माहिती आणि प्रसारण मंत्रालय
“मी वसंतराव” चित्रपट सर्वांनाच भावणारा, प्रत्येक उभरत्या कलाकाराला प्रोत्साहित करणारा आहे - दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी
वसंतराव देशपांडे यांची अफाट प्रतिभा समजून घेणं सामान्यांच्या कुवतीपालिकडचे - 52 व्या इफ्फीमधील सुवर्णमयूर स्पर्धेतील “मी वसंतराव” या स्पर्धक चित्रपटाचे दिग्दर्शक
पणजी, 24 नोव्हेंबर 2021
जर तुम्ही महाराष्ट्रात मोठे झाला असाल आणि तुम्हाला शास्त्रीय संगीत अथवा संगीत नाटकांबद्दल आकर्षण असेल तर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील अवलिया पंडित वसंतराव देशपांडे यांचे नाव तुम्हांला नक्कीच नवीन नसेल. 52 व्या इफ्फी अर्थात भारतीय अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील भारतीय पॅनोरमा विभागात चित्रपट श्रेणीमध्ये सादर होत असलेला "मी वसंतराव" हा चित्रपट अभिजात संगीतातील या महान कलाकाराच्या घडणीचा प्रवास दाखवितो आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील आणि जगातील चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील जाणकारांना प्रेरित करण्याचे वचन निभावतो.
या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 24 नोव्हेंबर 2021 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत चित्रपटाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी म्हणाले की, या चित्रपटात भिन्न भिन्न प्रेक्षकांना भावण्याची क्षमता आहे. “चित्रपटाची कथा व्यक्तिगतरित्या वसंतराव देशपांडे यांची असली तरीही त्यामध्ये कलाकार होऊ पाहणाऱ्या प्रत्येकासाठी सार्वत्रिक ओढ आहे.”
जगभरातील चित्रपटांमधून संपूर्ण लांबीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दिल्या जाणाऱ्या मानाच्या सुवर्ण मयूर पारितोषिकासाठीच्या स्पर्धेत असलेला हा चित्रपट, प्रख्यात होण्याआधी वसंतरावांच्या जीवनात काय घडले याचे वर्णन करतो. महाराष्ट्रात, विदर्भातील एका खेड्यात जन्मलेल्या आणि नंतर नागपूर येथे त्यांच्या आईकडून एकहाती जोपासना झालेल्या वसंतरावांचे जीवन म्हणजे त्यांच्या आयुष्याला आणि संगीत साधनेला आकार देणाऱ्या उत्कंठावर्धक घटनांचा कॅनव्हास आहे. त्यांचे जीवन घडविणाऱ्या घटनांमध्ये या महान कलाकाराची पु.ल.देशपांडे आणि बेगम अख्तर यांच्या अनोख्या मैत्रीचा, भारतीय सैन्यातील नोकरी, लाहोरमध्ये घेतलेले संगीत शिक्षण, 1962 च्या युद्धात भारत-चीन सीमेवर त्यांची झालेली नेमणूक आणि त्यांना मोठी ख्याती मिळवून देणारी कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकात केलेली भूमिका यांचा समावेश आहे.
“मी वसंतराव” या चित्रपटात वसंतरावांची भूमिका त्यांचेच नातू आणि प्रमुख समकालीन शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी वठविली आहे. त्यांच्या भूमिकेबद्दल बोलताना, दिग्दर्शक म्हणाले: “राहुल देशपांडे यांच्यासोबत मी काम केले आहे आणि आम्ही एकत्रपणे संगीत नाटकांना पुनरुज्जीवित केले. व्यावसायिक अभिनेता नसूनही त्यांनी ही भूमिका अत्यंत समर्थपणे केली आहे.”
वसंतराव देशपांडे यांची अफाट प्रतिभा समजून घेणं सामान्यांच्या कुवतीपालिकडचे असल्यामुळे या चित्रपटाची कथा तयार करण्यास दोन वर्षे लागली असे धर्माधिकारी यांनी सांगितले. “वसंतराव यांनी त्यांच्या आयुष्यात जे निर्णय घेतले त्याची कारणमीमांसा मला जाणून घ्यायची होती. जरी ते त्यांच्या काळातील सर्वोत्तम गायकांपैकी एक होते तरीही सुरुवातीच्या आयुष्यात घडलेल्या काही घटनांमुळे त्यावेळी त्यांनी गाण्याची आवड न जोपासण्याचा निर्णय घेतला होता. तसेच ते ओळखी वाढवण्यात देखील फारसे उत्सुक नसत हे सत्य आम्ही चित्रपटात दाखविले आहे.”
त्यांच्या जीवनाच्या नंतरच्या टप्प्यात घडलेल्या दोन घटनांचा देखील आम्ही चित्रपटात समावेश केला आहे असे त्यांनी सांगितले. चित्रपटाची पोहोच आणि इफ्फीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबाबत बोलताना निपुण धर्माधिकारी म्हणाले, “जेव्हा काल हा चित्रपट येथे प्रदर्शित झाला तेव्हा अगदी अमराठी प्रेक्षकांनी देखील आमच्याकडे येऊन सांगितले कि चित्रपटात साकारलेल्या भूमिकांशी ते स्वतःला जोडून घेऊ शकले. हा चित्रपट त्यांच्या भाषेतून पाहायला त्यांना आवडेल असे या प्रेक्षकांनी सांगितले. ते कसं शक्य होईल हे माहित नाही पण चित्रपट ही कालातीत कला असल्याने हा चित्रपट शेवटी प्रेक्षकांना जाऊन भिडेलच अशी मला आशा आहे.”
निपुण धर्माधिकारी हे मराठी लेखक, अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. संगीत नाटकांना पुनरुज्जीवन आणि पाच अंकी नाटकांची निर्मिती यासाठी ते प्रसिध्द आहेत.
* * *
S.Tupe/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1774834)
Visitor Counter : 290