माहिती आणि प्रसारण मंत्रालय
जन्म, आपत्ती आणि सुरु राहणारे जीवन हे एका चक्राचे भाग आहेत, मग केवळ मृत्यूचीच चर्चा कशाला?
रात्र कितीही मोठी असली तरी एक नवी पहाट होणारच आहे- तीन अध्याय
कोविड-19 च्या अंधःकारात आशेचा दीप प्रज्वलित करण्याचा ‘तीन अध्याय’ या इफ्फी-52 मधील इंडीयन पॅनोरमा चित्रपटाचा प्रयत्न
पणजी, 24 नोव्हेंबर 2021
COVID-19 लॉकडाऊन दरम्यान, मी माझ्या खिडकीजवळ एक कावळ्याला घरटे बनवताना पाहिले; या दृश्याने मला माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या सर्व गोष्टी विसरायला लावल्या. एरव्ही एक क्षुल्लक घटना म्हणून ज्याकडे दुर्लक्ष झाले असते त्यावरच लक्ष केंद्रित केल्यामुळे त्या घटनेचे रुपांतर निराशाजनक वातावरणामध्ये आशेचा एक किरण दाखवणाऱ्या एका शक्तिशाली सिनेमॅटिक अभिव्यक्तीमध्ये झाले. मुंबईस्थित ओडिया चित्रपट निर्माते सुभाष साहू यांनी हा अध्याय तयार केला. “वाळूच्या कणात जग आणि जंगली फुलात स्वर्ग पाहण्याची संवेदनशीलता असल्याने या दिग्दर्शकाने कावळ्याची दिनचर्या कॅमेऱ्यात चित्रित करायला सुरुवात केली. लॉकडाऊनमुळे घरात अडकून पडलेल्या माझ्या मुलाने देखील या चित्रिकरणामध्ये रस घेण्यास सुरुवात केली.
गोव्यामध्ये सुरू असलेल्या 52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत तीन अध्यायच्या दिग्दर्शकांनी या चित्रपटाविषयी माहिती दिली. तीन अध्याय हा चित्रपट इंडियन पॅनोरमा विभागात नॉन फीचर फिल्म श्रेणीत दाखवण्यात आला. या वार्ताहर परिषदेत या चित्रपटाचे निर्माते सुवीर नाथ, सुप्रभा साहू आणि संगीत दिग्दर्शक मनीष पिंगळे देखील सहभागी झाले होते.
देशव्यापी कोविड-19 लॉकडाऊनच्या काळात एका कावळ्याच्या जीवनप्रवासाने कशा प्रकारे एका चित्रिकरणासाठी आपल्याला प्रेरित केले याची माहिती सुभाष साहू यांनी दिली. जसजशी माझी चित्रिकरणाची प्रक्रिया पुढे सरकू लागली तसतशी त्याबाबत आमच्या संपूर्ण घरामध्ये उत्सुकता वाढू लागली आणि मग संपूर्ण घरच त्यात सहभागी झाले, असे त्यांनी सांगितले. तब्बल सहा ते सात महिने मी रोजच त्या कावळ्याच्या पिल्लांचा जन्म, त्या कावळ्यांनी आपल्या पिल्लांचा अतिशय मायेने केलेला सांभाळ, त्यांची काळजी, त्यांच्याविषयी असलेली त्यांची अतूट जवळीक आणि अर्थातच त्या पिलांपैकी एकाचा मृत्यू झाल्यावर मृत्यूच्या तांडवाचा केलेला सामना या घटनांचा मागोवा घेत राहिलो.
सर्वसामान्यांच्या दृष्टीला जे पाहता आले नसते ते या दिग्दर्शकाच्या नजरेने पाहिले. आयुष्यात कितीही संकटे येऊ देत, आपल्या जवळच्यांचे मृत्यू होऊ देत, तरीही जीवन सुरूच राहते हे त्या कावळ्याने दाखवून दिले. जर जीवन आहे तर मृत्यू देखील आहे, जर पहाट आहे तर रात्र देखील आहे. आनंद आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हीच भावना या चित्रपटामधील मुलामध्येही पाहायला मिळते, ज्याला कोविड-19 आपत्तीची किंवा त्यामुळे सभोवतालच्या जगात निर्माण झालेल्या हाहाकाराची पुसटशी जाणीव नसते.
आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आपत्तीनंतर नव्या आशांचे नवे अध्याय निर्माण होतच असतात असा विश्वास साहू यांनी व्यक्त केला आहे. मानवी मन कमालीची निराशा आणि भीतीने झाकोळून गेले असताना त्यात आशावाद आणि सकारात्मकता टिकवण्याचा प्रयत्न तीन अध्याय करत आहे.
भारतीय तत्वज्ञानामधील उत्पत्ती (जन्म), विपत्ती (आपत्ती) आणि चक्र (सुरू राहणारी प्रक्रिया) या तीन संकल्पनांवर या चित्रपटाची गुंफण केली आहे. एका निरागस आणि आजूबाजूच्या घटनांविषयी कुतूहल असलेल्या एका बालकासमोर कशा प्रकारे हे तीन अध्याय उलगडत जातात आणि त्याला आणि त्याचबरोबर संपूर्ण जगाला एक शिकवण देतात हे या चित्रपटात दाखवले आहे.
रात्र कितीही मोठी असली तरी पहाट होतच असते ही भावना आपल्या सर्वांमध्ये निर्माण करण्याची सर्वात जास्त गरज आता आहे, असे आम्हाला वाटले आणि तेच आम्ही या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, असे या चित्रपटाचे निर्माते सुवीर नाथ यांनी सांगितले. मृत्यू हा जीवनचक्राचा एक भाग असताना आपण केवळ त्याचीच चिंता का करायची. हा चित्रपट आपले आयुष्य, त्यातल्या घडामोडी, नातेसंबध या सर्वांमध्ये होणारे चढ उतार याविषयी भाष्य करतो. जे जन्माला आले आहे त्याचा शेवट होणार आहे आणि त्याचा पुन्हा जन्म होणार आहे. हे चक्र कधीही न थांबता सुरुच राहणार आहे. मग आपण केवळ मृत्यूचीच चर्चा का करायची, असे ते म्हणाले.
या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक मनीष पिंगळे यांनी त्यामधील संगीताचा वापर कशा प्रकारे करण्यात आला आहे त्याची माहिती दिली. एक शांत आलाप जन्मासाठी, आयुष्यातील आपत्तींसाठी वेगळ्या प्रकारचे संगीत आणि अंतिम अध्यायासाठी आणखी वेगळे संगीत अशा प्रकारे या तीन अध्यायांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी संगीताचा वैशिष्ट्यपूर्ण वापर केल्याचे त्यांनी सांगितले. या चित्रपटात अजिबात संवाद नसून संगीताची त्यामध्ये महत्त्वाची भूमिका असल्याकडे एक नामवंत साउंड इंजिनिअर असलेले साहू यांनी लक्ष वेधले. भारतीय राग आणि शास्त्रीय संगीताचा वापर यात करण्यात आला आहे. इफ्फीमध्ये पहिल्यांदाच सहभागी झालेल्या साहू यांनी एवढे मोठे व्यासपीठ आपल्या चित्रपटासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल इफ्फीचे आभार मानले.
* * *
S.Tupe/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1774854)
Visitor Counter : 275