माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इफ्फीबरोबर यावर्षी पहिल्यांदाच ब्रिक्स चित्रपट महोत्सवाचे देखील आयोजन
इफ्फीमुळे ब्रिक्स चित्रपट महोत्सवाला जास्त प्रेक्षकवर्ग मिळतो आहे: थँडी डेव्हिड्स, परीक्षक मंडळ सदस्य
चित्रपट आणि चित्रपट व्यावसायिक यांना एकाच छताखाली आणण्यासाठी चित्रपट स्पर्धा महत्त्वाच्या असतात :नीना कोचेल्याएव्हा, परीक्षक सदस्य
पणजी, 27 नोव्हेंबर 2021
“आपण सर्वजण वेगवेगळ्या संस्कृतीतून, वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आणि वेगळ्या विचार प्रक्रियांतून आलेलो आहोत आणि तरीही आज आपण येथे या स्पर्धेसाठी एकमताने एक सर्वोत्तम चित्रपट निवडण्यासाठी एकत्र आलो आहोत,”असे प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक, संकलक आणि ब्रिक्स चित्रपट महोत्सवाच्या परीक्षक मंडळाचे प्रमुख राहुल रवैल यांनी आज गोव्यात, 52 व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
यावर्षी पहिल्यांदाच 20 ते 28 नोव्हेंबर 2021 या कालावधीत गोव्यात आयोजित केलेल्या इफ्फीबरोबरच ब्रिक्स चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . ब्रिक्स चित्रपट महोत्सवाचे हे सहावे वर्ष असून यात ब्राझील, रशिया,भारत,चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच ब्रिक्स सदस्य देशांतील चित्रपटांच्या विशेष पॅकेजचे सादरीकरण केले जाते.
या वर्षी, जगातील प्रमुख उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या आणि चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातील आघाडीचे पाच देश एकत्र आणणारा ब्रिक्स चित्रपट महोत्सव इफ्फीमध्ये होत आहे. या महोत्सवातील उत्कृसठ चित्रपट निवडण्यासाठी नेमलेल्या परीक्षक मंडळामध्ये प्रत्येक ब्रिक्स देशातील एक अशा पाच सदस्यांचा समावेश आहे. त्यात राहुल रवैल(मुख्य परीक्षक) (भारत), मारिया ब्लान्के अल्सिना दे मेंडोन्का (ब्राझील), थँडी डेव्हिड्स (दक्षिण आफ्रिका), नीना कोचेल्याएव्हा(रशिया) आणि होऊ केमिंग(चीन) यांचा समावेश आहे . या परीक्षक मंडळ सदस्यांनी सुमारे वीस चित्रपट बघितले आणि त्यातून पाच श्रेणींतील पुरस्कारांसाठीच्या चित्रपटांची निवड केली.प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि परीक्षकांतर्फे विशेष उल्लेखनीय चित्रपट अशा पाच श्रेणींसाठी चित्रपट निवडण्यात आले.
या बाबत सविस्तर माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल रवैल, थँडी डेव्हीस आणि नीना कोचेल्याएव्हा यांनी भाग घेतला.
इफ्फीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज 28 नोव्हेंबर 2021 रोजी होणाऱ्या समारोप समारंभादरम्यान ब्रिक्स चित्रपट महोत्सवाचा पुरस्कार वितरण सोहोळा होईल.
ब्राझिलचे ख्यातनाम चित्रपट निर्माते आणि परीक्षक मंडळ सदस्य थँडी डेव्हिड्स यांनी सांगितले, “हा खरोखरीच आम्हा सर्वांसाठी एक असामान्य सांस्कृतिक प्रवास होता ज्यामध्ये आम्हांला विविध संस्कृतींची ओळख झाली आणि त्यांच्या विविधतेचे दर्शन झाले. आम्ही या चित्रपटांपासून आणि इथे आलेल्या विशेष तज्ञांकडून खूप गोष्टी शिकलो.”
यावेळी उपस्थित असलेल्या आणखी एक परीक्षक मंडळ सदस्य, वरिष्ठ चित्रपट संशोधक आणि शिक्षक नीना कोचेल्याएव्हा म्हणाल्या की या महोत्सवासाठी प्रत्येक देशातून उत्तम चित्रपट निवडण्यात आले होते. प्रत्येक देशातील चित्रपटाने त्यांची स्वतःची संस्कृती, भाषा आणि गहन अर्थांचे प्रतिनिधित्व केले.
ब्रिक्स चित्रपट महोत्सवाच्या गेल्या आवृत्तीमध्ये रशियन लोकांनी “ हॉलीवूडपटांसाठी ब्रिक्स चित्रपटांचा पर्याय” या नावाचा विशेष कार्यक्रम सादर केला होता अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
ओटीटी मंच लोकांना चित्रपट पाहण्यासाठी नवे मार्ग उपलब्ध करून देत आहेत मात्र मोठ्या पडद्यावर चित्रपट बघण्यातील आनंद कधीच कमी होणार नाही याचा पुनरुच्चार करत लव्ह स्टोरी आणि बेताबसारखे प्रसिध्द चित्रपट निर्माण करणाऱ्या राहुल रवैल यांनी सांगितले, “ओटीटी मंच मोठ्या पडद्यांची जागा घेऊ शकतील असे मला वाटत नाही.”
डेव्हिड्स म्हणाले की ब्रिक्स आणि इफ्फी हे चित्रपट महोत्सव यावेळी पहिल्यांदाच एकत्रितपणे सादर होत आहेत त्यामुळे 52 व्या इफ्फीमध्ये सहभागी होणे अत्यंत उत्साहवर्धक आहे. इफ्फीच्या चौकटीमुळे ब्रिक्स चित्रपट महोत्सवाला जास्त प्रेक्षकवर्ग मिळतो आहे असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.
* * *
Jaydevi PS/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1775806)
Visitor Counter : 207