माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘आझादी का अमृत महोत्सव’ यानिमित्त नवी मुंबईतील बेलापूर  येथे छायाचित्र प्रदर्शन


भारतीय स्वातंत्र्य  लढ्यातील अज्ञात राहिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या  माहितीवर आधारित  छायाचित्र प्रदर्शन

Posted On: 24 AUG 2021 4:55PM by PIB Mumbai

 

मुंबई, 23 ऑगस्ट 2021

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोक संपर्क कार्यालय, पुणे व पत्र सूचना कार्यालय, मुंबई यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य  लढ्यातील आतापर्यंत अज्ञात राहिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांविषयी   माहितीवर आधारित छायाचित्रांचे प्रदर्शन नवी मुंबई मधील बेलापूर स्थित केंद्रीय सदन येथे आजपासून सुरु झाले आहे. स्वातंत्र्य संग्रामातील दुर्लक्षित नायक अर्थात  अज्ञात राहिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान लक्षात आणून देणे, हा उद्देश यामागे आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय 23 ते 29 ऑगस्ट हा आठवडा आयकॉनीक वीक म्हणून साजरा करत आहे. या अंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी अनेक उपक्रम आयोजित केले जात आहेत.

 

या चित्र प्रदर्शनीच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबई पोलिस आयुक्त बिपिन कुमार सिंग (आयपीएस) आणि विशेष अथिती म्हणून सीआरपीएफ, पश्चिम विभागाचे आयजीपी रणदीप दत्ता उपस्थित होते.

चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना सिंग म्हणाले की, या प्रदर्शनात आजवर  अज्ञात राहिलेल्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे छायाचित्रं आहेत, ज्यांच्याबद्दल नव्याने कळते आहे . देशाला स्वतंत्र करण्यासाठी ज्यांनी लढा दिला, त्यांच्याबद्दल जाणून घेणे समाधान देणारे होते. ही सर्व माहिती, छायाचित्रे जतन केल्याबद्दल, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या विभागांचे त्यांनी कौतुक केले. स्वातंत्र्य सहज मिळालेले नाही, अनेकांनी त्यासाठी प्राण दिले आहेत. चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी इतिहासातील या सर्व महान व्यक्तींबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. त्यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित पाहुण्यांना त्यांच्या कुटुंबासह आणि मुलांसह प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी एस. आर. सिंग, पोलीस अधीक्षक, सी.बी.आय. विशेष गुन्हे शाखा प्रमुख; प्रवीण घाग, पुलिस उपमहानिरीक्षक, जलद कृती दल; रूपाली अंबुरे, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई; जयंत शेकोकर, अधीक्षक अभियंता, सीपीडब्ल्यूडी; सयद मोहमद असद, सहायक आयुक्त, सीजीएसटी, केंद्रीय उत्पादन आणि सीमाशुल्क, नवी मुंबई; आशिष गुप्ता, कार्यकारी अभियंता (सिव्हिल), सीपीडब्ल्यूडी, नवी मुंबई यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

कोविड संबंधित नियमांचे पालन करून सर्व स्थानिक सरकारी कार्यालयातील अधिकारीकर्मचारी वर्ग, विद्यार्थी आणि इतर नागरिक यांच्यासाठी 24 ते 27 ऑगस्ट या कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुले असेल. भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे विभागाकडून प्रकाशित पुस्तकांचे प्रदर्शन आणि सवलतीच्या दरात विक्री देखील येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पत्र सूचना कार्यालय, मुंबई येथील उप संचालक  डॉ. राहुल तिडके, प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो, पुणेचे उप संचालक  निखिल देशमुख हे देखील यावेळी उपस्थित होते. देशमुख यांनी आझादी का अमृत महोत्सवच्या निमित्ताने प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो, पुणे आणि त्यांच्या क्षेत्रीय कार्यालयांद्वारे आठवडाभर होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा यावेळी  मांडली.

आयकॉनीक वीक अंतर्गत अहमदनगर, औरंगाबाद, सोलापूर, नाशिक, नांदेड, पुणे, नागपूर, वर्धा, अमरावती, गडचिरोली आणि मडगाव, गोवा या ठिकाणी प्रादेशिक लोक संपर्क कार्यालय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोकांमध्ये जाऊन साजराकरणार आहे. याअंतर्गत परिसंवाद, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानींचा सत्कार, सायकल फेरी, रांगोळी स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, स्वातंत्र्याचे पोवाडे गायन, कलासादरीकरण असा भरगच्च कार्यक्रम घेतला जाणार आहे.

***

Jaydevi PS/S.Pophale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1748568) Visitor Counter : 738


Read this release in: English