विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड 2021 स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी


32 व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत 3 रौप्य आणि एका कांस्य पदकाची केली  कमाई

Posted On: 26 JUL 2021 3:01PM by PIB Mumbai

 

मुंबई 26 जुलै 2021

यावर्षी 18 ते 23 जुलै या कालावधीत पार पडलेल्या 32 व्या IBO अर्थात आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत सहभागी झालेल्या चारही भारतीय विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत 3 रौप्य पदके आणि एका कांस्य पदकाची कमाई केली आहे. पोर्तुगाल देशाकडे यजमानपद असलेली ही IBO Challenge II नामक स्पर्धा महामारीच्या संकटामुळे यावर्षी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. जगातील 76 देशांमधल्या 304 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आभासी पद्धतीने भाग घेतला. टाटा मुलभूत संशोधन संस्थेचे राष्ट्रीय केंद्र असलेल्या HBCSE अर्थात होमी भाभा शास्त्रीय शिक्षण केंद्राने आज प्रसिध्द  केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

HBCSE मधील शास्त्रीय ऑलिम्पियाड स्पर्धेचे राष्ट्रीय समन्वयक प्रा.अन्वेष मझुमदार म्हणाले की, कोविड महामारीमुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे, IBO चे आयोजक आणि HBCSE यांच्या अखंडित दूरदृश्य परीक्षणाखाली विद्यार्थ्यांनी आपापल्या घरातूनच या परीक्षा दिल्या आहेत. यातील सहभागी संघांची निवड फेब्रुवारी 2021 मध्ये झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर करण्यात आली. HBCSE ने आयोजित केलेल्या केवळ ऑनलाईन सत्रांमधून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांना कोविड संसर्गाच्या धोक्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी यावर्षी निवड आणि प्रशिक्षण प्रक्रिया छोटी आणि आधुनिक स्वरुपाची ठेवण्यात आली. या आव्हानात्मक परिस्थतीत देखील अत्यंत उत्तम सादरीकरण करत आपल्या विद्यार्थ्यांनी ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून दाखवण्याचा भारताचा लौकिक कायम ठेवला त्याबद्दल आम्ही अत्यंत आनंदी आहोत,’ असे प्रा. मझुमदार म्हणाले.

भारतीय पथकातील स्पर्धकांची व्यक्तिगत कामगिरी(4)

Sr. No

Name of the Contestant

Medal

1

Anshul Siwach

(SILVER)

2

Dhiren Bharadwaj

(SILVER)

3

Naman Singh

(SILVER)

4

Swaraj Nandi

(BRONZE)

आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेचे तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा: https://ibo2021.org/

प्रा.मझुमदार म्हणाले की, IBO Challenge II या स्पर्धेत एक माहिती-प्रात्यक्षिक आणि दुसरी माहितीआधारित अशा प्रत्येकी 3 तास कालावधीच्या  दोन संगणकाधारित परीक्षा घेण्यात आल्या. माहिती-प्रात्यक्षिक आधारित परीक्षेत पोर्तुगालचा संशोधक फर्डिनांड मेगॅलन याने सर्वात प्रथम नौकेद्वारे पृथ्वीप्रदक्षिणा घालण्यासाठी (1519-1522). केलेल्या प्रवासाची 500 वर्षे पूर्ण झाल्याचा उत्सव साजरा करण्यात आला. या परीक्षेत 8 भाग होते, त्यापैकी प्रत्येक भाग मेगॅलन याने जगाच्या विविध भागांमध्ये घेतलेल्या थांब्यावर आधारित होता. माहितीआधारित परीक्षेमध्ये जागतिक उष्मावाढ आणि कोविड -19 महामारी यांसारख्या विद्यमान समस्यांसह जीवशास्त्राच्या सर्व क्षेत्रांवर आधारित आव्हानात्मक प्रश्नांचा समावेश होता.

आंतरराष्ट्रीय परिक्षक मंडळाच्या चर्चांमध्ये प्रा.मोहन चतुर्वेदी (दिल्ली विद्यापीठ), प्रा.रेखा वर्तक (HBCSE, मुंबई), डॉ.राम कुमार मिश्रा (IISER, भोपाळ) आणि डॉ. शशिकुमार मेनन (TDM प्रयोगशाळा, मुंबई) या चार परीक्षक सदस्यांनी भाग घेतला.

HBCSE अर्थात होमी भाभा शास्त्रीय शिक्षण केंद्र हे टाटा मुलभूत संशोधन संस्थेचे राष्ट्रीय केंद्र देशातील गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र तसेच ज्युनियर शास्त्र या विषयांतील  ऑलिम्पियाड स्पर्धेच्या आयोजनासाठी नोडल केंद्र म्हणून काम करते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी या केंद्राकडे दिलेली आहे. ऑलिम्पियाड स्पर्धा कार्यक्रमाला  भारत सरकारचे अणुउर्जा विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, अवकाश विभाग आणि शिक्षण मंत्रालय यांचे पाठबळ लाभलेले आहे.

***

Jaidevi PS/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1739034) Visitor Counter : 229


This link will take you to a webpage outside this websiteinteractive page. Click OK to continue.Click Cancel to stop :  
Read this release in: English