माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
0 7

सत्ता मिळाल्यानंतर तुम्ही काय करता, दिलेली वचने कशी पूर्ण करता आणि नागरिकांचे जीवन कसे बदलते याविषयीचा ‘प्रॉमिसेस’ चित्रपट: 52व्या इफ्फीमध्ये जागतिक पॅनोरमामध्ये चित्रपट दिग्दर्शक थॉमस क्रुथॉफ


सत्तेतल्या महिलेच्या एका फ्रेंच राजकीय नाट्याचा इफ्फीमध्ये प्रीमियर, राजकारणात एकनिष्ठता आणि नागरिकांसाठी सचोटीने काम करीत असूनही महत्वाकांक्षेच्या जगामध्ये टिकून राहता येते का, असा प्रश्न विचारणारा चित्रपट

पणजी, 24 नोव्‍हेंबर 2021 

 

सत्तेमध्ये असलेल्या एक महिलेविषयी राजकीय नाट्य, ‘प्रॉमिसेस’ या चित्रपटात घडते. ही महिला एकीकडे सत्तेच्या एकएक पाय-या चढत जाताना अनेक व्दंव्दाचे प्रसंग येतात. अनेक मागण्यांना तिला सामोरे जावे लागते. अशावेळी नैतिकतेचे मुद्देही संकट बनून तिच्यासमोर येतात. तर दुसरीकडे तिला निवडून देणा-या नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्याची तिची अगदी मनापासून इच्छा असते. शक्ती आणि चारित्र्य यांच्यामध्ये गुंतागुंत वाढत जाते. दिग्दर्शक थॉमस क्रुथॉफ यांच्या ‘प्रॉमिसेस’ या चित्रपटात प्रेक्षकही तितकेच गुंतून जातात. त्यांचा चित्रपट पाहणा-याला व्यापून टाकतो. या चित्रपटाचा 52 व्या इफ्फी म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये प्रदर्शन करण्यात आले. जागतिक पॅनोरमा विभागात या चित्रपटाचा प्रीमियर झाला.

या महोत्सवामध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना क्रुथॉफ यांनी चित्रपट प्रतिनिधींना सांगितले की, ‘महापौरपदाच्या निवडणुकीची पार्श्वभूमी या चित्रपटाच्या केंद्रस्थानी ठेवून कथा लिहिली आहे. या चित्रपटाचा आधार  भ्रष्टाचार हा नसला तरीही राजकीय चित्रपटांमध्ये वारंवार चर्चेला येणारा विषय म्हणजे भ्रष्टाचार आहे. एखाद्याचा अहंकार तसेच एखाद्याची नैतिकता यांच्याविषयी अवघड वाटणा-या घटनांचे हे चित्रण आहे.’’

या चित्रपटात दिग्दर्शकाने काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. ‘‘फ्रेंच अभिनेत्री इसाबेल हुपर्ट हिने या चित्रपटात प्रमुख भूमिका केली आहे. पॅरिसजवळच्या क्लेमेन्स शहराची निर्भय महापौर अशी तिची भूमिका आहे. तिला आपल्या शहरातल्या नागरिकांविषयी तसेच त्यांच्या समस्यांची चांगली जाण आहे. महापौर म्हणून आपल्या कारकिर्दीचा अखेरचा टप्पा पूर्ण होणार असतानाच मंत्रिपद आपल्याला मिळू शकते, असे नायिकेला लक्षात येते आणि तिच्या राजकीय महत्वाकांक्षांना अंकूर फुटतात. आणि मग मात्र सत्तेच्या हिंदोळ्यावरची आंदोलने तिला जाणवू लागतात. तिची कोंडी व्हायला लागते.

‘‘चित्रपटाच्या नायिकेने नेहमीच गरीबी, बेरोजगारी यांच्याशी लढा दिला आहे. तथापि, ज्यावेळी सत्तेची आकांक्षा जागृत होते, त्यावेळी ती त्यामध्ये अडकून पडते. ती प्रामाणिक आहे, मात्र तिच्या वर्तनात परिवर्तन होते. तिला सत्ता तर हवी आहेच परंतु त्याचवेळी तिला आपली एकनिष्ठतेची प्रतिमाही ढळू द्यायची नाही. या प्रतिमेला तडा जाईल, अशी तिला सतत भीती वाटतेय. बाहेरून शांत दाखवत असली तरी तिच्या मनाला आतून शांतता नाही. राजकीय क्षेत्रात महिला कधीच शांत राहू शकत नाही,’’ असे ‘प्रॉमिसेस’च्या दिग्दर्शकांनी यावेळी नमूद केले.

या चित्रपटामध्ये राजकीय धाडसे, बांधिलकी, राजकारणातल्या महत्वाकांक्षा आणि चारित्र्यावर उडणारे शिंतोडे, यातून बरेच काही सांगितले जाते. चित्रपटामध्ये केंद्रस्थानी महिला आहे, याविषयी आपले मत मांडताना दिग्दर्शक म्हणाले की, ज्यावेळी एखादी महिला राजकारणात येते, त्यावेळी तिला नेहमीच विरोधाचा सामना करावा लागतो. त्यामुळे ती आपल्या भवतालच्या समस्या कशा पद्धतीने हाताळते, याचे चित्रण पाहणे रंजक ठरते.

या चित्रपटाला ‘प्रॉमिसेस’ हे नाव कसे दिले गेले, याविषयी सांगताना दिग्दर्शक क्रुथॉफ म्हणाले, राजकारणामध्ये वचने ही चलनासारखी असतात. राजकीय नेत्याचे प्रत्येक भाष्य हे एक जणू वचन असते. या वचनांच्या आधारेच तर ही मंडळी मते मिळवतात. या चित्रपटात दररोज घडणारे राजकारण दाखवले आहे. त्यामुळे यातील पात्रे कोणत्याही वैचारिक बाबतीत कमी आणि पैसा, पदे आणि पदानुक्रम यांच्याविषयीच जास्त बोलतात, असेही त्यांनी नमूद केले.


* * *

S.Tupe/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

iffi reel

(Release ID: 1774867) Visitor Counter : 319


Read this release in: Hindi , English , Urdu