माहिती आणि प्रसारण मंत्रालय
चित्रपट निर्मिती तसेच चित्रपट पाहणे आणि त्याचे परीक्षण करणे या बाबतीत मला कधीही स्त्री-पुरुष भेदभाव आढळला नाही: रक्षन बानितेमद, अध्यक्ष, इफ्फी आंतरराष्ट्रीय स्पर्धा ज्युरी
समकालीन भारताची कलात्मक कल्पना बहुतांश चित्रपटांमध्ये दिसते: निला माधब पांडा, ज्युरी सदस्य
समकालीन भारतीय चित्रपटातील रसरशीतपणा, वैविध्य आणि कल्पनाशक्ती आश्चर्यकारक आहे: सिरो गुएरा, ज्युरी सदस्य
आम्ही राष्ट्रीयत्व आणि विचारसरणी याचा विचार न करता चित्रपट कलेचा आनंद घेतला : विमुक्ती जयसुंदरा, ज्युरी सदस्य
पणजी, 28 नोव्हेंबर 2021
52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षक मंडळाच्या अध्यक्ष आणि इराणी चित्रपट निर्मात्या रक्षन बानितेमाद तसेच चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सिरो गुएरा, विमुक्ती जयसुंदरा आणि निला माधब पांडा यांच्यासह इतर ज्युरी सदस्यांनी आज गोव्यात इफ्फी 52 मध्ये माध्यमांशी संवाद साधला.
ज्युरी समितीच्या अध्यक्ष आणि इराणी चित्रपट निर्मात्या रक्षान बानीतेमाद यांनी चित्रपटांच्या परीक्षणाबाबत आपला अनुभव सांगितलं. त्या म्हणाल्या की,विविध देशांतील विविध प्रकारच्या चित्रपटांचे परीक्षण करताना मजा आली आणि हा एक अद्भुत अनुभव होता. “चित्रपट निर्मिती तसेच चित्रपट पाहणे आणि त्याचे परीक्षण करणे या बाबतीत मला कधीही स्त्री-पुरुष भेदभाव आढळला नाही. मी लिंगापेक्षा नैपुण्य आणि कौशल्यावर अधिक भर देते आणि हेच सर्व महिला चित्रपट निर्मात्यांनी केले पाहिजे, असे त्यांनी चित्रपट निर्मिती आणि परीक्षण संदर्भात लिंगभाव आणि दृष्टीकोन यावरील प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
“आम्ही राष्ट्रीयत्व आणि विचारसरणी याचा विचार न करता चित्रपट कलेचा मनमुराद आनंद घेतला . चित्रपटात प्रेक्षकांना हेलावून टाकण्याची किंवा भारावून टाकण्याची ताकद आहे की नाही, तो आश्चर्यकारक आणि नवीन आयाम किंवा संकल्पना घेऊन आला आहे की नाही, तो माध्यमाच्या साधनांचा प्रभावीपणे वापर करून कथा सांगतो की नाही आणि विषयाला महत्व न देता कलात्मक गुणवत्ता हे मुख्य निकष या स्पर्धेसाठी चित्रपटांचे परीक्षण करताना आम्ही पाहिले, असे आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या ज्युरी सदस्यांपैकी एक कोलंबियन चित्रपट दिग्दर्शक सिरो गुएरा म्हणाले.
भारतीय चित्रपटांबाबत भाष्य करताना सिरो म्हणाले की भारतीय चित्रपटातील रसरशीतपणा , वैविध्य आणि कल्पनाशक्ती खरोखरच आश्चर्यकारक आहे. “हा खरोखरच एक प्रतिष्ठित उत्सव आहे आणि येथील ज्युरीचा भाग बनल्याबद्दल हा मला सन्मान वाटतो”, असे ते म्हणाले.
ज्युरींच्या तटस्थतेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की जेव्हा तुम्ही ज्युरी सदस्य असता तेव्हा तुम्हाला तुमचे राष्ट्रीयत्व आणि विचारसरणी बाजूला ठेवून कलात्मक गुणवत्तेच्या आधारे चित्रपटाचे परीक्षण करायचे असते.
“भारताने जगाला सांगण्याची गरज असलेल्या अनेक कथा आहेत. मी यापूर्वी अनेक भारतीय चित्रपट पाहिले असले तरी यावेळी मला नवीन आणि रंजक कथा विषय आढळले ” असे जयसुंदरा यांनी भारतीय चित्रपटांविषयी बोलताना सांगितले.
“इफ्फी हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे व्यासपीठ आहे. त्यांनी ज्या प्रकारचे चित्रपट निवडले आहेत ते सर्वसमावेशकता आणि वैविध्य दर्शवते,” असे राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट निर्माते आणि ज्युरी सदस्य नीला माधव पांडा यांनी सांगितले.
सिनेमावर महामारीच्या परिणामावर बोलताना पांडा म्हणाले की ज्युरी सदस्यांना कोणत्याही चित्रपटात कोणत्याही प्रकारची कलात्मक तडजोड आढळली नाही.
चित्रपटांचे परीक्षण करण्याचा त्यांचा अनुभव अधोरेखित करताना, सदस्यांनी एकमताने सांगितले की त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये सिनेमाचा मनमुराद आनंद लुटला.
* * *
Jaydevi PS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1775913)
Visitor Counter : 295