शिक्षण मंत्रालय

आयआयटी मुंबईचा 59 वा दीक्षांत सोहळा आज मिश्र-वास्तव पद्धतीने संपन्न


2289 विद्यार्थ्यांना 2501 पदव्या प्रदान

378 विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पति (पीएचडी) पदवी प्रदान

Posted On: 07 AUG 2021 7:27PM by PIB Mumbai

 

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन, आयआयटी मुंबईचा दीक्षांत समारंभ आज आभासी-वास्तव (VR) पद्धतीने साजरा झाला. यासाठी पदवी मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आभासी अवतार तयार करण्यात आला होता. एवढेच नाही, तर त्यांना पदवी प्रदान करणारे आयआयटीचे संचालक प्रा सुभाशीष चौधरी यांचाही अवतार तयार करण्यात आला होता. सर्व पदक विजेत्यांच्या अवतारांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि टोरंटो विद्यापीठाचे प्रोफेसर जेफ्री हिंटन यांच्या हस्ते पदके मिळाली.

सर्व पदवीप्राप्त विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता,अशाप्रकारे दीक्षांत समारंभ घेणे योग्य आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना या प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्थेतून पदवीधर झाल्याचा क्षण अभिमानाने साजरा करता येईल आणि त्यांच्या आरोग्यालाही धोका असणार नाही.

गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाही या संस्थेने सर्व विद्यार्थ्यांना आभासी अवतार स्वरूपात येण्याची संधी दिली. विद्यार्थ्यांनी याला आभासी अवतारांच्या रूपाने, संस्थेचा परिसर,आपले हॉस्टेल आणि विभागातही फेरफटका मारला. तसेच आपले मित्र आणि प्राध्यापकांचीही भेट घेतली. याशिवाय, काही विद्यार्थ्यांना या समारंभात प्रत्यक्ष पदवीही देण्यात आली.

आजच्या 59 व्या दीक्षांत समारंभात, एकूण 2501 पदव्या प्रदान करण्यात आल्या. यात 178 पी एच डी, 36 एमटेक/ एमफील आणि पीएचडी, 26 दुहेरी पदवी, (एमएससी, पीएचडी), 8 एमएस, 689 एम टेक, 63 एमडी , 18 दुहेरी पदवी (बीडीs+एमडी), 13 एम फील, 109 एमबीए, 1 इईमबीए, 7 एमपीपी, 235 दोन वर्षे एमएससी, 324 दुहेरी पदवी (बीटेक +एम टेक ), 663 बी टेक पदव्या, 12 आंतरशाखीय दुहेरी पदवी (बीटेक / बीएस +एमटेक / एमएससी), 8 दुहेरी पदवी (बीएस + एमएससी), 49 बीएस, 14 बीडी, and 20 पीडीजीआयआटी. यासह, 28 संयुक्त पीएचडी देण्यात आल्या.

यावर्षी, 38 संशोधन स्कॉलरची नाईक आणि रस्तोगी  पीएचडी उत्कृष्टता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

तीन विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी सुवर्णपदकांनी गौरवण्यात आले. प्रेसिडेंट ऑफ इंडिया पुरस्कार, सिद्धार्थ चांडक या बी टेक च्या विद्यार्थ्याला देण्यात आला. इन्स्टिट्यूट गोल्ड मेडलआणि डॉ शंकर दयाल शर्मा सुवर्ण पदक, मनु श्रीवास्तव या भौतिकशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्याने जिंकली. त्याशिवाय, विविध विभागांमध्ये अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले.

यावेळी संस्थेचा वार्षिक अहवाल सादर करतांना संचालक प्रा सुभाशिष चौधरी म्हणाले की, आजही पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थांची आयआयटी मुंबईलाचा सर्वाधिक पसंती असते. कोरोनाच्या काळातही आमच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले नाही, हे नमूद करतांना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जेफ्री हिंटन यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अत्यंत कठीण परिस्थितीत देखील या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद आहे, असे ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात, अत्यंत वेगाने होणारी प्रगती, समाजात आपल्या आकलनापलीकडचे परिवर्तन घडवून आणणार असून त्याचे सगळेच परिणाम चांगले असतील असे नाही, असे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. आज पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी अनेक जण येणाऱ्या वैद्यकीय क्रांतीत सहभागी होण्यास उत्सुक असतील,ज्यात तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्याला  मानवतेचे कल्याण करता येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. प्रो जेफ्री हिंटन यांना कृत्रिम न्यूरल नेटवर्क्स चे जनक म्हणून ओळखले जाते. सध्या ते टोरांटो विद्यापीठात प्राध्यापक, आणि व्हेक्टर विद्यापीठात प्रमुख वैज्ञानिक सल्लागार तसच गुगल मध्ये अभियांत्रिकी फेलो अशा  विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.

हा कार्यक्रम, संस्थेच्या अधिकृत यु टयूब चानेलवर दाखवण्यात आला. त्याची लिंक : https://www.youtube.com/watch?v=cWMmvj3P3rk   

***

Jaydevi PS/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1743653) Visitor Counter : 213


Read this release in: English