माहिती आणि प्रसारण मंत्रालय

इफ्फी 52 मध्ये “लिंगुई द सॅक्रड बॉण्ड्स” ला आयसीएफटी- युनेस्को गांधी पदक


एक आंतरराष्ट्रीय सहनिर्मिती असलेला नाट्यमय चित्रपट- महिलांच्या संघर्षाचे धाडसी चित्रण आणि मानवतेसाठी एक धडा

Posted On: 28 NOV 2021 10:45PM by PIB Mumbai

पणजी, 28 नोव्‍हेंबर 2021 

 

“लिंगुई द सॅक्रड बॉण्ड्स” हा एक आंतरराष्ट्रीय सहनिर्मिती असलेला ड्रामा चित्रपट आहे. आई आणि तिची मुलगी यांच्यातील पवित्र नाते आणि पुरुषांनी लादलेल्या कठोर कायद्यांसमोर टिकून राहण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाचे चित्रण असलेला हा चित्रपट इफ्फी 52 मध्ये आयसीएफटी- युनेस्को गांधी पदकाचा मानकरी ठरला आहे.

महिलांच्या संघर्षाचे धाडसी चित्रण या चित्रपटातून करण्यात आले आहे आणि मानवतेसाठी तो एक धडा आहे. बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली असून तो अरबी आणि फ्रेंच भाषेत तयार करण्यात आला आहे. छाड या आफ्रिकी देशातील महमत सालेह हरुन या चित्रपट निर्मात्याच्या लिंगुई द सॅक्रड बॉण्ड्स या चित्रपटातील शांतताविषयक आदर्श आणि मूल्य, सहिष्णुता आणि अहिंसा ही गांधीजींनी प्रसारित केलेली मूल्ये यांना दिलेले प्रोत्साहन यामुळे या चित्रपटाची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झाली. इफ्फी52 च्या आज झालेल्या  समारोप समारंभात या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. पितृसत्ताक समाजात पुरुषांच्या मर्जीने तयार केलेल्या नियमांनुसार रहावे लागताना महिलांना कराव्या लागणाऱ्या संघर्षाला हा चित्रपट समर्पित आहे. स्त्री-पुरुष समानता आणि महिलांचा शिक्षणाचा मूलभूत अधिकार याबाबतही या चित्रपटाने जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

2022 च्या 94 व्या अकॅडमी पुरस्कारासाठी सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या छाडीयन प्रवेशिकेसाठी देखील याची निवड करण्यात आली आहे. यावर्षी आयसीएफटी- युनेस्को गांधी पदकासाठी जगभरातील 9 चित्रपटांमध्ये प्रमुख स्पर्धा होती. ट्वेंटी फर्स्ट टिफिन(भारत), कमिटमेंट हसन( तुर्कस्तान ), किलिंग द युनक खान(इराण), कुळंगल( भारत), लिंगुई- द सॅक्रड बॉण्ड्स(छाड, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी), नाईट फॉरेस्ट( जर्मनी), निराये तथाकलुला मारम(भारत), टोक्यो शेकिंग( फ्रान्स) आणि व्हेन पॉमग्रेनेट्स हाऊल(ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान) हे ते 9 चित्रपट होते.

दरवर्षी इफ्फी, आयसीएफटी, पॅरिस आणि युनेस्को यांच्या वतीने एका चित्रपटाला हा पुरस्कार दिला जातो. हे चित्रपट सर्वात आधी इफ्फीमध्ये दाखवले जातात आणि  त्यानंतर आयसीएफटीचे परीक्षक मंडळ त्यांचे युनेस्कोच्या आदर्शांच्या आधारे  मूल्यमापन करते. युनेस्कोने 1994 मध्ये गांधीजींच्या 125 जयंतीच्या निमित्ताने हे स्मृती पदक देण्याची सुरुवात केली. तेव्हापासून गांधीजींचे शांतता, सहिष्णुता आणि अहिंसा या आदर्शांवर आधारित असलेल्या सर्वोत्तम चित्रपटाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

आशियामधील सर्वात जुन्या आणि सर्वाधिक प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये उत्तमोत्तम चित्रपट, मास्टर क्लासेस, परिसंवाद आणि इतर अनेक उपक्रमांची एकत्रित पर्वणी उपलब्ध होत असते. 52व्या इफ्फीमध्ये 300 हून अधिक चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले ज्यामध्ये 73 देशांच्या 148 आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश होता.

 

* * *

Jaydevi PS/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1775958) Visitor Counter : 213


Read this release in: Hindi , Urdu , English