संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत, आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट स्टेडियम चे नीरज चोप्रा यांच्या नावे नामकरण


दक्षिण कमांडच्या पुण्यातील मुख्यालयालाही संरक्षण मंत्र्यांची भेट

Posted On: 27 AUG 2021 10:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 ऑगस्‍ट 2021

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटला भेट दिली. त्यांच्यासोबत, लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे आणि दक्षिण कमांडचे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल जे एस नैन हे उपस्थित होते.

आपल्या पहिल्याच भेटीत संरक्षण मंत्र्यांनी तिन्ही सैन्य दलातील ऑलिंपिक पटूंचा सत्कार केला. उद्घाटन सोहळ्यात त्यांनी आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट येथील स्टेडियमचे “नीरज चोप्रा स्टेडियम” असे नामकरण केले त्यानंतर त्यांनी जवानांना  संबोधित केले आणि आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या उदयोन्मुख खेळाडूंशी संवाद साधला.

   

आपल्या ट्वीटमध्ये संरक्षण मंत्री म्हणाले, “टोक्यो ऑलिंपिकमध्ये नेत्रदीपक कामगिरीसाठी पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट येथे सुभेदार नीरज चोप्राचा सत्कार केला. ऑलिंपिकचे सुवर्ण पदक जिंकून त्याने देशाची मान अभिमानाने उंच केली आहे. आता एएसआयने स्टडियमला त्याचे नाव दिले आहे. त्याला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा.”

   

“टोक्यो ऑलिंपिकमध्ये भाग घेतलेल्या सैन्य दलातील सर्व खेळाडूंचा सत्कार करुन मला अतिशय आनंद होत आहे. त्यांच्या यशस्वी कारकीर्दीसाठी त्यांना माझ्या शुभेच्छा,” असे ते म्हणाले.

भविष्यात भारत क्रीडा क्षेत्रातील एक अग्रणी देश बनेल आणि आपण आपल्या देशात ऑलिंपिक स्पर्धा आयोजित करु, असा विश्वास, राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

भारतीय लष्कराचे ‘मिशन ऑलिंपिक अभियान 2001 साली सुरु करण्यात आले होते. ऑलिंपिक स्पर्धेत तसेच इतरही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकविजयी कामगिरी करण्याच्या दृष्टीने खेळाडूंना तयार करण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरु करण्यात आले आहे. भारतीय लष्कराचा संपूर्ण भर, अकरा क्रीडाशाखांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना खेळात प्रवीण करणे, यावर आहे. भारतीय लष्कराच्या ‘मिशन ऑलिंपिक’ चे नेतृत्व आर्मी स्पोर्ट्स इंस्टिट्यूट म्हणजेच लष्करी क्रीडा संस्था करत आहे.  

आर्मी स्पोर्ट्स इंस्टिट्यूटचा उद्देश, शाश्वत आणि सुव्यवस्थित कौशल्ये पारखून, त्यामधून जागतिक दर्जाचे खेळाडू तयार करणे, त्यासाठी त्यांना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक प्रशिक्षण आणि आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे हा आहे.

आर्मी स्पोर्ट्स इंस्टिट्यूटमध्ये खेळाडूंसाठी उत्तम प्रशिक्षण सुविधांच्या उभारणीबद्दल संरक्षण मंत्र्यांनी या संस्थेचे कौतूक केले.

या संस्थेला सर्व प्रकारचे आर्थिक आणि प्रशासकीय सहाय्य दिले जाईल, अशी ग्वाही श्री राजनाथ सिंह यांनी दिली. संरक्षण मंत्र्यांच्या या भेटीमुळे, आपल्या देशासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या  खेळाडूंचे मनोबल वाढले.

संरक्षण मंत्र्यांनी यावेळी पुण्यातील दक्षिण कमांडच्या मुख्यालयालाही भेट दिली. यावेळी आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल जे एस नैन यांनी दक्षिण कमांडच्या विविध कार्यवाहीबद्दल, तसेच प्रशिक्षण आणि प्रशासकीय विषयांची माहिती दिली. देशाचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याच्या कार्यात  दक्षिण कमांडचा व्यावसायिक दृष्टिकोन आणि कार्यान्वयनाच्या तत्परतेविषयी त्यांनी दक्षिण कमांडचे कौतूक केले. तसेच, भारतीय द्वीपकल्पात आपत्तिच्या काळात, मानवीय सहकार्याच्या कामांबद्दलही, विशेषत: अलीकडेच आलेल्या पूरस्थितीत आणि महामारीच्या काळात नागरी प्रशासनाला केलेल्या मदतीबद्दल, त्यांनी दक्षिण कमांडचे कौतूक केले. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत, संशोधन आणि विकास संस्थेसोबत दक्षिण कमांड करत असलेल्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतूक केले.


* * *

M.Iyengar/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1749737) Visitor Counter : 203


Read this release in: English , Urdu , Hindi