अल्पसंख्यांक मंत्रालय
हज यात्रेकरूंची निवड प्रक्रिया लसीच्या दोन्ही मात्रा घेऊन संपूर्ण लसीकरण झाल्यानुसार केली जाईल तसेच हज 2022 दरम्यान, कोरोना प्रतिबंधात्मक नियम लक्षात घेऊन भारत आणि सौदी अरेबिया सरकार मार्गदर्शक तत्त्वे आणि निकष निश्चित करतील - केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी
Posted On:
22 OCT 2021 5:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर 2021
हज यात्रेकरूंची निवड प्रक्रिया लसीच्या दोन्ही मात्रा घेऊन संपूर्ण लसीकरण झाल्यानुसार केली जाईल तसेच हज 2022 दरम्यान, कोरोना प्रतिबंधात्मक नियम लक्षात घेऊन भारत आणि सौदी अरेबिया सरकार मार्गदर्शक तत्त्वे आणि निकष निश्चित करतील असे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले.
आज नवी दिल्ली येथे हज आढावा बैठकीचे अध्यक्षपद भूषवताना नक्वी म्हणाले की, मक्का-मदिनामधील निवास/वाहतुकीसंबंधी सर्व माहिती उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल आरोग्य पत्र, "ई-मसीहा" आरोग्य सुविधा आणि "ई-लगेज प्री-टॅगिंग", सर्व हज यात्रेकरूंना प्रदान केले जाईल.
सौदी अरेबिया सरकार आणि भारत सरकारचे आरोग्य आणि कोरोना प्रतिबंधात्मक नियम लक्षात घेऊन हज 2022 ची तयारी सुरू करण्यात आली आहे, असे नक्वी यांनी सांगितले. भारतात हज 2022 ची संपूर्ण प्रक्रिया 100 टक्के डिजिटल असेल. हज यात्रेसाठी सर्वाधिक हज यात्रेकरू पाठविण्यात इंडोनेशिया नंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.
महामारीच्या आव्हानाच्या सर्व बाबी लक्षात घेऊन, अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, भारतीय हज समिती, सौदी अरेबियामधील भारतीय दूतावास आणि जेद्दा येथील भारतीय महावाणिज्यदूत आणि इतर संस्थांमध्ये विचारविनिमय झाल्यानंतर हज 2022 ची प्रक्रिया तयार केली जात आहे.
महामारीच्या पार्श्वभूमीवर हज 2022 साठी संपूर्ण प्रवास प्रक्रिया महत्त्वपूर्ण बदलांसह केली जात आहे, या प्रक्रियेमध्ये भारत आणि सौदी अरेबियामधील निवास, यात्रेकरूंच्या मुक्कामाचा कालावधी, वाहतूक, आरोग्य आणि इतर सुविधांचा समावेश आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
हज 2020 आणि 2021 साठी "मेहरम" (पुरुष साथीदार) व्यतिरिक्त श्रेणी अंतर्गत 3000 हून अधिक महिलांनी अर्ज केले, असेही नक्वी यांनी सांगितले. जर त्यांना हज 2022 साठी जायचे असेल तर त्यांचे अर्ज हज 2022 साठीही पात्र असतील. इतर महिला देखील "मेहरम" व्यतिरिक्त श्रेणी अंतर्गत हज 2022 साठी अर्ज करू शकतात. "मेहरम" व्यतिरिक्त श्रेणी अंतर्गत प्रवास करणाऱ्या सर्व महिलांना सोडत पद्धतीने सूट दिली जाईल.
S.Tupe/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1765767)
Visitor Counter : 244