माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
1 0

'बिटरस्वीट' ही भारतातल्या तोंड कडू करणाऱ्या साखरेची कथा - दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन


अव्वल राहण्याच्या शर्यतीत आपण मानवी समस्यांकडे डोळेझाक करत आहोत: महादेवन

पणजी, 24 नोव्‍हेंबर 2021 

 

‘बिटरस्वीट’ सुगुणा आणि तिच्या सहकारी महिला ऊसतोडणी मजुरांच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या कष्टांची कथा आहे. या महिला अशा परिस्थितीत अडकल्या आहेत की त्या ती टाळू शकत नाहीत, त्यातून त्या सुटू शकत नाहीत.

“ही भारताच्या साखर निर्मिती मागच्या वेदनांची कथा आहे. आपण जी साखर वापरतो ती खऱ्या आयुष्यात किती कडू असू शकते, हे या कथेतून कळते” असे चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन यांनी सांगितले. आज गोव्यात 52 व्या इफ्फीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाराष्ट्रातील बीडमधल्या गावातील महिला ऊसतोडणी मजुरांची वेदना महादेवन यांनी यावेळी मांडली. ब्राझीलला मागे टाकत ऊस निर्यातीत भारताचा क्रमांक एक बनवण्याच्या शर्यतीत, रोजची भाजीभाकरी मिळवण्याच्या संघर्षापायी महिला ऊसतोडणी मजुरांना अनेक भयानक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे.

“ऊसतोडणीचा कालावधी वर्षातील फक्त सहा महिने असतो आणि त्यांना उर्वरित वर्ष तोडणीच्या काळात मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारावर जगावे लागते. त्यामुळे महिला मजुरांना एक दिवसही सुट्टी घेणे परवडत नाही. परंतु दुर्दैवाने मासिक पाळीमुळे त्यांना दर महिन्याला 3 ते 4 दिवस गमवावे लागतात. हे नुकसान टाळण्यासाठी, बीड गावात सुमारे 10 वर्षांपूर्वी एक विचित्र प्रथा सुरू झाली,” महादेवन सांगत होते.

उत्तर प्रदेश आणि बिहारच्या भागांतून स्थलांतरित झालेले भोंदू आणि पात्रता नसलेले स्त्रीरोगतज्ज्ञ बीडमध्ये आले आणि पैसे कमावण्यासाठी या महिलांना 'हिस्टेरेक्टॉमी'ची - गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देऊ लागले. महिलांना हे पटवून देण्यात ते यशस्वी झाले की त्यांच्या सर्व समस्यांपासून त्यांची सुटका होईल, जसे की मासिक पाळीत दर महिन्याला होणाऱ्या वेदना, त्या दिवसांत वेतन कमी होणे आणि गर्भाशयातील गाठींची संभाव्य वाढ आणि इतर वैद्यकीय समस्या, यापासून त्यांची सुटका होऊ शकते.

“या भयंकर प्रथेचा परिणाम म्हणून आज चित्रपटातील नायिकेसारख्या तरुण मुलींवर या शस्त्रक्रिया होत आहे. जगण्यासाठी माणसाला कुठल्या थराचा संघर्ष करावा लागतो, त्याची ही कथा आहे. जैविक चक्रच अनैसर्गिकरित्या बदलून टाकण्याची ही कथा पूर्णपणे हादरवून टाकते”, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

या हृदयद्रावक घटनांवर सरकार आणि नागरी समाजाच्या प्रतिसादाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, की एका आंतरराष्ट्रीय माध्यम संस्थेने महाराष्ट्रातील काही स्वयंसेवी संस्था आणि कायदा करणाऱ्यांसमोर त्यांच्या टीमची मुलाखत घेतली. परंतु बलाढ्य साखर सम्राटांच्या ताकदीपुढे त्यांनी यावर काही करावेसे वाटत असतानाही असहायता व्यक्त केली.

“चित्रपटात आम्ही दाखवले आहे की एक सरकारी अधिकारी समस्यांची चौकशी करत आहे, परंतु उत्पन्नाचे एकमेव साधन असल्याने या क्षेत्रातील रोजगार गमावण्याच्या भीतीने कोणतीही महिला पुढे येत नाही. स्वेच्छेने त्या हे करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या भयावह सत्यामुळे कायदे करणारे आणि सामाजिक कार्यकर्ते हा मुद्दा हाताळण्यात हतबल ठरतात. प्रभावी साखरसाम्राट हादेखील एक अडथळा आहे”,  महादेवन म्हणाले.

एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी देत ​​असताना, आपण नेहमीच मानवी पैलू जपले पाहिजेत. कोणत्याही क्षेत्रात अव्वल होण्याच्या शर्यतीत, आम्ही मानवी समस्यांकडे दुर्लक्ष करत आहोत.”

एका अग्रगण्य दैनिकात ‘बीड, गर्भ नसलेल्या स्त्रियांचे गाव’ या शीर्षकाची बातमी वाचली. त्यापासून या चित्रपटासाठी प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यातील इफफी 52 मध्ये पत्र सूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या माध्यम संवादाला चित्रपटाचे निर्माते सुचंदा चॅटर्जी आणि शुभा शेट्टीदेखील उपस्थित होते.

 

चित्रपटाबद्दल:

22 वर्षीय सगुणा अनेक ऊसतोडणी मजुरांसोबत बीडमधील उसाच्या शेतात काम करण्यासाठी येते. कठोर परिश्रम करण्याचा आणि वडिलांचे कर्ज फेडण्यास मदत करण्याचा तिचा निर्धार आहे. मासिक पाळीच्या कारणास्तव ती तीन दिवस काम करत नाही, तेव्हा तिला मोठा दंड आकारला जातो. तिचे काम थांबू नये म्हणून तिला हिस्टरेक्टॉमी करण्याचा सल्लाही दिला जातो. हा नियम सगळ्यांसाठी आहे हे कळल्यावर तिला धक्काच बसतो. ही अशी परिस्थिती आहे की सगुणा आणि तिच्या सहकारी महिला मजूर टाळू शकत नाहीत किंवा त्यातून सुटू शकत नाहीत.

दिग्दर्शकाबद्दल: अनंत नारायण महादेवन हे हिंदी, मराठी, मल्याळम आणि तमिळ चित्रपट आणि टीव्ही शोचे पटकथा लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक आहेत. त्यांच्या ‘मी सिंधुताई सपकाळ’ (2010) ला अनेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले.

कलाकार-

निर्माता: क्वेस्ट फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड

पटकथा : अनंत नारायण महादेवन
डीओपी: अल्फोन्सो रॉय

संपादन: अनंत नारायण महादेवन, कुश त्रिपाठी

कलाकार: अक्षया गुरव, सुरेश विश्वकर्मा, स्मिता तांबे


* * *

S.Tupe/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

iffi reel

(Release ID: 1774831) Visitor Counter : 292


Read this release in: Hindi , English , Urdu