माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भागवदाज्जुकम हा संस्कृत भाषेत एक हलका फुलका सिनेमा बनवण्याचा माझा प्रयत्न आहे- यदू विजयकृष्णन, 52व्या इफ्फीमधील इंडियन पॅनोरमा चित्रपटाचे दिग्दर्शक

सातव्या शतकातील विडंबनात्मक नाट्यावर आधारित भगवदाज्जुकमचा इफ्फी 52 मध्ये जागतिक प्रिमिअर करण्यात आला

Posted On: 26 NOV 2021 10:25PM by PIB Mumbai

पणजी, 26 नोव्‍हेंबर 2021 


संस्कृत चित्रपट म्हणजे नेहमीच अतिशय गंभीर चित्रपट अशी ओळख तयार झाली आहे. मात्र, भागवदाज्जुकम या चित्रपटातून ही ओळख बदलण्याचा मी प्रयत्न केला आहे. प्रेक्षक अतिशय आरामात बसून मनापासून आनंद घेतील असा एक हलका फुलका चित्रपट  संस्कृत भाषेत बनवण्याचे माझे उद्दिष्ट होते. गोव्यामध्ये इफ्फी52 मध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या चित्रपटाचे दिग्दर्शक यदु विजयकृष्णन यांनी हा चित्रपट बनवण्यामागची भूमिका मांडली.

52व्या इफ्फीमध्ये इंडियन पॅनोरमा विभागात फीचर फिल्म श्रेणीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करताना त्याच्या जागतिक प्रिमियरचे देखील आयोजन करण्यात आले.

ऐतिहासिक विषयांवर चित्रपट बनवण्याची आवड असलेल्या यदु विजयकृष्णन यांनी सांगितले की या चित्रपटाचे निर्माते किरण राज यांना संस्कृत भाषेची अतिशय आवड असल्याने त्यांनी हा चित्रपट संस्कृतमधून बनवण्याची इच्छा व्यक्त केली. सातव्या शतकातील बोधायनातील या विडंबनात्मक नाटकाची निवड कशी केली याविषयी सांगताना यदु विजयकृष्णन म्हणाले की मला एक नवी कथा लिहिण्याची अजिबात इच्छा नव्हती. मी अगदी मनापासून एका कथेच्या शोधात होतो.भगवदाज्जुकम बौद्ध आणि हिंदू तत्वज्ञानावर आधारित असून अनेक भाषांमधील नाटकांमध्ये त्याचा वापर करण्यात आला आहे. तसेच केरळमधील कुडीयट्टम या पारंपरिक कलाप्रकारात देखील त्याचा वापर केला आहे.

या भाषेतून चित्रपट बनवताना आलेल्या अडचणींची माहिती देताना ते म्हणाले की यासाठी त्यांनी सोपानम थिएटर ग्रुपमधील कलाकारांपैकी काहींची विशेषत्वाने निवड केली कारण त्यांना यातील पात्रे आणि त्यांचे संवाद यांची चांगल्या प्रकारे माहिती होती. सोपानम थिएटर ग्रुपचे संस्थापक कवालम नारायण पणीकर यांनी भगवदाज्जुकमवर 2011 मध्ये एक नाटक बसवले होते.

या चित्रपटाच्या सहलेखक आणि  संस्कृत पंडीत अस्वाथी अंबिका विजयन यांनी आमचे काम खूप सोपे केले. त्यांनी सर्व संवादांचे आम्हाला भाषांतर करून दिल्यामुळे आमचे काम बऱ्यापैकी सोपे झाले, अशी माहिती या चित्रपटाच्या प्रवासादरम्यानच्या आणखी काही पैलूंबाबत बोलताना विजयकृष्णन यांनी दिली.

या चित्रपटाच्या जागतिक प्रिमियरच्या वेळी मिळालेल्या प्रतिक्रियांबाबत यदु विजयकृष्णन यांना विचारले असता, त्या मिश्र स्वरुपाच्या होत्या असे त्यांनी सांगितले. यदु विजयकृष्णन हे चित्रपट निर्माते, सिनेमॅटोग्राफर, लेखक आणि ग्राफिक डिझायनर आहेत. 21 मन्थ्स ऑफ हेल हा माहितीपट आणि द स्टोरी ऑफ अयोध्या या ऐतिहासिक कादंबरीसाठी ते ओळखले जातात.

* * *

Jaydevi PS/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1775541) Visitor Counter : 83


Read this release in: Urdu , English , Hindi