माहिती आणि प्रसारण मंत्रालय
विस्मृतीत गेलेल्या एका अर्जेंटिनीयन अभिनेत्रीने आपल्या आकांक्षी भवितव्याच्या शोधात केलेल्या वाटचालीचे इफ्फी 52 च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील शार्लोटमधून दर्शन
पणजी, 22 नोव्हेंबर 2021
तिचा गतइतिहास अतिशय संस्मरणीय आहे, तिला जागतिक सिनेसृष्टीत ज्या दिग्दर्शकाने प्रथम प्रकाशझोतात आणले त्याच्या सोबत केलेली ती एकेकाळची संस्मरणीय वाटचाल आजही तिला पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी प्रेरित करत आहे आणि तिला प्रसिद्धी मिळवून देणारा तिचा पूर्वाश्रमीचा मार्गदर्शक पराग्वेमध्ये त्याच्या अखेरच्या चित्रपटाचे चित्रिकरण करत असल्याचे कळल्यावर, सध्या विस्मृतीत गेलेली अर्जेंटिनीयन अभिनेत्री शार्लोट त्याची भेट घेण्यासाठी आपल्या असाधारण प्रवासाला निघते. त्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात आघाडीची भूमिका करण्याची आपल्याला संधी आहे या विचारापेक्षाही ती भूमिका केवळ आपल्यासाठीच आहे हा दुर्दम्य आत्मविश्वास तिला बळ देत असतो.

इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात दाखवल्या जाणाऱ्या शार्लोट या चित्रपटात तिने केलेल्या या प्रवासाचा अनुभव घ्या. यामध्ये तिच्या भूतकाळातल्या आठवणींची आपल्या उत्तम भविष्याची स्वप्ने साकारण्यासाठी केलेल्या वर्तमानातल्या वाटचालीबरोबर केलेली गुंफण आहे. शार्लोटची भूमिका साकारली आहे स्पॅनिश चित्रपटांमधील अँजेला मोलिना या आघाडीच्या अभिनेत्रीने.

शार्लोटचे दिग्दर्शक सिमॉन फ्रँको यांनी आज गोव्यात इफ्फीमध्ये आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत या चित्रपटातील या आघाडीच्या अभिनेत्रीच्या असामान्य प्रवासात तिला आलेले अनुभव, नेहमीपेक्षा वेगळ्या स्थानांना दिलेल्या भेटी आणि निर्माण झालेली अनपेक्षित परिस्थिती यावर त्यांनी प्रकाश टाकला.
यावेळी चित्रटाचे निर्माते लेना फर्नांडिझ यांनी देखील दिग्दर्शकांसोबत या इफ्फीमधील त्यांचे अनुभव उपस्थित प्रतिनिधींना सांगितले. या चित्रपटाला रस्त्यावरील प्रवासाचे वर्णन म्हणता येईल का या प्रश्नावर दिग्दर्शक म्हणाले की हो नक्कीच, या चित्रपटात रस्त्यावरून प्रवास करताना येणारे अनुभव, निर्माण होणारी परिस्थिती यांचे बारकावे टिपले आहेत.

सिमॉन यांच्यासोबत कॉन्स्टन्झा कारबेरा, लुसिला पोडेस्ता यांनी या चित्रपटाचे सहलेखन केले आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते हे दोघेही अर्जेंटिनीयन असून सध्या ते पराग्वेमध्ये राहत आहेत. भारताला पहिल्यांदाच भेट देणाऱ्या या दोघांनी अतिशय उत्साहाने इफ्फीमधल्या अनुभवांची या वार्ताहर परिषदेत देवाणघेवाण केली. इफ्फीमध्ये सुवर्णमयूर पुरस्काराच्या स्पर्धेत इतर 14 चित्रपटांसोबत हा चित्रपट आहे.
* * *
Jaydevi PS/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1774085)
आगंतुक पटल : 349