माहिती आणि प्रसारण मंत्रालय

सत्यजित रे यांचे चित्रपटाच्या प्रकार किंवा शैलीला प्राधान्य नव्हते, तर त्यांच्यासाठी केवळ आशय महत्वाचा असे : 52 व्या इफफीच्या मास्टरक्लास मध्ये व्यक्त करण्यात आले मत


रे त्यांच्या व्यक्तिरेखांच्या मनोभूमिकेचा सखोल विचार करत, त्याचवेळी प्रेक्षकांनाही या विचारशृंखलेचा ते भाग बनवत असत:" एफटीआयआयचे प्राध्यापक

Posted On: 23 NOV 2021 11:05PM by PIB Mumbai

पणजी, 23 नोव्‍हेंबर 2021 

 

"सत्यजित रे त्यांच्या कॅमेराच्या लेन्समधून थेट त्यांच्या व्यक्तिरेखांच्या मनोभूमिकेत प्रवेश करत असत; त्यातूनच त्यांना त्यांच्या चित्रपटातून जिवंत व्यक्तिरेखा साकारता आल्या." असं मत एफटीआयआय म्हणजेच, भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या चित्रपट संकलन विभागाचे सहायक प्रोफेसर ए.व्ही.नारायणन यांनी व्यक्त केले.  गोव्यात सुरु असलेल्या 52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान आज म्हणजेच 23 नोव्हेंबर ला झालेल्या मास्टरक्लास मध्ये ते बोलत होते. या मास्टरक्लासचे ऑनलाइन प्रक्षेपण https://virtual.iffigoa.org/ या लिंकवरुन करण्यात आले. 

सत्यजित रे यांच्या दिग्दर्शन कौशल्याबद्दल बोलतांना प्राध्यापक नारायणन म्हणाले, " त्यांच्यासाठी कॅमेरा लेन्सेस  आणि त्या भिंगाचा विस्तार समजून घेणे अत्यंत महत्वाचे होते.आधुनिक सिनेमाचे जनक मानले जाणाऱ्या सत्यजित रे यांनी त्यांच्या पहिल्याच चित्रपटात स्टोरीबोर्डिंग म्हणजे एकापाठोपाठ एक चित्र अनुक्रमे मांडून चलचित्र आधी दृश्य स्वरूपात समजून घेण्याचा प्रयोग केला,ब्रेक डाऊन म्हणजेच चित्रपटातील तांत्रिक बाबींचा अनुक्रमे तक्ता तयार केला, त्यांच्या या पूर्वतयारीमुळे नंतरचे संकलन अगदी सोपे होत असे.  

कथा सांगण्याच्या प्रक्रियेतच ते संकलनाची अत्यंत सुरेख,सहज गुंफण करत,असे नारायणन यांनी सांगितले. चित्रपटाचा प्रकार त्यांच्यासाठी कधीच महत्त्वाचा नव्हता तर कायम आशय महत्त्वाचा असे. 

दिग्दर्शन कौशल्यातील त्यांच्या नैपुण्यामुळेच अनेक व्यक्तिरेखा असलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन देखील ते सहजतेने करु शकत. "रे ज्याप्रकारे आपले हे कसब वापरत,ते बघतांना असे वाटते की आपण असं काहीतरी वाचतो आहोत, ज्यामागे अनेक अर्थ दडलेले आहेत. ते जणूकाही त्यांच्या चित्रपटांचे 'सूत्रधार' होते. असे सूत्रधार जे स्वतःच हे कथानक प्रेक्षकांना सांगत पुढे घेऊन जात आहेत, असा भास व्हावा. त्यांची त्यांच्या चित्रपटांवर पूर्ण पकड असे."  

रे यांचे मास्टरपीस चित्रपट 'अपूर संसार' आणि 'चारुलता' मधील काही दृश्ये दाखवत रे यांनी केलेले विविध प्रकार आणि शैलीचे प्रयोग तसेच अत्यंत वेगळ्या व्यक्तीरेखांची मांडणी, प्रा नारायणन यांनी समजावून सांगितली. चित्रपटातील महत्वाचा भाग संगीताच्या माध्यमातून ते अधिक प्रत्ययकारी कसा करत, हे ही त्यांनी सांगितले. अत्यंत अल्प स्वरूपात भाव-भावना दाखवण्याच्या शैलीवर रे यांचा विश्वास होता, असे नारायणन यांनी यावेळी सांगितले. " त्यांच्या व्यक्तिरेखांच्या मनातील आंदोलने, त्यांचे अंतर्गत संघर्ष रे यांनी पडद्यावर अप्रतिम साकारले आहेत. ते त्यांच्या व्यक्तिरेखांच्या थेट मनोभूमिकेत शिरत असत, एवढेच नाही तर प्रेक्षकांना देखील ही मनोभूमिका समजून घेण्याच्या प्रक्रियेत ते सहभागी करुन घेत”.

 

सत्यजित रे यांच्या जन्मशताब्दी निमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन 

या दिग्गज, असामान्य चित्रपटनिर्मात्याला आदरांजली अर्पण करण्यासाठी केंद्र सरकारने वर्षभर भारतात आणि परदेशात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. 

सध्या आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतो आहोत आणि सत्यजित रे यांचे जन्मशताब्दी वर्षही आहे. त्यानिमित्ताने, इफफी जीवन गौरव पुरस्काराला सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चित्रपट सृष्टीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना हा पुरस्कार प्रदान केला जातो.

यंदा, म्हणजेच 52 व्या इफफीमध्ये अमेरिकन चित्रपट निर्माते मार्टिन स्कॉरसेझी आणि इस्तेवान सोबो यांना 20 नोव्हेंबर 2021 रोजी सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.

सत्यजित रे यांनी आधुनिक चित्रपट सृष्टीचा पाया रचला असे मानले जाते. जगभरातील चित्रपट रसिकांच्या मनात त्यांचे अढळ स्थान आहे.

 

* * *

Jaydevi PS/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1774482) Visitor Counter : 190


Read this release in: English , Urdu , Hindi