दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
मुंबई टपाल विभागाकडून “तुमच्या पोस्टमनविषयी जाणून घ्या” या मोबाईल अॅपचा आरंभ
मुंबई शहर आणि उपनगरांतील 86,000 पेक्षा अधिक क्षेत्रांची माहिती अॅपवर उपलब्ध
Posted On:
16 OCT 2021 4:30PM by PIB Mumbai
मुंबई, 16 ऑक्टोबर 2021
मुंबई टपाल विभाग यांच्याकडून आज “तुमच्या पोस्टमनविषयी जाणून घ्या” (Know your Postman) या मोबाईल अॅपचा आरंभ करण्यात आला. पोस्टमास्तर जनरल श्रीमती स्वाती पांडे यांची याप्रसंगी उपस्थिती होती. त्यांच्याच संकल्पनेतून या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.
मुंबई टपाल विभागाने तयार केलेल्या या अनोख्या अॅपच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या क्षेत्रातील पोस्टमनविषयी तपशील उपलब्ध होणार आहे. क्षेत्राचे नाव, टपाल कार्यालयाचे नाव आणि पिनकोडच्या माध्यमातून मुंबई शहर आणि उपनगरांतील 86,000 पेक्षा अधिक क्षेत्रांची माहिती या अॅपवर उपलब्ध आहे. मोबाईल अॅप https://cutt.ly/kypmr या लिंकच्या माध्यमातून गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करता येईल. जर एखादा पत्ता यावर उपलब्ध झाला नाही तर तो पत्ता तात्काळ टपाल खात्याला कळवून 24 तासाच्या आत अद्ययावत केला जाईल.
मुंबई शहरात 89 टपाल कार्यालये आहेत, ज्यात 2000 पोस्टमन (महिला आणि पुरुष) यांच्याकडे मोबाईल उपलब्ध आहे. मुंबई शहरात दररोज सुमारे 2 ते 2.5 लाख टपाल साहित्य ज्यात स्पीड पोस्ट, रजिस्टर्ड पोस्ट, आधार कार्ड, पासपोर्टचे वितरण केले जाते.
टपाल खात्याच्या डिजीटलीकरणाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत मुंबई टपाल विभागाने “तुमच्या पोस्टमनविषयी जाणून घ्या” ही सुविधा सुरु केली आहे. यात पोस्टमन तपशील, संपर्क क्रमांक, संबंधित टपाल कार्यालयाचा तपशील आणि संपर्क क्रमांक व पत्ता उपलब्ध आहे. यामुळे नागरिकांना टपाल व्यवहार करणे सुलभ होणार आहे. पोस्टमनशी संपर्क साधून आपल्या उपलब्धतेनूसार त्यांना टपालसाहित्य घेता येईल. नागरिक केंद्री दृष्टीकोनातून हाताळण्यासाठी अतिशय सुलभ अॅप निर्माण करण्यात आला आहे, असे पोस्ट मास्तर जनरल स्वाती पांडे म्हणाल्या.
टपाल खात्याकडून गेल्या तीन महिन्यांपासून पोस्टमनना नियमितपणे कौशल्य आणि संवाद प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती स्वाती पांडे यांनी याप्रसंगी दिली.
***
S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1764366)
Visitor Counter : 427