दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
डोंबिवली येथे टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्राची सुरुवात
केंद्रीय दळणवळण राज्यमंत्र्यांच्या हस्ते देशातील 428 व्या टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्राच्या डोंबिवलीतील कार्यालयाचे आभासी पद्धतीने उद्घाटन
Posted On:
12 OCT 2021 7:45PM by PIB Mumbai
मुंबई, 12 ऑक्टोबर 2021
केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांच्या हस्ते आज ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील औद्योगिक विभागातल्या टपाल कार्यालयात नव्या टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्राचे आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री चौहान म्हणाले की डोंबिवलीत सुरु होत असलेले हे देशातील 428 वे टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्र आहे. देशभरात प्रचंड प्रमाणात पसरलेल्या टपाल कार्यालयांच्या जाळ्याचा वापर करून दिल्या जात असलेल्या या सेवेची लोकप्रियता आणि महत्त्व याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. ते पुढे म्हणाले की गेल्या 6 महिन्यांच्या कालावधीत टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्राच्या माध्यमातून सुमारे सहा लाख पारपत्रे वितरीत करण्यात आली आहेत. याचाच अर्थ असा की या टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्रांतून दर दिवशी सुमारे तीन हजार पारपत्रांचे वितरण होत आहे. या यशस्वी कामगिरीसाठी राज्यमंत्र्यांनी टपाल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्ट्या नेतृत्वाखाली टपाल खात्याचे विश्वसनीय जाळे वापरून कोणकोणते काम होऊ शकते हे नागरिकांनी बघितले आहे. सरकारच्या नागरिक-केन्द्री दृष्टीकोनामुळे टपाल खात्याच्या जाळ्याचा योग्य वापर झाला आहे असे त्यांनी सांगितले.
डोंबिवलीतील या टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्राचा लाभ ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांतील रहिवाशांना होणार आहे असे महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे मुख्य पोस्ट मास्तर हरीश अगरवाल यांनी सांगितले. डोंबिवली येथील टपाल कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पारपत्र सेवा केंद्राशी संबंधित कामाचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे अशी माहिती त्यांनी दिली.
कल्याण लोकसभा मतदार संघातील खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे, मुंबई येथील प्रादेशिक पारपत्र कार्यालयाचे अधिकारी डॉ.राजेश गावंडे, नवी मुंबई विभागाचे मुख्य पोस्ट मास्तर गणेश सावळेश्वरकर, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील विशेष कर्तव्य अधिकारी ले.कर्नल अशोककुमार सिंग हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1763336)
Visitor Counter : 344