संरक्षण मंत्रालय

भारतीय नौदलाच्या जहाजांसाठी डीआरडीओने विकसित केलेल्या ‘शक्ती’ या संरक्षक इलेक्ट्रॉनिक युद्ध कवचाचे पंतप्रधानाच्या हस्ते नौदल प्रमुखांकडे होणार औपचारिक हस्तांतरण

Posted On: 18 NOV 2021 9:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, झांसी इथे ‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्व’कार्यक्रमाचा भाग म्हणून उद्या म्हणजेच, 19 नोव्हेंबर 2021रोजी  होणाऱ्या समारंभात नौदलाच्या जहाजांना संरक्षक कवच पुरवणाऱ्या प्रगत इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली ई डब्ल्यू (EW) ‘शक्ती’ ही प्रणाली औपचारिकरित्या भारतीय नौदलाकडे सुपूर्द केली जाईल.

प्रगत इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली ई डब्ल्यू (EW) ‘शक्ती’ चे डिझाईन, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) च्या  हैद्राबाद येथील संरक्षण इलेक्ट्रॉनिक संशोधन प्रयोगशाळेत बनले असून तेथेच ते विकसित करण्यात आले आहे. भारतीय नौदलाच्या प्रमुख युद्धनौकांवरुन शत्रूच्या पारंपरिक आणि आधुनिक रडारच्या कामात व्यत्यय आणणे, ते शोधून काढणे, त्यांचे वर्गीकरण करणे, ओळख पटविणे आणि ते निकामी करणे यासाठी ही प्रणाली उपयोगात आणली जाईल. सागरी युद्धात, शक्ती ई डब्ल्यू (EW) प्रणाली आधुनिक रडार आणि नौका विरोधी क्षेपणास्त्रे यापासून इलेक्ट्रॉनिक कवच देऊन वर्चस्व आणि टेहळणीची क्षमता देईल. भारतीय नौदलाच्या जुन्या इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालीची जागा , ही नवी प्रणाली घेईल.

भारतीय नौदलाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यापासून संरक्षण देणाऱ्या इलेक्ट्रॉनिक सपोर्ट मेजर्स आणि इलेक्ट्रॉनिक काउंटर मेजर्स प्रणालीशी या प्रणालीचे एकात्मिकरण करण्यात आले आहे. या प्रणालीचे ईएसएम आधुनिक रडारची दिशा बिनचूक शोधून त्यात व्यत्यय आणण्यास मदत करते. मोहिमा पार पडल्यानंतर विश्लेषण करण्यासाठी या प्रणालीत अंगभूत रडार फिंगरप्रिंटींग आणि माहिती नोंदणी करण्याची सोय आहे.

पहिली शक्ती प्रणाली आयएनएस विशाखापट्टणम या जहाजावर बसविण्यात आली आहे आणि पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्ध नौका आयएनएस विक्रांतवर बसविण्यात येत आहे. एकूण 1805 कोटी रुपये खर्चून, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे बारा शक्ती प्रणाली बनविल्या जात आहेत. यात पन्नासपेक्षा जास्त सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचा सहभाग आहे. ही प्रणाली सध्या तयार होत असलेल्या, P-15B, P-17A आणि तलवार श्रेणीच्या लढाऊ युद्ध नौकांसह, मुख्य युद्ध नौकांवर बसवली जाणार आहे.

शक्ति ई डब्ल्यू (EW) प्रणाली यशस्वीपणे विकसित केल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी  डीआरडीओ, भारतीय नौदल आणि उद्योजकांचे अभिनंदन केले आहे. या प्रणालीमुळे भारतीय नौदलाची क्षमता वाढणार असल्याचे सांगत अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या प्रवासातला हा मैलाचा दगड असल्याचे सांगितले.

डीडीआरडी चे सचिव आणि डीआरडीओ अध्यक्ष डॉ. जी  सतीश रेड्डी यांनी या प्रणालीच्या विकसनाशी संबंधित सर्व चमूचे अभिनंदन केले आहे. नौदलाच्या इलेक्ट्रॉनिक गुप्तचर क्षमतेत यामुळे अधिक वाढ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

 

 

S.Patil/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1773088) Visitor Counter : 366


Read this release in: English , Hindi , Punjabi