संरक्षण मंत्रालय
पूर्वतयारी सोहळा
विशाखापट्टणम आणि वेलाचा नौदलात समावेश
प्रविष्टि तिथि:
16 NOV 2021 10:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2021
विशाखापट्टणम या पहिल्या स्टेल्थ गायडेड मिसाईल विनाशिकेचा या महिन्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत 21 नोव्हेंबर 21 रोजी नौदलाच्या ताफ्यात समावेश होणार असल्याने भारतीय नौदलासाठी नोव्हेंबर महिना अतिशय महत्त्वाचा महिना ठरणार आहे. त्याचबरोबर प्रोजेक्ट-75 मधील वेला या चौथ्या पाणबुडीचा 25 नोव्हेंबर 21 रोजी नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात येणार आहे. नौदलप्रमुख या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यानंतर टेहळणी नौकांच्या विशाल प्रकल्पातील पहिल्या जहाजाचे जलावतरण करण्यात येणार आहे. संधायक या जहाजाचे डिसेंबरच्या पूर्वार्धात जलावतरण होणार आहे.
विशाखापट्टणम या विनाशिकेची बांधणी स्वदेशी बनावटीच्या डीएमआर249 ए स्टीलचा वापर करून केली आहे आणि भारतात बांधण्यात आलेली ती सर्वात मोठी विनाशिका आहे. सात हजार चारशे टनांच्या या विनाशिकेची लांबी 163 मीटर आहे. या विनाशिकेच्या बांधणीत स्वदेशी बनावटीच्या सुमारे 75% सामग्रीचा समावेश असल्याने आत्मनिर्भर भारतमध्ये तिचे मोलाचे योगदान आहे. अनेक प्रकारची शस्त्रास्त्रे आणि सेन्सर्सनी ही विनाशिका सुसज्ज आहे. पृष्ठभागावरून पृष्ठभागावर आणि पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, मध्यम आणि लघु पल्ल्याच्या तोफा, पाणबुडीविरोधी रॉकेट्स, अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्र प्रणालीचा यात समावेश आहे. अतिशय ताकदवान कंबाईन्ड गॅस आणि गॅस प्रॉपल्शन प्रणालीवर पाणी कापत वेगाने जाणारी ही विनाशिका 30 नॉट मैलापेक्षा जास्त वेगाने प्रवास करू शकते. आपली मारक क्षमता आणखी वाढवण्यासाठी या विनाशिकेवर दोन एकात्मिक हेलिकॉप्टर्सही तैनात करता येतात. अतिशय उच्च दर्जाची स्वयंचलित यंत्रणा आणि अत्याधुनिक डिजिटल नेटवर्क, कॉम्बॅट मॅनेजमेंट प्रणाली आणि इंटेग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट प्रणालीचा वापर या विनाशिकेत करण्यात आला आहे.
प्रोजेक्ट-75 अंतर्गत सहा पाणबुड्यांची बांधणी करण्यात येत आहे. नौदलाच्या ताफ्यात वेलाच्या समावेशामुळे या प्रकल्पातील निम्मा टप्पा पूर्ण होणार आहे. या पाणबुड्यांची बांधणी मुंबईतल्या माझगाव डॉक लिमिटेड(एमडीएल) येथे करण्यात येत आहे आणि फ्रेंच बनावटीच्या स्कॉर्पिन श्रेणीतील पाणबुड्यांच्या धर्तीवर त्या बांधण्यात येत आहेत. ही पाणबुडी वेस्टर्न नेव्हल कमांडच्या पाणबुड्यांच्या ताफ्यात समाविष्ट केली जाणार आहे. वेला ही चौथी पाणबुडी असून या पाणबुडीच्या बहुतेक सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत आणि लढाईसाठी ती सज्ज आहे आणि कोणत्याही मोहिमेमध्ये ती सहभागी होऊ शकते.
संधायक हे चार टेहळणी जहाज( महाकाय)(एसव्हीएल) प्रकल्पामधील पहिले जहाज असून भारतीय नौदलाच्या कोलकाता येथील गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स(जीआरएसई) कडून त्यांची बांधणी करण्यात येत आहे. महाकाय टेहळणी जहाजे नव्या प्रकारच्या हायड्रोग्राफिक यंत्रणेने सुसज्ज असल्याने हिंदी महासागर क्षेत्रातील महासागरी आणि जमिनीवरील भौतिक माहितीचे संकलन करण्याची त्याच्यात क्षमता आहे. सध्याच्या संधायक श्रेणीतील टेहळणी जहाजांच्या जागी या जहाजांचा समावेश करण्यात येणार आहे.
या जहाजांचा ताफ्यातील समावेश आणि जलावतरणाची पूर्वतयारी म्हणून 16 नोव्हेंबर 2021 रोजी नौदलाचे वाईस चीफ(व्हीएसएनएस) वाईस ऍडमिरल एस एन घोरमाडे यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून केवळ भारतीय नौदलाच्याच नव्हे तर ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ ची राष्ट्रीय उद्दिष्ट पूर्ण करण्यामध्ये माझगाव डॉक लिमिटेड, ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स(ओईएम) आणि एमएसएमईंच्या सामर्थ्याचे आणि क्षमतेचे दर्शन घडत आहे, असे ते यावेळी म्हणाले.



Jaydevi PS/S.Patil/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1772434)
आगंतुक पटल : 326