माहिती आणि प्रसारण मंत्रालय

‘द फर्स्ट फॉलन’ आपल्याला ‘पहिले लढवय्ये’- एलजीबीटीक्यू समुदाय आणि अनोळखी विषाणुविरुध्द त्यांनी दिलेला लढा यांचे दर्शन घडवितो – ब्राझिलचे चित्रपट निर्माते रॉड्रीगो दे ऑलिव्हिएरा यांचे इफ्फीमध्ये प्रतिपादन


जर आम्ही स्वतः आमच्या वेदनेच्या इतिहासाची नोंद केली नाही तर इतर कुणीही ती करू शकणार नाही : रॉड्रीगो दे ऑलिव्हिएरा

Posted On: 25 NOV 2021 10:20PM by PIB Mumbai

पणजी, 25 नोव्‍हेंबर 2021 

 

‘द फर्स्ट फॉलन’ हा चित्रपट म्हणजे ब्राझीलमध्ये 1983 साली आलेल्या एड्सच्या साथीच्या पहिल्या लाटेचे बळी ठरलेल्या एलजीबीटीक्यू अर्थात समलिंगी स्त्रिया, समलिंगी पुरुष, उभयलैंगिकता असणाऱ्या व्यक्ती, तृतीयपंथी आणि अनिश्चितलिंगी व्यक्तींच्या समुदायातील माझ्या पूर्वजांना वाहिलेली श्रद्धांजली आहे असे चित्रपटाचे दिग्दर्शक रॉड्रीगो दे ऑलिव्हिएरा यांनी सांगितले. हा चित्रपट त्याकाळी अज्ञात असलेल्या एड्सच्या विषाणुविरुद्ध दिलेल्या लढ्याच्या अलिखित इतिहासाचे दर्शन घडवितो.

“जगाचा ज्ञात अधिकृत इतिहास आमची नोंद घेत नाही म्हणून आम्हीच आमच्या इतिहासकाराची देखील भूमिका निभावतो आहोत. जर आम्ही आमच्या जीवन कहाण्यांची नोंद केली नाही तर दुसरे कुणीही आमच्यासाठी ती करू शकणार नाही, असे उद्गार ‘द फर्स्ट फॉलन’ या चित्रपटाबाबतच्या दृष्टिकोनाबद्दल बोलताना, रॉड्रीगो दे ऑलिव्हिएरा यांनी काढले.

यासंदर्भात युरोप आणि इतर पश्चिमी देशांनी सांगितलेल्या भव्य कथांना विरोध करण्याच्या गरजेवर भर देत ते म्हणाले की, “जेव्हा या विषाणुला नेमके नाव देखील मिळालेले नव्हते त्या काळात, 1983 च्या सुमारास, ब्राझीलमध्ये या विषाणूच्या संसर्गासह समलिंगी पुरुष अथवा तृतीयपंथी स्त्री म्हणून जीवन जगणे काय असेल हे समजून घेणे आपल्या कल्पनेच्याही पलीकडचे आहे.”

मला उपेक्षितांचा आवाज सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे. जर आम्ही स्वतः आमच्या वेदनेचा इतिहास नोंदवून ठेवला नाही तर दुसरे कुणीही ते करणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

महामारीने जगाच्या विविध भागांवर वेगवेगळे परिणाम केले आहेत आणि म्हणूनच या चित्रपटाची भारतीय आवृत्ती पाहण्याची इच्छा आहे अशा शब्दात रॉड्रीगो दे ऑलिव्हिएरा यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

त्यांच्या ‘द फर्स्ट फॉलन’ या चित्रपटाला इफ्फीमध्ये मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त करत ऑलिव्हिएरा म्हणाले, “हा चित्रपट किती लोकप्रिय झाला ते चित्रपटाच्या सादरीकरणाच्या वेळी गर्दीने भरून गेलेल्या सभागृहाकडे बघून कळले, लोकांच्या या प्रतिसादाने मी भारावून गेलो आहे.”

‘द फर्स्ट फॉलन’ चित्रपटाविषयी थोडेसे

1983 साल संपत असताना, ब्राझीलमधील एक छोट्या शहरामध्ये, पुढे भविष्यात काय वाढून ठेवले आहे याची अजिबात कल्पना नसलेले एलजीबीटीक्यूआयए+ पुरुष आणि स्त्रिया नववर्ष स्वागताचा उत्सव साजरा असतात. त्यांच्यातील जीवशास्त्रज्ञ सुझॅनोला समजते की कुठलीतरी भयंकर गोष्ट त्याच्या शरीरामध्ये अस्वस्थता निर्माण करते आहे. स्वतःच्या भविष्याविषयी शंकित झाल्यामुळे आणि काहीच नीट माहित नसल्याकारणाने बेचैन झाल्यामुळे सुझॅनो तृतीयपंथी कलाकार रोझ आणि व्हिडीओ निर्माता हम्बर्टो यांची मदत मागतो, पण ते दोघेही अशाच प्रकारच्या आजाराने ग्रासलेले असतात. आता ते सर्व एकत्र येऊन एड्स साथीच्या पहिल्या लाटेतून बचावण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करतात.  
 

* * *

Jaydevi PS/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1775225) Visitor Counter : 279


Read this release in: English , Urdu , Hindi