माहिती आणि प्रसारण मंत्रालय
एखादी व्यक्ती आपल्या पित्याला निराश करू शकत नाही जे स्वतः एक दिग्गज होते- इफ्फी 52 दिग्दर्शक राजीव प्रकाश
वेद- द व्हिजनरी हा चित्रपट माझ्या वडीलांच्या कार्याविषयी आहे, ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडातील महत्त्वाच्या घटनांची नोंद केलीः इफ्फी52 च्या इंडियन पॅनोरमा नॉन फीचर ओपनिंग फिल्मचे दिग्दर्शक
पणजी, 21 नोव्हेंबर 2021
ज्यांनी जानेवारी 1948 मध्ये महात्मा गांधीजींच्या अंत्ययात्रेचे वृत्तांकन केले त्या वेद प्रकाश यांना तुम्ही इफ्फीमध्ये भेटू शकता असे आम्ही म्हणालो तर तुम्ही विश्वास ठेवाल का? दुर्दैवाने ते आपल्यात नाहीत पण तरीही आपल्याला वेद- द व्हिजनरी या माहितीपटातून त्यांची भेट घडवून देत असल्याबद्दल त्यांचे पुत्र राजीव प्रकाश यांचे आभार मानावे लागतील. एक असा माहितीपट ज्यामधून आपल्याला 1939 ते 1975 या कालखंडातील न्यूज रील चित्रिकरणाच्या विश्वाचे प्रेरणादायी दर्शन घडते. हा माहितीपट इफ्फी52च्या इंडियन पॅनोरमामधील- नॉन फिचर फिल्म सेक्शन उद्घाटनाचा माहितीपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक असलेले वेद प्रकाश यांचे पुत्र राजीव प्रकाश आणि नात लुभानी प्रकाश यांनी वार्ताहर परिषदेला संबोधित केले.
त्यांनी या चित्रपटाची कल्पना कशी सुचली ते स्पष्ट केले. आपल्या वडिलांविषयी कोणीतरी काही तरी लिहिलेले त्यांच्या वाचनात आल्यामुळे या माहितीपटाचा जन्म झाला. राजीव प्रकाश म्हणाले," एक दिवस इंटरनेटवर सर्फिंग करत असताना मी माझ्या वडिलांविषयीचे काही तपशील पाहण्यासाठी त्यांचे नाव टाईप केले. त्यावेळी अचानक मला कोणीतरी माझ्या वडिलांविषयी लिहिले होते, मी वेद यांना भेटत असे.. माझे वडील 1975 मध्ये वारले आणि त्यावेळी मी शाळेत होतो. मी त्यांच्याच व्यवसायात आलो पण हा माहितीपट बनवण्याचा विचार कधीच आला नव्हता
आपल्या वडिलांकडून केल्या जाणाऱ्या वृत्तांकनाची खोली आणि वैशिष्ट्यांची माहिती राजीव प्रकाश यांनी इफ्फीमध्ये उपस्थित असलेल्या अभ्यागतांना दिली. ही फिल्म माझ्या वडिलांवर आहे. 1939 मध्ये त्यांच्या करियरला सुरुवात झाली आणि 1975 पर्यंत ती सुरु होती. इंग्लडच्या ब्रिटिश पॅरामाऊंट न्यूज मध्ये ते भारतीय प्रतिनिधी म्हणून काम करत असताना स्वातंत्र्यपूर्व काळातील आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातील अनेक महत्त्वाच्या घटनांचे वृत्तांकन त्यांनी केले. त्यांच्या उल्लेखनीय कामामध्ये जानेवारी 1948 मध्ये महात्मा गांधी यांच्या अंत्ययात्रेच्या वृत्तांकनाचा समावेश आहे. यासाठी त्यांना 1948 मध्ये ब्रिटिश अकॅडमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळालं होतं. तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर झालेल्या भारताच्या फाळणीनंतरच्या विदारक घटनांचा देखील त्यांनी आढावा मांडला होता.
आपल्या वडिलांनी केलेल्या या असामान्य कामाची जुनी चित्रिकरणे आणि बातम्या मिळवताना खूप कष्ट करावे लागल्याची माहिती प्रकाश यांनी दिली.
या ठिकाणी उपस्थित असलेल्यांनी कधी डोप शीट पाहिली असेल किंवा त्याविषयी ऐकलं असेल की नाही याची मला माहिती नाही. ही डोप शीट म्हणजे तुम्ही एखाद्या घटनेचे चित्रिकरण करता, तिचे वर्णन लिहिता आणि तुम्ही चित्रित केलेल्या दृश्यांची क्रमवारी लिहिता. ज्यावेळी मी सर्व 146 फूटेजेस पाहिली आणि त्याच्या क्रेडीटमध्ये वेद प्रकाश हे नाव होते त्यावेळी हे माझ्या वडिलांचेच आहे याविषयी माझी खात्री पटली. मात्र ही सामग्री अस्सल आहे की नाही याची पडताळणी करणे माझ्यासाठी आवश्यक होते. तुम्हाला माहीत आहेच की एखादी व्यक्ती आपल्या पित्याला निराश करू शकत नाही जे स्वतः एक दिग्गज होते.
यावेळी प्रकाश यांनी त्यांच्या वडिलांच्या सोबत काम करणाऱ्यांनी हा माहितीपट बनवण्यामध्ये त्यांची कशा प्रकारे मदत केली याची माहिती देखील दिली.
वडील ज्या वर्तुळात वावरायचे त्या वर्तुळातील व्यक्ती, त्यांचे सहकारी आणि मित्र हे सर्वच आता वृद्ध झाले असल्याने आणि त्यांंचा ठावठिकाणा मिळवणे सोपे नसल्याने त्यांना शोधण्यात कोणत्या अडचणी आल्या याविषयी राजीव प्रकाश यांनी माहिती दिली.
वेद प्रकाश यांनी नात आणि पटकथालेखक लुभानी प्रकाश यांनी आपण कधीही न पाहिलेल्या आजोबांवर माहितीपट बनवताना आलेल्या विविध अनुभवांची माहिती दिली. वेद प्रकाश यांची महती आपले वडील राजीव प्रकाश यांच्या डोळ्यातून समजत होती, अस त्यांनी सांगितले.
"माझी ही फिल्म मी सर्वात आधी इफ्फीमध्ये प्रदर्शित करत आहे, असे राजीव प्रकाश यांनी सांगितले
राजीव प्रकाश हे व्यवसायाने सिनेमॅटोग्राफर असून पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर जाण्याचा अनुभव किती कठीण होता याची माहिती त्यांनी या वार्ताहरपरिषदेत दिली.
* * *
Jaydevi PS/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1773945)
Visitor Counter : 276