गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीर दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी आज श्रीनगर इथे विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले
Posted On:
25 OCT 2021 8:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2021
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीर दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी आज श्रीनगर इथे विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले.यावेळी जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सुफी विचार, मध्य आशिया आणि इराणमधून काश्मीरच्या मार्गाने भारतात आला आणि काश्मीरने संपूर्ण भारताला सुफी विचारांची ठेव दिली. सुफी संतांची आपण भेट घेऊन आलो असून जम्मू-काश्मीर मध्ये चिरंतन शांतता नांदेल असा विश्वास निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
देशात विकासाचे जे वातावरण आहे. जम्मू-काश्मीरचा त्यापेक्षा जास्त विकास व्हावा यासाठी आज अनेक योजनांची घोषणा आम्ही करणार आहोत. श्रीनगरमध्ये 115 कोटी रुपये खर्चाच्या 500 खाटांच्या रुग्णालयाचे काम पूर्ण झाले असून आज हंदवाडा वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजनही होत आहे. गेल्या वर्षी 2,000 कोटी रुपये खर्चून रस्ते बांधण्यात आले आणि या वेळी 4,000 कोटी रुपयांचे रस्ते बांधकाम आजपासून सुरु करण्यात येत आहे. क्रिकेट, फुटबॉल आणि बास्केटबॉलचा फिरता करंडक सुरु केल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी 15 कोटी रुपये नायब राज्यपालांनी दिल्याची माहिती त्यांनी दिली. भारताच्या क्रिकेट संघात काश्मीरमधला युवक का नाही अशी विचारणा त्यांनी काश्मीरच्या युवकांना केली. काश्मीरच्या युवकांमध्ये प्रचंड क्षमता आहे, हा करंडक काश्मीरच्या युवकांना या खेळांशी जोडण्याचे काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आज एक मोठा कार्यक्रम सुरु होत असून त्या अंतर्गत मंदिरे, गुरुद्वारा, इस्लामी धार्मिक स्थळांसह 75 सुफी धार्मिक स्थळांची सरकारी खर्चाने सुधारणा करून गंगा-जमुनी मिलाफाची इथे पुन्हा एकदा सुरवात केली जात असल्याचे गृह मंत्र्यांनी सांगितले. 70 वर्षात तीन घराण्याच्या शासन काळात एकूण 12 ते 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीर साठी नवे औद्योगिक धोरण आणले, या धोरणाअंतर्गत संपूर्ण देशात सर्वात जास्त कर सवलत देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या धोरणाला 6 महिने झाले असून गुंतवणुकीने 12,000 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. 2022 च्या सुरवातीपर्यंत जम्मू काश्मीर मध्ये 50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक येईल आणि यातून 5 लाख युवकांना रोजगार प्राप्त होईल असे त्यांनी सांगितले.
M.Chopade/N.Chitale/P.Malandkar
(Release ID: 1766410)
Visitor Counter : 223