माहिती आणि प्रसारण मंत्रालय
“भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मुंबईचे योगदान’ या पत्र सूचना कार्यालय, मुंबईच्या वतीने आयोजित वेबिनार मध्ये वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिक रोहिणी गवाणकर यांनी व्यक्त केले मनोगत
ज्यावेळी मुंबईतील स्वातंत्र्यचळवळ नेतृत्वहीन झाली, त्यावेळी मुंबईतील विद्यार्थिनी आणि महिलांनी आंदोलन जिवंत ठेवले : रोहिणी गवाणकर
प्रविष्टि तिथि:
27 AUG 2021 6:10PM by PIB Mumbai
मुंबई, 27 ऑगस्ट 2021
“भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मुंबईतील अनेक शूर महिलांनी भाग घेतला होता. आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल त्यांना सश्रम करावासाची शिक्षा देखील भोगावी लागली होती. मुंबईतल्या पारसी महिला, मादाम कामा यांनी एकटीने जर्मनीत भारताचा पहिला राष्ट्रध्वज फडकवत संपूर्ण देशाला राष्ट्रध्वज फडकावण्याची प्रेरणा दिली होती. दादाभाई नौरोजी यांची नात पेरिन कॅप्टन आणि त्यांच्या दोन भगिनींनी मुंबईत दारोदारी जाऊन खादीचा प्रचार आणि विक्री केली होती आणि ब्रिटिश राजवटीला आव्हान दिले होते.” अशा प्रेरक आठवणींना वयोवृद्ध स्वातंत्र्यसेनानी रोहिणी गवाणकर यांनी उजाळा दिला. पीआयबी मुंबईने आयोजित केलेल्या, “देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मुंबईचे योगदान’ या विषयावरील वेबिनारमध्ये त्या बोलत होत्या.

स्वातंत्र्यलढ्यातील महिलांच्या योगदानाविषयी अधिक माहिती देतांना त्यांनी सांगितले की, ज्यावेळी स्वातंत्र्यलढ्याच्या शेवटच्या टप्प्यात, सर्व प्रमुख नेत्यांना अटक झाल्यावर आंदोलनाचे नेतृत्व करण्यास कोणीही उरले नव्हते, अशा वेळी, मुंबईतल्या विद्यार्थिनी आणि महिलांनी ही चळवळ जिवंत ठेवली. “मुंबईतल्या विद्यार्थिनी आणि महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वातंत्र्यलढ्याला बळ देणारे अनेक उपक्रम राबवले. इंदिरा गांधी यांची वानर सेना स्थापन होण्याच्याही आधी, उषाबेन मेहता यांनी मुंबईत मांजर सेना सुरु केली होती. या सेनेकडे ब्रिटिश पोलिस आणि सैन्याला त्रास देण्याची, त्यांना हैराण करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.” असे रोहिणीताई म्हणाल्या. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देखील, स्वातंत्र्यलढ्यात 1930 ते 1940 या दशकात, मुंबईतील महिलांनी दिलेल्या स्वातंत्र्यलढ्याचे खूप कौतूक केले होते आणि त्यांचे ही योगदान संपूर्ण देशाला प्रेरणादायी ठरेल, असे म्हटले होते, अशी आठवणही या वयोवृद्ध स्वातंत्र्यसेनानीनी सांगितली.
रोहिणी गवाणकर यांनी, स्वातंत्र्यलढ्यातल्या त्यांच्या योगदानाबद्दलही माहिती दिली. “माझ्या एक भावाला तुरुंगवायस आणि मृत्युदंडाची शिक्षा भोगावी लागली होती. दुसऱ्या भावाने पत्री (प्रति) सरकार आंदोलनात भाग घेतला होता. त्यावेळी मी 14 वर्षांची होते. मी सगळ्या लहान मुलांना गोळा करत असे आणि आम्ही सगळे उच्चरवात देशभक्तीची गीते गात असू. पत्री सरकारच्या आंदोलनात मी गुप्त निरोप पोचवण्याचेही काम केले होते.” असे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त, माहिती आणि प्रसारण मंत्रालय साजरा करत असलेल्या ‘आयकॉनिक विक’ चा भाग म्हणून पत्र सूचना कार्यालय आणि प्रादेशिक जनसंपर्क विभागातर्फे हे वेबिनार आयोजित करण्यात आले.

या वेबिनार मध्ये बोलतांना, इतिहासाच्या अभ्यासक आणि निवृत्त प्राध्यापक अनुराधा रानडे यांनी सांगितले की 1757 ते 1857 या शतकात ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरोधात, 300 पेक्षा अधिक छोटे मोठे उठाव या देशात करण्यात आले होते. या लढ्यातली मुंबईची भूमिका विशद करतांना त्यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसीएशन आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या योगदानाविषयी सांगितले. “ब्रिटिशांच्या विभाजनवादी आणि अन्याय्य धोरणांना प्रतिकार करण्यासाठी देशाच्या अनेक भागात, अनेक संघटना स्थापन झाल्या होत्या. त्यापैकी एक बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसीएशन, 1885 साली स्थापन करण्यात आली होती. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे मूळ नाव, भारतीय राष्ट्रीय संघटना असे होते, मात्र या संघटनेच्या मुंबईत 1885 साली झालेल्या अधिवेशात, तिचे नाव, इंडियन नेशनल कॉँग्रेस असे करण्यात आले. मुंबईतील तेजपाल सभागृहात हे अधिवेशन झाले होते. यात एकूण 72 जण सहभागी झाले होते, त्यातले 18 जण मुंबईतील होते. मुंबई भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा केंद्रबिंदु होते आणि दक्षिण मुंबईत ब्रिटिशांच्या धोरणांविरोधात अनेक आंदोलने त्यावेळी करण्यात आली होती.” अशी माहिती त्यांनी दिली.
अभ्यासक आणि राज्यशास्त्राच्या निवृत्त प्राध्यापक अरुणा पेंडसेही या वेबिनारमध्ये सहभागी झाल्या होत्या. मिठाच्या सत्याग्रहात मुंबईतल्या स्थानिक नागरिकांनी कसं सहभाग घेतला होता, यची माहिती त्यांनी यावेळी दिली. “त्यावेळी मुंबईकरांनी महालक्ष्मी आणि चौपाटी इथे मीठाचा सत्याग्रह केला. 1942 च्या लढ्यातील घटनांनी मुंबईचे बहुरंगी, बहुसांस्कृतिक एकजिनसी स्वरूप सर्वांना दिसले. महात्मा गांधी यांच्या प्रभावाखाली गुजराती व्यापाऱ्यांनीही या स्वातंत्र्यलढ्यात पूर्ण सहभाग घेतला होता. तसेच मराठी लोकही यात सहभागी झाले होते. व्यापक प्रमाणात राजकीय मोर्च्याची सुरुवात त्यावेळी पहिल्यांदा गोवालिया टॅंक म्हणजे ऑगस्ट क्रांती मैदानापासूनच झाली होती. इथेच आठ ऑगस्ट 1942 रोजी गांधीजींनी ‘चले जाव’ चा नारा दिला होता. त्यानंतर, शिवाजी पार्क आणि इतर ठिकाणी अनेक मोर्चे, रॅली निघाल्या.” अशी माहिती त्यांनी दिली.
स्वातंत्र्यसेनानी अरुणा आसफअली आणि उषा मेहता यांनी महिलांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरणा दिली. या लढ्याचे केंद्र मुंबईच राहिली आणि इथूनच हा लढा इतर प्रांतात पसरला, असे पेंडसे यांनी सांगितले.

पत्र सूचना कार्यालयातील सहायक संचालक जयदेवी पुजारी स्वामी यांनी वेबिनारचे प्रास्ताविक केले तर प्रदर्शनाच्या सहायक, आरओबी, शिल्पा नीलकंठ यांनी वेबिनारचे सूत्रसंचालन केले. माहिती सहायक सोनल तूपे यांनी आभार प्रदर्शन केले.
हा संपूर्ण वेबिनार : https://youtu.be/pVnITlGLAF4 या लिंक वर बघता येईल.
* * *
Jaydevi PS/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1749628)
आगंतुक पटल : 642