माहिती आणि प्रसारण मंत्रालय

विविधांगी चित्रपट निर्मितीसाठी, चित्रपट निर्मात्यांमध्ये वैविध्य असणे आवश्यक : 52 व्या इफ्फीमध्ये ‘या वर्षाचे विशेष चित्रपट व्यक्तिमत्व’ पुरस्कार लाभलेल्या प्रसून जोशी यांनी मास्टरक्लास मध्ये मांडले मत


“मला जे आवडतं ते किंवा मग लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल ते यापैकी एक लिहिण्याचा पर्याय मला दिला, तर मी निश्चितच दुसरा पर्याय निवडेन”- प्रसून जोशी

सीबीएफसी आधीच अशा गृहीतकावर चालते की कोणत्याही चित्रपट निर्मात्याला त्याच्या चित्रपटातून कोणाच्याही भावना दुखवायच्या नसतात: अध्यक्ष प्रसून जोशी

Posted On: 21 NOV 2021 10:15PM by PIB Mumbai

पणजी, 21 नोव्‍हेंबर 2021 


‘आपल्याला काय आवडते ते करण्यापेक्षा इतरांना प्रेरणादायी ठरेल असे काहीतरी काम निवडा.’ असे मत सुप्रसिद्ध संगीतकार आणि सीबीएफसी म्हणजेच, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी व्यक्त केले. सिनेमाच्या माध्यमातून जगात परिवर्तन घडवण्याची आकांक्षा असलेल्या युवा चित्रपटनिर्मात्यांना त्यांनी हा संदेश दिला. 

“मला काय लिहायला आवडतं ते किंवा मग लोकांना काय प्रेरणा देऊ शकेल, यापैकी, एक लिहिण्याचा पर्याय मला दिला, तर मी निर्विवादपणे दुसऱ्या पर्यायाची निवड करेन. हा विचार, तुम्ही समाजकेंद्री आहात की आत्मकेंद्री ,हे सांगणारा आहे.” गोव्यात सुरु असलेल्या 52 व्या इफफीदरम्यान चित्रपटनिर्मिती विषयीच्या मास्टरक्लासमध्ये ते बोलत होते. मिश्र स्वरुपात सुरु असलेला हा महोत्सव 28 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे.

आपल्या चित्रपटनिर्मितीच्या शैलीबाबत बोलतांना जोशी म्हणाले की, हे प्रेक्षकांवर अवलंबून आहे, की ते या गोष्टी कोणत्या विचारातून बघतात, आपण आपल्या कलेशी प्रामाणिक राहणे पुरेसे आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून, “ भविष्यातील 75 सर्जनशील व्यक्तिमत्व” या स्पर्धेच्या माध्यमातून, या महोत्सवात, नवोदित कलाकारांना, देण्यात आलेल्या संधीचे प्रसून जोशी यांनी कौतूक केले.  या स्पर्धेसाठी असलेल्या ग्रँड ज्यूरीचे सदस्य या नात्याने, आपले मत व्यक्त करतांना जोशी म्हणाले, की चित्रपटात वैविध्य दिसण्यासाठी, चित्रपटनिर्मात्यांमध्ये विविधता असणे अत्यंत आवश्यक आहे.यासाठी, सर्वांनी आपल्या मातृभाषेव्यतिरिक्त आणखी एक प्रादेशिक भाषा शिकली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

या महोत्सवात प्रसून जोशी यांना ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी यांच्यासह,  यावर्षीचे भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व म्हणून, पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या काल झालेल्या उद्घाटन समारंभात, हेमामालिनी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, समारोप समारंभात, म्हणजे 28 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसून जोशी यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल.

चित्रपट क्षेत्रातील यश हे संधीच्या अनिश्चिततेच्या अधीन असते हा समज दूर करण्याची गरज असल्याचे जोशी यांनी सांगितले. “चित्रपट निर्मितीतील संधीचा  घटक कमी केला पाहिजे. जेव्हा आपण  डिफॉल्ट ऐवजी डिझाईननुसार चित्रपट बनवायला सुरुवात करू तेव्हा हे शक्य होईल . चित्रपट निर्मिती हा एक गंभीर व्यवसाय आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना व्यवसाय उपलब्ध करून देण्याची   क्षमता आहे, म्हणून आपण चित्रपट निर्मितीची  जुगार सारखी प्रतिमा खोडून   टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”

प्रसून जोशी यांनी चित्रपट निर्मितीच्या  व्यावहारिक आणि कलात्मक अशा दोन्ही बाबींवर समान लक्ष केंद्रित करण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए.आर. रहमान यांचे उदाहरण दिले. रहमान यांना संगीत उद्योगाच्या  कलेइतकेच तंत्रज्ञान देखील  अवगत आहे.

रूढी मोडणारे चित्रपट लोकप्रिय होण्याच्या कलाबाबत   जोशी म्हणाले की, समाजातील सकारात्मक बाबीही  समोर आणणे आवश्यक आहे. "परंपरा आणि श्रद्धा साकारण्यात  सौंदर्य आहे, त्याचबरोबर समाजातील सकारात्मक गोष्टी देखील दाखवणे आवश्यक आहे." त्यांनी आईचे उदाहरण दिले जी आपल्या मुलांना  कोणत्याही आजाराचा सामना करावा लागू नये म्हणून आपल्या अनेक आवडी  आणि इच्छांचा त्याग करते. . "प्रचलित विश्वासाला  आव्हान देणारेच चित्रपट यशस्वी होतात, असे म्हणणे म्हणजे अतिशयोक्ती आहे ."

शब्दांच्या सामर्थ्याविषयी बोलताना .जोशी म्हणाले की, शब्द संस्कृतीला सामावून घेतात.  तत्त्वज्ञानासाठी दर्शन हा शब्द वापरला जातो,  तो पूर्णपणे बरोबर नाही कारण त्यात प्रत्यक्ष सत्याचा समावेश असतो , जो तत्त्वज्ञानातून हरवू शकतो.

सीबीएफसीच्या दृष्टिकोनाविषयी बोलताना ते म्हणाले की, चर्चा करून वाद सोडवण्यावर सेन्सॉर बोर्डाचा विश्वास आहे. “कोणत्याही खर्‍या चित्रपट निर्मात्याला त्याच्या चित्रपटांमुळे  कोणाचेही मन दुखावले जावे असे वाटत नाही, या गृहितकाने आम्ही सुरुवात करतो. आम्ही टीका न करण्याचा  प्रयत्न करतो, आमचा विश्वास आहे की चित्रपट प्रमाणित करणारे देखील चित्रपटाचे सह-निर्माते आहेत कारण ते समाजाचा आवाज मांडण्याचा  प्रयत्न करत आहेत.”

75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरोच्या विजेत्यांपैकी एक, महाराष्ट्राच्या अजय कंटुले  याच्या प्रश्नाला उत्तर देताना, जोशी  म्हणाले की जेव्हा तुम्ही तुमच्या मुळांशी जोडलेले असता तेव्हा तुम्ही आध्यात्मिक आणि व्यावसायिक गरजांमध्ये समतोल  राखू शकता.


* * *

Jaydevi PS/S.Kane/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1773837) Visitor Counter : 249


Read this release in: English , Urdu , Hindi