माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
1 0

चित्रपट म्हणजे स्थळकाळाचे कॅमेऱ्याने बंदिस्त केलेले तुकडे असावेत यावर माझा विश्वास आहे : “गोदावरी” चित्रपटाचे दिग्दर्शक निखील महाजन यांचे इफ्फी 52 मध्ये प्रतिपादन


आमचा चित्रपट म्हणजे चित्रपट निर्माता निशिकांत कामत यांना वाहिलेली श्रद्धांजली आहे

पणजी, 23 नोव्‍हेंबर 2021 

 

“जर एखाद्याने 2070 मध्ये गोदावरी चित्रपट पाहिला तर त्याला गोदावरी नदी 2020 साली कशी होती याची कल्पना यायला हवी असे मला वाटते. त्या अर्थी चित्रपट म्हणजे स्थळकाळाचे कॅमेऱ्याने बंदिस्त केलेले तुकडे असावेत यावर माझा विश्वास आहे,” असे मत गोदावरी या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक निखील महाजन यांनी गोव्यात पणजी येथे सुरू असलेल्या 52 व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये बोलताना व्यक्त केले.

“आमचा हा चित्रपट म्हणजे आमच्या काळातील सर्वात प्रतिभावान चित्रपट निर्मात्यांमध्ये गणना होणाऱ्या निशिकांत कामत यांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. कामत आमचे जवळचे सुहृद होते. मी आणि जितेंद्र जोशी (या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारे), आम्ही त्याच दिवशी ठरवले की आम्ही या विषयावर चित्रपट तयार करत आहोत. पुणे 52 आणि बाजी नंतरचा हा माझा तिसरा चित्रपट आहे.” असे महाजन यांनी पुढे सांगितले.

चित्रपटातील प्रमुख पात्राला त्याच्या येऊ घातलेल्या मृत्यूची जाणीव होतानाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट सुरु होतो. गोदावरी हा चित्रपट या पात्राचा त्याच्या कुटुंबाचे भविष्य निश्चिंत करण्यासाठी आणि परंपरा जपण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या प्रवासाचे वर्णन करतो.

“नद्या या जीवनवाहिन्या असतात, त्या संस्कृतीच्या निर्मात्या आहेत आणि गोदावरी ही देखील अशीच एक नदी आहे. ती अतिशय पवित्र आणि महत्त्वाची नदी असून या नदीशी काही जादुई गोष्टी जोडलेल्या आहेत असा लोकांचा विश्वास आहे. मला पहिल्यांदाच या चित्रपटात  गोदावरी नदी जवळून पाहण्याची संधी मिळाली. संपूर्णपणे नवे शहर पाहणे आणि चित्रपटासाठी त्याचे चित्रण करणे हा अत्यंत विलक्षण अनुभव होता,” असे महाजन यांनी सांगितले.

चित्रपटाविषयी थोडेसे

गोदावरी या निखील महाजन यांच्या चित्रपटातील कथा महाराष्ट्रातील गोदावरी नदीकाठच्या आजच्या नाशिक शहरात घडते. हा चित्रपट चिडखोर जमीनमालक आणि त्याचे कुटुंबीय यांच्यावर बेतलेला आहे. हे सर्वजण एका ज्ञात आणि एका अज्ञात अशा दोन मृत्यूंमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी कसे जुळवून घेतात याचे चित्रण बघायला मिळते. या चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशी प्रमुख भूमिका साकारत आहे.

या दोन मृत्युंमुळे गोदावरी नदीशी नाते निर्माण होऊन त्या जमीनमालकाचा अध्यात्मिक प्रवास सुरु होतो. ‘गोदावरी’ हा चित्रपट म्हणजे जीवन आणि मृत्यू यांच्या सखोल तात्विक शोधाचा प्रवास आहे. 

दिग्दर्शकाविषयी थोडेसे

निखील महाजन हे दिग्दर्शक आणि लेखक आहेत. गोदावरी (2021), पुणे-52 (2013) आणि बेताल (2020) हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.


* * *

Jaydevi PS/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

iffi reel

(Release ID: 1774398) Visitor Counter : 443


Read this release in: Hindi , English , Urdu