रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
भविष्यकाळ हा ज्ञानाचे संपत्तीत रुपांतर करण्याचा आहे - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
Posted On:
25 OCT 2021 10:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2021
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की भविष्यात ज्ञानाचे संपत्तीमध्ये रुपांतर करणे हेच महत्त्वाचे असेल. कन्सल्ट नामक ज्ञानवर्धक ॲप आणि मंचाची सुरुवात करण्याच्या कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी अभिनव संशोधन, उद्योजकता, विज्ञान तंत्रज्ञान, संशोधन आणि माहितीच्या रुपांतरणाचे कौशल्य यांचे महत्त्व विषद केले. ते म्हणाले की ज्ञानामुळे जग बदलत आहे आणि प्रशासन तसेच व्यापारी संघटनांमध्ये सहकार्य, समन्वय आणि संपर्क असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या भाषणात मानवी नातेसंबंधांचे महत्त्व देखील आवर्जून सांगितले आणि ते पुढे म्हणाले या जगात कुणीही परिपूर्ण नसतो आणि प्रत्येकाने सल्ला घेतला पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि इतरांच्या अनुभवांपासून नव्या गोष्टी शिकल्या पाहिजेत.
कन्सल्ट ॲप ही अशी पहिली जागतिक सुविधा आहे जिचा उपयोग करून माहिती, उपदेश, सल्ला तसेच मार्गदर्शन हवे असणाऱ्या लोकांना विविध क्षेत्रातील तज्ञांशी संपर्क साधता येईल आणि तत्क्षणी फोन करून प्रत्यक्ष बोलत देखील येईल. या अॅपच्या माध्यमातून उपलब्ध असणाऱ्या प्रत्येक तज्ञाला एन विशिष्ट, विविक्षित पान वितरीत केले जाईल ज्यावर त्या तज्ञाचे कार्य, लेखांच्या तसेच व्हिडिओ ब्लॉगच्या माध्यमातून सादर केलेले असेल. यातून त्यांची बौद्धिक संपदा प्रदर्शित होईल आणि अॅप वापरणाऱ्यांना त्यांच्यात रुची निर्माण होऊन त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल. कन्सल्ट ॲप ज्ञानविषयक संदर्भ आणि माहितीचे एककेंद्रीकरण यांच्या चौकटीचा वापर करून ज्ञान मागणारे आणि ज्ञान देणारे यांच्यात त्वरित संपर्क प्रस्थापित करून देते.
नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्र आणि माजी सचिव राघव चंद्र हे देखील या प्रसंगी उपस्थित होते.
M.Chopade/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1766440)
Visitor Counter : 240