माहिती आणि प्रसारण मंत्रालय
एक अभिनेता म्हणून मी प्रत्येक भूमिकेसह, त्या पात्राबरोबर वाढण्याचा प्रयत्न करतो - ‘द गेस्ट’ चित्रपटाचा अभिनेते मारिआनो पॅलॅसिओस यांचे मनोगत; इफ्फीमध्ये साधला पत्रकारांशी संवाद
पणजी, 26 नोव्हेंबर 2021
‘‘एक अभिनेता म्हणून मी प्रत्येक चित्रपटात साकारत असलेल्या व्यक्तिरेखेबरोबर वाढण्याचा प्रयत्न करतो, मला आव्हान देतील, अशी विविध पात्रे साकारण्याचा माझा प्रयत्न असतो,’’ असे मनोगत अभिनेते मारिआनो पॅलॅसिओस यांनी आज गोव्यात इफ्फीच्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. 52 व्या इफ्फीमध्ये मारिआनो यांच्या ‘द गेस्ट’ या स्पॅनिश चित्रपटाचे प्रदर्शन झाले.
यंदाच्या इफ्फीमध्ये जागतिक पॅनोरमा विभागात ‘द गेस्ट’ या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर झाला. त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
ही एका दांपत्याची कथा आहे. त्यांच्या घरी पत्नीचा एक जुनी मैत्रीण पाहुणी म्हणून येते आणि त्यांच्या गतआयुष्याची कथा उलगडते.
‘‘आम्ही अतिशय अपारंपरिक पद्धतीने या चित्रपटाचे चित्रीकरण केले. अगदी लहान कच्च्या पटकथेपासून चित्रपटाच्या कामाला प्रारंभ केला. त्यावरच संपूर्ण चित्रपटाचा डोलारा उभा केला. मारिआनो यांनी पुढे सांगितले की, या चित्रपटाचे जवळपास 80 टक्के चित्रीकरण एकाच ठिकाणी करण्यात आले आहे.
ओटीटी मंचाच्या आगमनानंतर चित्रपट उद्योगाला असलेल्या संधीमध्ये खूप मोठा बदल झाला आहे, याविषयी बोलताना मारिआनो म्हणाले की, मेक्सिकोमध्ये खूप मोठा चित्रपट उद्योग आहे. त्यातील फारच कमी टक्के चित्रपटांना सिनेमागृहे मिळतात. तसेच इतर अनेकांनाही त्यांचे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी इतर मार्ग शोधावे लागतात. चित्रपटालाही शेवटी व्यावसायिक पैलू आहेच त्यामुळे ओटीटी मंच त्यादृष्टीने महत्वाचे ठरतो. कमी खर्चात तयार झालेले चित्रपट आणि समांतर सिनेमांना ओटीटी मंचाच्या आगमनाचा फारसा लाभ झालेला नाही, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
चित्रपटाविषयी -
अॅलिसिया आणि एन्रिक हे तरूण दांपत्य आहे. त्यांच्यात काही कारणाने दुरावा आहे. ज्यावेळी अॅलिसियाची मैत्रीण कार्लोटा तिला भेटायला येते आणि काही दिवस या दांपत्याबरोबर राहते. त्यावेळी त्यांचे नातेच धोक्यात येते.
दिग्दर्शकाविषयी -
या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन मेक्सिको सिटीमध्ये जन्मलेल्या अॅना मॅन्सेरा यांनी केले आहे. अॅना यांनी अनेक जाहिरात प्रकल्पांचे दिग्दर्शन केले आहे. रूटस्, रिव्होल्युशन मेक्सिको आणि वॅबी यांच्या प्रकल्पांचा त्यामध्ये समावेश आहे.
* * *
Jaydevi PS/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1775464)
Visitor Counter : 242