संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वर्णिम विजय वर्ष समारंभ : विजयी ज्योत येत्या एक सप्टेंबर रोजी मुंबईत पोचणार


विजयी ज्योत, 1971 च्या युद्धात सहभागी झालेल्या ज्येष्ठ सैनिकांच्या घरी जाणार

ही विजयी ज्योत, 9 सप्टेंबर पर्यंत मुंबईत राहणार असून त्यानंतर ती गोव्याला रवाना होणार

Posted On: 30 AUG 2021 4:57PM by PIB Mumbai

मुंबई, 30 ऑगस्‍ट 2021

 

‘स्वर्णिम विजय मशाल’ अशा नावाने ओळखली जाणारी ही विजयी ज्योत, भारताने 1971 च्या युद्धात पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेट वे ऑफ इंडिया इथे येत्या 1 सप्टेंबर रोजी या विजयी ज्योतीचे स्वागत करतील. 

भारताच्या इतिहासातील या महत्वाच्या विजयाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी, 1971 च्या युद्धाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त स्वर्णिम विजय वर्ष साजरे केले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 डिसेंबर 2020 रोजी, विजयी ज्योत प्रज्वलित करुन स्वर्णिम विजय वर्ष समारंभाची सुरुवात केली होती. वीर हुतात्मा सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकापासून ही विजयी ज्योत प्रज्वलित करण्यात आली होती. तेव्हापासून, अशा चार विजयी ज्योती देशाच्या विविध शहरे आणि गावात जात असून, यात, परमवीर चक्र विजेते, महावीर चक्र विजेत्या वीर जवानांच्या गावांचाही समावेश आहे. ही पवित्र विजयी ज्योत, देशाच्या चार दिशांना पाठवली जात आहे. त्यानंतर, डिसेंबर 2021 पर्यंत ती पुन्हा दिल्लीला परत जाणार आहे.

यातील पश्चिम दिशेला जाणारी ज्योत, येत्या एक सप्टेंबर 2021 रोजी मुंबईत गेटवे ऑफ इंडियाला येणार आहे. तिन्ही सैन्यदलातील अधिकारी आणि मान्यवर उच्चपदस्थ या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, 1971 च्या युद्धातील कामगिरीबद्दल, शौर्यचक्र पुरस्कार  मिळवणाऱ्या ज्येष्ठ सैनिकांचा सत्कारही केला जाईल.  

ही विजयी ज्योत 9 सप्टेंबर 2021 पर्यंत मुंबईत असेल त्यानंतर, ती गोव्यात पणजीकडे रवाना होईल. या काळात, लष्करी दलांकडून विविध सांस्कृतिक उपक्रम राबवले जातील. तसेच, ही विजयी ज्योत (मशाल) 1971 च्या युद्धात लढलेल्या सर्व ज्येष्ठ सैनिकांप्रती आदर  आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांच्या घरी नेली जाईल.

 

* * *

M.Chopade/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1750472) Visitor Counter : 224


Read this release in: English