आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्र्यांनी अन्नसुरक्षा जाणीव जागृती वाहनांना दाखविला हिरवा झेंडा आणि एफएसएसएआयच्या कार्यालयात पोषण विषयावरील पुस्तकाचे केले अनावरण


“आपल्या पूर्वीच्या पिढ्यांसाठी खाण्याची निवड आणि पोषण यासंदर्भात आई- आज्जी वर्गाने महत्त्वाची भूमिका निभावली. पुढच्या पिढ्यांना अन्न पदार्थांसाठी निवड करण्याबाबत शिक्षित करण्याची नितांत गरज आहे”:डॉ.भारती प्रवीण पवार

Posted On: 25 NOV 2021 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2021

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार यांनी आज एफएसएसएआय अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि प्रमाणके प्राधिकरणाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी प्राधिकरणाच्या कार्यालयाला भेट दिली. या प्रसंगी त्यांनी अन्नसुरक्षा जाणीव जागृती वाहनांना हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले आणि अन्नाचा इतिहास सांगणारे पुस्तक तसेच मिठाचा कमीतकमी वापर करून केल्या जाणाऱ्या पाककृतींचे पुस्तक अशा दोन पुस्तकांचे अनावरण केले. यावेळी राष्ट्रीय किमान मीठ वापर पाककला स्पर्धेचा अहवाल देखील जारी करण्यात आला. 

केंद्रीय आरोग्य  आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्र्यांनी अन्नाचे परीक्षण करणाऱ्या फूड सेफ्टी ऑन व्हील्स या फिरत्या वाहनांतील तांत्रिक क्षमतांचे देखील परीक्षण केले. तपासणीसाठी जमा केलेल्या अन्न पदार्थांमधील भेसळ शोधून काढण्यासाठी या वाहनांमध्ये अत्याधुनिक साधनांची सोय केली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी देशभरात अन्न सुरक्षा परिसंस्थांना पाठबळ पुरविण्याच्या हेतूने सुरु करण्यात आलेल्या या वाहनांना हिरवा झेंडा दाखविला.

या प्रसंगी बोलताना डॉ. भारती प्रवीण पवार म्हणाल्या की समग्र दृष्टीने पाहता अन्न हा आरोग्यासाठीचा आवश्यक घटक आहे. समतोल पोषण हा निरोगी जीवनाचा अविभाज्य भाग आहे, असे त्या म्हणाल्या. अन्न सुरक्षा साध्य करण्यात सरकार आणि उद्योगांसह नागरिक हे देखील महत्त्वाचे भागधारक आहेत यावर त्यांनी भर दिला. अन्नसुरक्षा प्राप्त करण्याच्या दिशेने देशाला पुढे नेताना औद्योगिक भागीदारांसह या संस्थेने हाती घेतलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अन्न सुरक्षा कायद्यातील तरतुदींच्या संदर्भात एफएसएसएआयच्या कार्यांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी, भेसळीच्या काही विशिष्ट घटनांमध्ये दोषी व्यक्तीला देण्यात येणारी तुरुंगवासाची शिक्षा कमी करून केवळ दंड आकारणीची शिक्षा करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांना देण्यात आली आणि अपायकारक पदार्थ वापरून जाणूनबुजून केल्या जाणाऱ्या भेसळीच्या गुन्ह्यांतील दोषींना शिक्षा करण्यासाठी कडक तरतुदी करण्याची मागणी करण्यात आली. याच्याच जोडीने, भारताच्या चैतन्यमय अन्न उत्पादन क्षेत्रासह विस्तृत पातळीवर ग्राहकांना नियमांचा लाभ व्हावा असा दृष्टीकोन स्वीकारण्यात आला.

या प्रसंगी भारताच्या अन्न परिसंस्थेचे परस्पर संवादात्मक पद्धतीने प्रदर्शन करणाऱ्या एफएसएसएआय प्रदर्शिकेतून केंद्रीय मंत्र्यांनी फेरी मारली.

भारतात सर्वसामान्यपणे शिजविल्या आणि खाल्ल्या जाणाऱ्या अन्न पदार्थांचा इतिहास सांगणाऱ्या ‘इतिहास आणि अन्न’ या पुस्तकासह विविध नाविन्यपूर्ण पुस्तके आणि एफएसएसएआयच्या उपक्रमांची माहिती सांगणारी पुस्तके देखील प्रकाशित केली. मिठाचा किमान वापर करून तयार होणाऱ्या पाककृतींवर आधारित ‘इट राईट विथ लो सॉल्ट’ आणि राष्ट्रीय किमान मीठ वापर पाककला स्पर्धेचा अहवाल देखील त्यांच्या हस्ते जारी करण्यात आला.

जागतिकीकरण आणि उपभोगवाद यांच्या उदयामुळे आता आपण ग्रहण करत असलेल्या अन्नाबाबत अधिक दक्षता बाळगणे आवश्यक आहे असे निरीक्षण डॉ.पवार यांनी नोंदविले. आपल्या पूर्वीच्या पिढ्यांसाठी खाण्याची निवड आणि पोषण यासंदर्भात आई तसेच आजी वर्गाने महत्त्वाची भूमिका निभावली. पुढच्या पिढ्यांना अन्नाची निवड करण्याबाबत शिक्षित करण्याची नितांत गरज आहे असे त्या म्हणाल्या.

एफएसएसएआयच्या प्रमुख रिटा तेवटीया, एफएसएसएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सदस्य सचिव अरुण सिंघल आणि केंद्रीय आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव मनदीप भंडारी हे देखील केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीदरम्यान उपस्थित होते.

 

 

G.Chippalkatti/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1775121) Visitor Counter : 166


Read this release in: English , Urdu , Hindi