वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

मुंबईतील सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक्स एक्स्पोर्ट प्रोसेसिंग झोन अर्थात सिप्झ प्रकल्पाचा संपूर्ण कायापालट आवश्यक: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री


" सिप्झ मधून 30 अब्ज डॉलर निर्यात अपेक्षित": पियुष गोयल

Posted On: 23 SEP 2021 6:39PM by PIB Mumbai

मुंबई, 23  सप्टेंबर 2021

केंद्रीय वाणिज्य व उद्योग, मंत्री पियुष गोयल सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक्स एक्स्पोर्ट प्रोसेसिंग झोन(सीप्झ)मुंबई येथील निर्यातदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना गोयल यांनी सांताक्रुज इलेक्ट्रॉनिक निर्यात प्रोसेसिंग विभाग (सिप्झ) विशेष आर्थिक प्रदेश (सेझ) याच्या संपूर्ण परिसराचा कायापालट करण्याची गरज व्यक्त केली. 1973 मध्ये सुरु झालेल्या या प्रकल्पाच्या  पायाभूत सुविधा आणि जुन्या इमारतींची अवस्था पाहून मला दुःख होत आहे असे गोयल यावेळी  म्हणाले. गोयल यांनी सिप्झशी संलग्न उद्योग व व्यापार प्रतिनिधींशी संवाद साधला, यात देशाचे निर्यात उद्दिष्ट गाठण्यासंबधीत चर्चेवर भर देण्यात आला.

सिप्झ हे उद्योगाचे गतिशील ऊर्जा केंद्र बनू शकते. यासंदर्भात केंद्रीय मंत्री म्हणाले की नवी दिल्लीतील प्रगती मैदानाचा देखील 4000 कोटी रुपये खर्चून कायापालट करण्यात येत आहे. त्याधर्तीवर  आपण जागतिक चटई क्षेत्राची संकल्पना इथे, मुंबईत राबवू शकतो का? हा प्रश्न विचारून, वाणिज्य मंत्री म्हणाले की आयटीपीओअर्थात भारत व्यापार प्रोत्साहन संस्था  इथे सीप्झमध्ये 30,000 चौरस फुटांचे प्रदर्शन केंद्र उभारू शकते, आणि गरज भासली तर त्याचा खर्च तसेच व्यवस्थापन सीप्झ द्वारे केले जाईल. 

सीप्झ-सेझ मधून 30 अब्ज डॉलर्स ची निर्यात  अपेक्षित  आहे . केवळ 50,000 ते 60,000 लोकांना रोजगार देण्यापेक्षा 5 लाख लोकांना सामावून घेण्यासाठी आधुनिक यंत्रसामुग्री गुंतवणूक करण्याचे  नियोजन करा , असे सांगत गोयल  यांनी उद्योग क्षेत्राला अधिक महत्त्वाकांक्षी होण्याचा सल्ला दिला.

आपल्या मालमत्तांची डागडुजी करून त्या नव्या करणाऱ्या उद्योगांना त्या मालमत्तांवरील भाडे आकारणीत 10 वर्षाकरिता सूट देता येईलअशा प्रकारच्या सार्वजनिक खाजगी भागीदारीचा यासंदर्भात  विचार होऊ शकतो असे ते म्हणाले.

सीप्झ सेझच्या कायापालटाबाबत व्यावहारिक आणि कल्पक तोडग्यासह  सूचना करण्याचे गोयल यांनी आवाहन करताना यापैकी असलेल्या  व्यवहार्य प्रस्तावांना सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन गोयल यांनी दिले.

सीप्झ-सेझ मध्ये सरकारी विभागाकडून वापरण्यात येणाऱ्या एखाद्या भूभागाचा पुरेसा वापर होत नसल्याचे आढळल्यास ते  त्वरित निदर्शनाला आणून द्या असे त्यांनी सांगितले.

याबरोबरच सरकारी महसूल सुरक्षित राहील आणि औद्योगिक एककांना  सुलभ  निर्गमन करता येईल यासाठी यंत्रणा निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .यामुळे बाहेर पडण्याची इच्छा असणाऱ्यांची सोय होण्याबरोबर या हस्तांतर प्रक्रियेचा भाग म्हणून या क्षेत्रात केलेल्या गुंतवणुकीचे त्यांना  योग्य मूल्य मिळेल असे धोरण विचाराधीन  आहे, असे ते म्हणाले .

800 डॉलर्स पर्यंतच्या  कृत्रिम दागिन्यांची ई कॉमर्स मंचावर विनासायास विक्रीची परवानगीविषयी निर्यातदारांनी  उपस्थित केलेल्या अनेक मुद्यांचे निरसन उच्च अधिकारप्राप्त समित्यांकडून करण्यात येत आहे असे ते म्हणाले

रत्न आणि दागिने क्षेत्रास मार्च 2022 पर्यंत कार्यान्वित करण्यासाठी हंगामपूर्व कराराचा भाग म्हणून संयुक्त अरब अमिरातीमध्ये सध्या आकारत असलेल्या शुल्कात 5% सवलत मिळण्याची खात्री करण्यासाठी मी कठोर परिश्रम करत आहे असे गोयल यांनी सांगितले

जगभरातील खरेदीदार मिळवण्यासाठी आणि सीप्झ विशेष आर्थिक क्षेत्राचे परिवर्तन करण्यासाठी आपल्याकडे एक विलक्षण संधी आहे; वाढीव बदल न करता परिवर्तनशीलता निर्माण करण्यासाठी, विशेष आर्थिक क्षेत्राचा पूर्वीचा जोम आणि उत्साह परत मिळवण्यात मदत करण्यासाठी मी एक त्रैमासिक पुनरावलोकन करेन असे ते म्हणाले .

मी यूके, यूएई, ऑस्ट्रेलिया आणि युरोपियन महासंघाबरोबर अधिक मुक्त व्यापार करार करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि तुम्हाला अधिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे, आम्ही यूईए - सीआयएमसह सीप्झ येथील उद्योग एककांशी मुक्त व्यापार कराराबाबत आमच्या अनौपचारिक वाटाघाटी सुरू केल्या आहेत असे ते म्हणाले.

देशातील सर्व 739 जिल्हे वाणिज्य सप्ताह साजरा करत आहेत, जवळजवळ 250 इतर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ, वेगवान, अखंडित आणि आगामी वर्षांमध्ये आमच्या अर्थव्यवस्थेसाठी विकासाचे इंजिन बनण्यासाठी तुम्ही केलेल्या सहकार्याकरिता मी सर्व निर्यातदार आणि हितधारकांची प्रशंसा करतो असे गोयल यांनी सांगितले .

केंद्रीय मंत्री गोयल यांच्यासोबत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सहसचिव अमिताभ कुमार हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

JaydeviPS/SC/VJ/NC/VS/PM

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1757353) Visitor Counter : 581


Read this release in: English , Hindi