माहिती आणि प्रसारण मंत्रालय
रुपेरी पडद्यावरील पहिले जेम्स बाँड सर शॉन कॉनरी यांना इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष आदरांजली
Posted On:
16 NOV 2021 8:30PM by PIB Mumbai
मुंबई, 16 नोव्हेंबर 2021
रुपेरी पडद्यावर सर्वात लोकप्रिय ठरलेल्या काल्पनिक ब्रिटीश गुप्तहेराची अर्थात जेम्स बाँडची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या सर शॉन कॉनरी यांना इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव विशेष आदरांजली अर्पण करत आहे. 20 ते 28 नोव्हेंबर 2021 या कालावधीत संमिश्र पद्धतीने 52 व्या इफ्फी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात चित्रपट रसिकांना मोठ्या पडद्यावर शॉन कॉनरी यांच्या जादुई क्रियाकलापांचा करिष्मा पाहण्याची संधी मिळणार आहे.
जेम्स बाँडची काल्पनिक व्यक्तिरेखा साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या स्कॉटीश अभिनेत्याचे गेल्या वर्षीच्या अखेरीस झोपेतच निधन झाले. त्यांना विशेष आदरांजली वाहण्यासाठी या वर्षीच्या इफ्फी सोहोळ्यात निवडण्यात आलेल्या चित्रपटांची नावे पुढीलप्रमाणे आहेत – फ्रॉम रशिया विथ लव्ह (1963), गोल्डफिंगर(1964), यू ओन्ली लिव्ह ट्वाइस (1967), द हंट फॉर रेड ऑक्टोबर (1990) आणि सर शॉन कॉनरी यांना 1988 सालचे ऑस्कर मिळवून देणारा चित्रपट द अनटचेबल्स (1987).
सर शॉन कॉनरी यांना मूळ जेम्स बाँड म्हणून ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या एका प्रसिध्द चित्रपटात उच्चारलेली ‘द नेम इज बाँड.....जेम्स बाँड’ ही ओळ सार्वकालिक स्तरावर प्रसिद्धी पावलेली ओळ ठरली आहे. त्यांच्या सात दशकांच्या चित्रपट कारकीर्दीत त्यांनी हेरगिरीपटांमध्ये सात वेळा जेम्स बाँडची व्यक्तिरेखा साकारली.
इयान फ्लेमिंग यांच्या बाँडपटांमध्ये त्यांनी सशक्तपणे साकारलेल्या गुप्तहेर 007 या भूमिकेने त्यांना हॉलीवुडमधील सर्वात आत्मविश्वासपूर्ण अभिनेत्यांमध्ये स्थान पक्के करून दिले. डॉ.नो(1962), गोल्डफिंगर(1964), फ्रॉम रशिया विथ लव्ह (1963), थंडरबॉल(1965), यू ओन्ली लिव्ह ट्वाइस (1967) आणि डायमंडस आर फॉरेव्हर (1971) तसेच नेव्हर से नेव्हर अगेन (1983) हे त्यांचे चित्रपट अजूनही रसिकांच्या मनावर गारुड करून आहेत.
सर शॉन कॉनरी यांना इफ्फीतर्फे आदरांजली म्हणून सादर करण्यात येणाऱ्या चित्रपटांचा सारांश-
1. फ्रॉम रशिया विथ लव्ह – युनायटेड किंगडम । 1963 । इंग्रजी । 115 मिनिटे । रंगीत
दिग्दर्शक: टेरेन्स यंग
जेम्स बाँडपटांच्या मालिकेच्या दुसऱ्या भागात गुप्तहेर 007 परत आला आहे आणि यावेळी तो स्पेक्टर या गुप्त गुन्हेगारी संघटनेशी भिडला आहे. बाँडला भुलवून लेक्टोर नावाचे डीकोडींग साधन त्याच्याकडून काढून घेण्याकामी टॅटीयाना ही मोहक सुंदरी रोज क्लेब आणि क्रोनस्टीन या रशियन गुन्हेगारांना मदत करत आहे. टॅटीयानाला भेटण्यासाठी बाँड इस्तंबूलला जातो आणि तिथे शत्रूशी झालेल्या अनेक जीवघेण्या चकमकींच्या मालिकांतून त्यांच्या बुद्धीचातुर्याच्या जोरावर कसा जिवंत बाहेर पडतो हे या चित्रपटात पाहणे उत्कंठावर्धक आहे.
2. गोल्डफिंगर - युनायटेड किंगडम, अमेरिका । 1964। इंग्रजी ।110 मिनिटे। रंगीत
दिग्दर्शक: गाय हॅमिल्टन
विशेष गुप्तहेर 007 याचा सर्वात अत्याधिक उपद्रवी खलनायकाशी आमना-सामना होतो आणि आता शक्तिशाली भांडवलदाराला फोर्ट नॉक्स वर हल्ला करण्याची दुष्ट योजना अमलात आणण्यापासून रोखण्यासाठी आणि जगाची अर्थव्यवस्था उखडून टाकण्यासाठी तो करत असलेल्या कारवायांवर स्वतःच्या बुद्धिमत्तेने आणि उपलब्ध साधनांच्या सहाय्याने हा आपला नायक कसा शिरजोर ठरतो हे समजण्यासाठी रसिकांनी हा चित्रपट पाहणे रंजक ठरेल.
3. यू ओन्ली लिव्ह ट्वाईस – युनायटेड किंग्डम, जपान | 1967 | इंग्रजी | 117 min. | रंगीत
दिग्दर्शक: लुईस गिल्बर्ट
शीतयुद्धाच्या काळात अमेरिकन आणि रशियन अंतराळयाने बेपत्ता होतात, त्याबद्दल या दोन महासत्ता एकमेकांवर दोषारोप करू लागतात. त्यामुळे जग अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर असताना या अंतराळयानांपैकी एक जपानच्या समुद्रात उतरल्याची माहिती ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेला मिळते. यावेळी त्याच्या मृत्यूची अफवा पसरवून, जेम्स बॉण्डला(कॉनरी) शोध घेण्यासाठी जपानला पाठवले जाते. त्याच्या मदतीला टायगर तनाका आणि अकी असतात जे जागतिक कट उघडकीला आणण्यात त्याची मदत करतात.
4. द अनटचेबल्स-युनायटेड स्टेट्स | 1987 | इंग्रजी | 119 मिनिटे. | रंगीत
दिग्दर्शक: ब्रायन डे पल्मा
प्रतिबंध असूनही अल कापोन नावाचा गुंडांचा म्होरक्या अमेरिकेत अवैध मद्याचा व्यापार चालवत असतो. कापोनचा अवैध उद्योग उद्ध्वस्त करण्याची आणि त्याला कायद्याच्या चौकटीत अडकवण्याची कामगिरी एलियट नेस या फेडरल एजंटवर सोपवली जाते.
5. द हंट फॉर रेड ऑक्टोबर - युनायटेड स्टेट्स | 1990 | इंग्रजी | 135 मिनिटे. | रंगीत
दिग्दर्शक: जॉन मॅकटायमन
नव्या तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेली अतिशय ताकदवान सोविएत अणुपाणबुडी, द रेड ऑक्टोबर कॅप्टन मार्को रॅमिअसच्या (कॉनरी) नेतृत्वाखाली अमेरिकेच्या किनारपट्टीच्या दिशेने निघालेली असते. रॅमिअस हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची अमेरिकन सरकारची समजूत होते. सीआयए ऍनालिस्ट(बाल्डविन) यांना रॅमिअस उलटण्याच्या तयारीत असल्याचे वाटते, मात्र त्याच्याकडे ते सिद्ध करण्यासाठी काही तासच असतात- कारण संपूर्ण रशियन नौदल आणि हवाई दल देखील त्याचा शोघ घेत असते!
सर शॉन कॉनरी
शॉन कॉनरी यांनी त्यांच्या रंगभूमीवरील कारकिर्दीची सुरुवात समूहातील एक्स्ट्रा म्हणून केली, लहान भूमिका साकारल्या, मॉडेलिंग केले. त्यांनी शरीरसौष्ठव क्षेत्रात काही काळ घालवला, ज्याचा परिणाम म्हणून 1950 मध्ये त्यांनी मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत भाग घेतला आणि तिसरे स्थान पटकावले. त्यानंतर तब्बल आठ वर्षांनी त्यांना लाना टर्नर यांच्यासमोर अनदर टाईम अनदर प्लेस(1958) या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यानंतर आणखी चार वर्षांनी त्यांनी ‘बॉण्ड, जेम्स बॉण्ड’ अजरामर केला.
मर्डर इन ओरिएंट एक्स्प्रेस( 1974); द मॅन व्हू वुड बी किंग(1975); आऊटलँड(1981) ; 1993 चा रायझिंग सन, ड्रॅगनहार्ट(1996) ; आणि द रॉक(1996) या चित्रपटातील त्यांच्या इतर भूमिकाही लोकप्रिय ठरल्या. 1999 मध्ये कॉनरी यांनी एन्ट्रॅपमेंट या चित्रपटाची निर्मिती केली आणि भूमिका साकारली. 2000 या वर्षात त्यांच्या संस्मरणीय चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे फाइंडिंग फॉरेस्टर प्रदर्शित झाला
Jaydevi PS /S.Chitnis/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1772401)
Visitor Counter : 281