्ये वाढ करण्यासंदर्भात त्याचबरोबर आपल्या मंत्रालयाच्या प्रमुख योजना पुढे सुरू ठेवण्याविषयी नारायण राणे यांनी अर्थमंत्र्यांबरोबर विस्तृत चर्चा केली. कोविडमुळे ज्या एमएसएमई उद्योगांना फटका बसला आहे, त्यांना पतपुरवठा करण्याची गरज भासणार आहे, याविषयावरही राणे यांनी चर्चा केली. आता चीनमधून बाहेर पडणा-या परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि त्याचबरोबर एमएसएमईची क्षमता वाढविण्यासाठी विश्वसनीय धोरणाची आवश्यकता असल्याच्या मुद्यावर त्यांनी प्रकाश टाकला. त्यांनी एमएसएमईंना पतपुरवठा करण्यामध्ये बँका उदासीन असल्याची आणि त्यांच्याकडून भेदभाव केला जात असल्याची एमएसएमई उद्योजकांची तक्रार असल्याची माहिती मंत्री राणे यांनी निर्मला सीतारमण यांना दिली.

यावेळी अर्थमंत्र्यांनी एमएसएमईच्या अंदाजपत्रकामध्ये वृद्धी करण्याच्या विषयाला आपले समर्थन असल्याची ग्वाही दिली. त्याच बरोबर बँकांनाही एमएसएमईच्या वित्तीय आवश्यकता पूर्ण करण्याविषयी संवेदनशील धोरण ठेवण्याची सूचना करण्यात येईल आणि बँकर्स आणि एमएसएमई कर्जदार यांच्यामध्ये जिल्हास्तरीय चर्चा, संवाद होईल, असे निर्मला सीतारमण यांनी त्यांना आश्वासन दिले.

अर्थमंत्र्यांच्या पाठिंब्यामुळे कोविड महामारीनंतर पूर्ववत होणाऱ्या आर्थिक क्षेत्रामध्ये एमएसएमई क्षेत्र प्रमुख योगदान देईल, अशी आशा एमएसएमई मंत्री नारायण राणे यांनी यावेळी व्यक्त केली.

 

 

 

S.Patil/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1776614) Visitor Counter : 187


Read this release in: English , Hindi , Tamil